सरकार-बचाव पक्षात शाब्दिक चकमक; उलट तपासणीत वकिलांनी जबाबातील विसंगत केल्या स्पष्ट

शैलेश पेटकर
Wednesday, 20 January 2021

कोथळे खून खटल्यात अनिकेतचा मित्र अमोल भंडारेचा आज बचाव पक्षाने उलटतपास घेतला. जबाबातील विसंगती समोर आणल्या. या दरम्यान सरकार पक्ष आणि बचाव पक्ष यांच्यात शाब्दिक चकमक उडाली.

सांगली ः कोथळे खून खटल्यातील घटनेतील प्रत्यक्ष साक्षीदार आणि अनिकेतचा मित्र अमोल भंडारे याची महत्त्वपूर्ण साक्ष काल न्यायालयासमोर नोंदवण्यात आली. आज बचाव पक्षाने उलटतपास घेतला. जबाबातील विसंगती समोर आणल्या. या दरम्यान सरकार पक्ष आणि बचाव पक्ष यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश विजय पाटील यांच्यासमोर आज सुनावणी झाली. सरकारतर्फे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी काम पाहिले.

कोरोना काळात खंडित झालेली खटल्याची सुनावणी कालपासून सुरू झाली. प्रत्यक्ष साधीक्षार अमोल भंडारे याची साक्ष झाली. ""मी आणि अनिकेत कोथळे दोघे पळून गेलो होतो. अनिकेत कुठे आहे माहिती नाही, असेच सांगायचे. तसे सांगितले नाही, तर अनिकेतसारखे तुलाही मारून टाकीन,'' अशी धमकी बडतर्फ उपनिरीक्षक युवराज कामटे याने डोक्‍याला रिव्हॉल्व्हर लावून दिली होती, अशी साक्ष भंडारेने न्यायालयात नोंदवली. सारा घटनाक्रम न्यायालयासमोर सांगितला. 

आज बचाव पक्षातर्फे ऍड. प्रमोद सुतार, विकास पाटील-शिरगावकर, किरण शिरगुप्पे यांनी उलट तपास घेतला. ऍड. पाटील यांनी विसंगतींवर लक्ष वेधले. कामटेच्या भीतीने खोटा जबाब दिल्याचे भंडारे याने सांगितले. ऍड. सुतार यांनी मारहाण झाल्याचे न्यायालयात सांगितले नसल्याचा मुद्दा मांडला.

वैद्यकीय तपासणीवेळी सांगितले होते, असे भंडारे याने सांगितले. दरम्यान, सरकारपक्ष आणि बचावपक्षांत शाब्दिक चकमक झाली. उद्या (ता. 19) पुन्हा सुनावणी घेतली जाणार आहे. सहायक सरकारी वकील प्रमोद भोकरे, सीआयडीचे पोलिस उपाधीक्षक मुकुंद कुलकर्णी यांनी सहकार्य केले. 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Verbal clash between government and defense; On the contrary, in the investigation, the lawyers made inconsistencies in the answer