video : बघा, असे पळाले ते पाचजण कर्जतचे जेल तोडून..

नीलेश दिवटे
सोमवार, 10 फेब्रुवारी 2020

अतिरिक्त पोलीस अधीक्षक सागर पाटील यांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली. वरिष्ठ पातळीवरूनही या घटनेचा पाठपुरावा केला जात आहे. पळून गेलेल्या आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची सात पथके रवाना झाली आहेत. लवकरच त्यांच्या मुसक्या आवळल्या जातील, असे अतिरिक्त पोलीस अधीक्षक सागर पाटील यांनी सांगितले. 

कर्जत : कर्जतच्या तुरूंगाची कौले उचकटून धूम ठोकलेले आरोपी हे खतरनाक आहेत. त्यांच्यावर खुनाचा गुन्हा तसेच पोक्सोचा गुन्हाही दाखल आहे. पोलिसांच्या हलगर्जीपणामुळेच हे आरोपी पळाल्याचे समोर येत आहे. विशेष म्हणजे इतके गंभीर गुन्ह्यातील आरोपींना कर्जतमध्ये ठेवलेच कसे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे पळून गेल्यानंतरही लवकर कोणालाच समजले नाही. सायंकाळी ही घडलेली घटना तपासणीच्या वेळी लक्षात आली. इतक्या मोठ्या प्रमाणात आरोपी पळून जाण्याची ही जिल्ह्यातील पहिलीच घटना असावी.

सात पथके रवाना

अतिरिक्त पोलीस अधीक्षक सागर पाटील यांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली. वरिष्ठ पातळीवरूनही या घटनेचा पाठपुरावा केला जात आहे. पळून गेलेल्या आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची सात पथके रवाना झाली आहेत. लवकरच त्यांच्या मुसक्या आवळल्या जातील, असे अतिरिक्त पोलीस अधीक्षक सागर पाटील यांनी सांगितले. 

एक आरोपी म्हणाला, मी नाही येणार तुमच्यासोबत 
तुरुंगरक्षक जालिंदर माळशिखरे हे तपासणी करीत चार नंबरच्या बराकीत गेले होते. तेव्हा त्यांना पाच आरोपी रफ्फूचक्कर झाल्याचे दिसले. त्या बराकीत एकूण नऊ आरोपी असल्याचे सांगितले जाते. मात्र तेथे सहा आरोपी असल्याचे समजते. त्यापैकी पाचजण पळून गेले, एक आरोपी त्यांच्यासमवेत जाण्यास नकार दिला. मात्र, त्याने ही घटनाही पोलिसांना अवगत केली नाही. म्हणजे नेमका त्याचाही या प्रकरणात सहभागी आहे की काय, या दृष्टीने पोलिस तपास करीत आहेत. 

ही आहे पार्श्वभूमी आरोपींची
अक्षय रामदास राऊत, चंद्रकांत महादेव राऊत (दोघेही पारेवाडी जामखेड), मोहन कुंडलिक भोरे (रा. कवडगाव, जामखेड) ज्ञानेश्वर कोल्हे (जवळा, जामखेड), गंगाधर लक्ष्मण जगताप अशी पळून गेलेल्या आरोपींची नावे आहेत. पुण्यातील एका व्यापाऱ्याचा क्रूरपणे खून केला होता. त्या गुन्ह्यात हे अटकेत होते. एका आरोपीविरूद्ध शस्त्र बाळगल्याचा गुन्हा आहे. मुलीचा लैगिक छळ केल्याचाही यातील एकावर आरोप आहे. गेल्या दोन वर्षांपासून हे आरोपी कर्जतमधील तुरूंगात होते. त्यांना ज्या बराकीत ठेवले होते, ती जुनाट इमारत आहे. तरीही या खतरनाक आरोपींना तेथे ठेवण्याची रिस्क पोलिसांनी का घेतली, आता याविषयीही चर्चा सुरू झाली आहे. \

असा आखला प्लॅन 
पळून गेलेले आरोपींचा गेल्या महिन्याभरापासून पळून जाण्याचा प्लॅन होता. मात्र, संधी मिळत नव्हती. बराकीचे गज कापण्यासाठी त्यांनी एक्सा ब्लेड मिळवले होते. आरोपींकडे पांघरण्यासाठी शाल आणि रग होत्या. एका आरोपीने त्याची झोळी बनळवली. तो बराकीच्या दोन टोकाला बांधली. आणि त्या झोळीत तो उभा राहिला. त्यानंतर त्याने छताचा प्लाय कापला.मग त्यावरील गज कापून वाकवले. गज वाकवल्यानंतर छताची कौले उचकटली. गज कापणारा आरोपी वर गेला. त्यानंतर एकेक करीत त्या रगांचा रस्सीसारखा उपयोग केला. पाचही आरोपी वर गेल्यानंतर त्यांनी पुन्हा रग छताच्या खालच्या बाजूला सोडला आणि पोबारा केला. 

इतरांना धमकावायचे 
बराकीत उरलेल्या आरोपीलाही ते आपल्यासोबत पळून येण्याचा आग्रह करीत होते. मात्र, त्याने स्पष्टपणे नकार दिला. तोही एका वारकऱ्याच्या खुनाच्या गुन्ह्यात आरोपी आहे. त्यानेही पोलीस यंत्रणेला अवगत केल्याचीही माहिती समोर येते आहे. पळून गेलेल्या आरोपींनी सर्वांनी संमतीने हा गुन्हा केला. त्या बराकीत इतर कोणाला ठेवले जाऊ नये यासाठी ते बराकीत ठेवलेल्या आरोपींना धमकावायचे. मुद्दाम भांडण काढायचे. त्यामुळे पोलीस इतर आरोपींना त्याच्या बराकीत ठेवत नसायचे. त्यामुळे पळालेल्या आरोपींचा डाव सक्सेस झाला. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: video: Look, the five men fled Karjat's jail ..