लहान मुले पळवणाऱ्या फासे पारध्यांच्या टोळीची अफवाच ; पोलिसांकडून खुलासा

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 13 December 2020

या मेसेजवर लोकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

विटा (सांगली) : व्हॉट्‌स ॲपवर सध्या तीन ते चार वर्षे वयाची लहान मुले पळवणारी फासे पारध्यांची एक टोळी फिरत असून, विटा पोलिसांनी त्यातील दोघांना अटक केली आहे. असा मेसेज व एक ऑडिओ क्‍लिप व्हायरल झाली आहे. त्यामुळे लोकांमध्ये घबराट पसरली आहे. या मेसेजवर लोकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

मध्यप्रदेश व गडचिरोली भागातून तीन हजार फासे पारध्यांची टोळी सर्वत्र विखुरली आहे. ते सर्व दरोडेखोर आहेत. कोणत्याही वस्तू विक्री करण्याच्या बहाण्याने ते आपल्या परिसरात फिरत आहेत. तसेच तीन ते चार वर्षे वयाची लहान मुले पळवून नेत आहेत. त्याचबरोबर रात्रीच्यावेळी ट्रान्सफॉर्मरमधील फ्युज काढून वीज बंद करून अंधारात दरोडे घालत आहेत. त्यामुळे गावागावांतील लोकांनी सतर्क राहून स्वत:जवळ संरक्षणासाठी धारदार शस्त्रे बाळगावीत. टोळीतील दोघांना विटा पोलिसांनी अटक केली आहे. अशा आशयाचा मजकूर सध्या व्हायरल होऊ लागला आहे. त्यामुळे लोकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. मात्र पोलिसांनी ही अफवा असल्याचे स्पष्ट केले.

हेही वाचा - यंदा निवडणुकीच्या जेवणावळी घरातच ; उमेदवारांचे अनोखे आयोजन -

"विनाकारण नागरिकांमध्ये घबराट पसरविण्यासाठी व गैरसमज निर्माण व्हावेत, या हेतूने चुकीच्या पद्धतीने क्‍लिप व्हायरल केली आहे. आम्ही अशा कोणालाही अटक केली नाही. ही ऑडिओ क्‍लिप कोणत्याही पोलिस स्टेशनमधून आलेली नाही. नागरिकांनी अशा क्‍लिप व्हायरल करू नयेत. विटा परिसरात अशी कोणतीही फासे पारध्याची टोळी नाही. अशा अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये."

- रवींद्र शेळके, पोलिस निरीक्षक, विटा

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: video clip viral in sangli but clip fake said police in sangli