दमदार पावसाने जत पूर्व भागातील व्हसपेठ तलाव 10 वर्षानंतर तुडुंब 

राजू पुजारी
Monday, 28 September 2020

जत पूर्व भागातील व्हसपेठ, माडग्याळ व गुड्डापूर परिसरात झालेल्या दमदार पावसाने नाले, ओढ्यात पाणी वाहू लागले आहे. व्हसपेठ येथील तलाव 10 वर्षानंतर तुडुंब भरला आहे.

संख : जत पूर्व भागातील व्हसपेठ, माडग्याळ व गुड्डापूर परिसरात झालेल्या दमदार पावसाने नाले, ओढ्यात पाणी वाहू लागले आहे. व्हसपेठ येथील तलाव 10 वर्षानंतर तुडुंब भरला आहे. तलाव भरल्यामुळे व्हसपेठ, माडग्याळ या दोन्ही गावांचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. रब्बीतील पिके, डाळिंब व भाजीपाला पिकांना फायदा होणार आहे. 

विजांच्या गडगडाटासह व्हसपेठ, माडग्याळ व गुड्डापूर परिसरात दमदार पाऊस झाला. 15 दिवसांपासून रिमझीम, मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. तीन दिवसांत पावसाने लहान लहान तलाव भरलेत. 
व्हसपेठ येथील गावालगतचा तलाव 2010 मध्ये भरला होता. यावर्षी मुसळधार पावसाने 10 वर्षानंतर तलाव तुंडब भरला. तलावाखाली व्हसपेठ, माडग्याळ या गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी आहेत. तलाव भरल्याने दोन्ही गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. मे महिन्यात माडग्याळ येथे टॅंकरने पाणीपुरवठा सुरु होता. 

तलाव भरल्याने भरल्याने व्हसपेठ, माडग्याळ दोन्ही गावातील गावातील शेतीला फायदा होणार आहे. रब्बी हंगामातील पिकांना, डाळिंब फळबागांना होणार आहे. माडग्याळ येथे भाजीपाला शेती केली जाते. यावर्षी भाजीपाला पिकाला फायदा होणार आहे. या भागातील भूजल पातळी वाढण्यास मदत होणार आहे. दोन्ही गावातील दीड हजार एकर शेती बागायत होईल. 

संपर्क तुटला 
व्हसपेठ येथील दावलमलिक परिसर, जाधवनगर येथील शेतात पाणी साचले आहे. या भागातील बाजरी पाण्यात गेल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. जाधवनगर येथील रस्ता पावसाने वाहून गेला आहे. पूल खचला आहे. व्हसपेठ व जाधवनगर येथील संपर्क तुटला होता. ओढ्यात पाणी असल्याने रस्त्याने जाणे धोकादायक बनले आहे. 

बाजरीचे नुकसान 
दमदार पावसाने शेतातील बाजरी पाण्यात उभी आहे. शेतकऱ्यांनी काढणी केलेली बाजरी तलावात वाहून गेली आहे. लाखोंचे नुकसान झाले आहे. जोगा परिसरात नालाबांध फुटून शिवाजी आनंदा साळुंखे यांचे शेत वाहून गेल्याने चार लाखांचे नुकसान झाले आहे. सुतार वस्ती परिसरातील विठ्ठल गोदे, पांडुरंग टपरे यांच्या विहिरी बांध फुटून बुजल्या आहेत. 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vespeth Lake flooded after 10 years due to heavy rains