Video : हे घ्या पुरावे, व्हिडिओ अन बातम्या...इंदोरीकरांमागे अंनिसची पीडा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 फेब्रुवारी 2020

प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती देशमुख महाराज (इंदोरीकर) यांनी अपत्यप्राप्तीबाबत तसेच महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि अन्य काही संघटनांनी जिल्हा शल्यचिकित्सक व पोलिसांकडे निवेदन देऊन कारवाईची मागणी केली होती.

नगर: प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती देशमुख महाराज (इंदोरीकर) यांच्या त्या वक्तव्याप्रकरणी सायबर पोलिसांनी क्‍लिन चिट दिली आहे. यामुळे इंदोरीकरांचे समर्थक खुशीत होते. परंतु आता अंधश्रद्धा निर्मूलन समितीने जिल्हा शल्यचिकित्सकांना पुरावे दिले आहेत. व्हिडिओ तसेच विविध ठिकाणी आलेल्या बातम्यांची कात्रणेही दिली आहेत. पुरावे देऊनही कारवाई न झाल्यास इंदोरीकरांसह जिल्हा शल्यचिकित्सकांविरुद्ध गुन्हा दाखल करू, असा इशारा अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य कार्यवाह अॅड. रंजना गवांदे यांनी दिला आहे. 

 

 

कशामुळे काय झालं..

प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती देशमुख महाराज (इंदोरीकर) यांनी अपत्यप्राप्तीबाबत तसेच महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि अन्य काही संघटनांनी जिल्हा शल्यचिकित्सक व पोलिसांकडे निवेदन देऊन कारवाईची मागणी केली होती. पुरावे दिल्यास कारवाई करू अशी भूमिका जिल्हा शल्यचिकित्सकांनी घेतली होती. त्या सायबर पोलिसांनी सोशल मीडियावर इंदोरीकरांचे व्हिडिओ उपलब्ध नसल्याचे अहवाल दिला होता. 

इथे इथे झाली कीर्तन
दरम्यान, अंनिसने निवेदनात म्हटले, इंदोरीकर यांनी मूल जन्माबाबतचे वादग्रस्त वक्तव्य उरण तालुक्‍यातील इंचगिरी येथे दोन जानेवारी रोजी केले होते. ते सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर युट्यूब चैनलवर दबाव आणून ते व्हिडिओ डिलीट करण्यात आले. तर, इंदोरीकर यांनी असेच वक्तव्य फेब्रुवारी 2019 मध्ये नगर जिल्ह्यातील शेलद येथे केले आहे. इंदोरीकरांच्या विधानावरून चर्चा सुरू झाल्यानंतर 12 फेब्रुवारी 2020 रोजी नोटीस पाठविली. त्यानंतर इंदोरीकर यांनी बीड येथे कीर्तनात ते वादग्रस्त विधानाचे पुन्हा समर्थन केले. त्यानंतर प्रसिद्धीपत्रकद्वारे दिलगिरी व्यक्त केली. 19 फेब्रुवारीला त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांकडे खुलासा केला. 

फेब्रुवारी महिन्यात नगर जिल्ह्यात माझे कीर्तन झाले नाही. मी वादग्रस्त वक्तव्य केलेले नाही, असा खुलासा केला. त्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने इंदोरीकर यांच्याविरुद्ध पीसीपीएनडीटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करवा, अशी तक्रार केली. त्यात सायबर पोलिसांनी युट्यूबवर इंदोरीकरांचा व्हिडिओ उपलब्ध नाही, असे जिल्हा शल्यचिकित्सकांनी सांगितले. वास्तविक, पीसीपीएनडीटी कायद्यान्वये तक्रारीबाबतचे पुरावे शोधण्याचे अधिकार शल्यचिकित्सकांना आहेत. 48 तासांत चौकशी केली पाहिजे. मात्र, 22 दिवस झाले तरी त्यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यांच्याविरुद्ध तात्काळ कारवाई करावी. 

नाही तर शल्यचिकित्सकांनाच सहआरोपी करू 
वादग्रस्त व्हीडिओ, बातम्या दिल्या आहेत. तक्रार आल्यापासून 48 तासांत चौकशी होणे गरजेचे होते. त्यांनी हलगर्जीपणा केला आहे. सायबर पोलिसांच्या म्हणण्यानुसार त्यांनी इंदोरीकरांना क्‍लिन चिट दिली आहे. पंधरा दिवसांत पुरावे गोळा करून गुन्हा दाखल न केल्यास जिल्हा शल्यचिकित्सकांना सह आरोपी करून गुन्हा दाखल करण्यात येईल. 
- अॅड. रंजना गवांदे 

वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊच निर्णय 
सरकारी वकील आणि वरिष्ठ कार्यालयाचे मार्गदर्शन घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येईल. 
- डॉ. प्रदीप मुरंबीकर, जिल्हा शल्यचिकित्सक 
...... 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Video: Take this evidence, video on news against Anis Indorekar