आमदारांनी मतदानासाठी केली फोनाफोनी ; 3 आमदारांचे मुहूर्तावरच मतदान

महापालिकेतील राजकीय वातावरण तापले.
Mahantesh KavatgiMath,Lakshmi Hebbalkar,Satish Jarkiholi
Mahantesh KavatgiMath,Lakshmi Hebbalkar,Satish JarkiholiEsakal

बेळगाव: भारतीय जनता पक्षाचे उमेदवार महांतेश कवटगीमठ यांनी महूर्तावर केलेले मतदान, मोबाईलमधील देवी-देवतांचे दर्शन करूनच मतदानासाठी पुढे सरसावलेल्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, (MLA Lakshmi Hebbalkar)निवडणूकीच्या काळातच झालेल्या अतिवृष्टीचा अप्रत्यक्षपणे पैसे वाटप व जेवणावळींशी जोडलेला संबंध व राजकीय टोलेबाजी यामुळे शुक्रवारी सकाळी महापालिकेतील राजकीय वातावरण तापले. निवडणूकीत मतदानाची अचूक वेळ साधणे किती महत्वाचे असते हे कवटगीमठ (Mahantesh Kavatgi Math)यांनी दाखवून दिले. ते पावणेबारा वाजता महापालिकेतील मतदानकेंद्रांवर कुटुंबियांसह पोचले, पण त्यांनी लागेच मतदान केले नाही. आधी त्यांनी आमदार अनिल बेनके (Anil Benke)यांच्याशी संपर्क साधला व त्यांना मतदानकेंद्रावर बोलावून घेतले. (Vidhan Parishad Belgaum Election 2021)

दरम्यानच्या काळात त्यांना एक कॉल आला, कॉल केलेल्या व्यक्तीशी बोलत ते कुटुंबिय व प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत लांबवर गेले. तेथून परत आल्यानंतर सतीश जारकीहोळी (Satish Jarkiholi)यांनी मतदान केले आहे का? याची चौकशी केली. ते मतदानकेंद्रात गेले व मतदानकेंद्रातील अधिकाऱ्यांच्या बाजूला असलेल्या रिकाम्‍या खुर्चीवरच बसून राहिले. १२ वाजून १ मिनिटांनीच आपण मतदान करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले. ती वेळ येईपर्यंत ते घड्याळाकडे बघत बसून राहिले. १२ वाजून १ मिनिट झाल्यावरच ते खुर्चीवरून उठले व त्यांनी मतदान केले. त्यानंतर आमदार सतीश जारकीहोळी व आमदार लक्ष्मी हेब्बाळकर मतदानासाठी गेले.

जारकीहोळी यांनी कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण केली व थेट मतदानासाठी गेले. हेब्बाळकर यांनीही कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण केली, पण त्यावेळी त्या सातत्याने आपल्या मोबाईलमधील देवी-देवतांचे दर्शन घेत होत्या. दर्शन घेतल्यानंतरच त्या मतदानासाठी गेल्या. मतदानानंतर जारकीहोळी, हेब्बाळकर व राजू सेठ महापालिकेच्‍या आयुक्त कक्षासमोरील खुल्या जागेतील खुर्चीवर बराच वेळ बसले होते. त्यानंतर प्रसारमाध्यमांना त्यांनी प्रतिक्रिया दिली.

कॉंग्रेस उमेदवार चन्नराज हट्टीहोळी हे पहिल्याच फेरीत निवडून येतील असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. लखन जारकीहोळी म्हणजे भाजपची बी टीम असल्याची टीका सतीश यांनी केली. विधानसभेच्या हनगल पोटनिवडणूकीची पुनरावृत्ती बेळगाव जिल्ह्यात होईल. पहिल्याच फेरीत कॉंग्रेसचा उमेदवार विजयी होईल असे हेब्बाळकर म्हणाल्या. या निवडणूकीत मतदारांना पैसे व भेटवस्तूंचे वाटप मोठ्या प्रमाणात झाले आहे. ही बाब लपून राहिलेली नाही. निवडणूक काळात झालेली अतिवृष्टी व पैशांचा पाऊस या अनुषंगाने जारकीहोळी व कवटगीमठ यांना प्रश्‍न विचारण्यात आले, त्यावर दोहोंनी मिश्‍किल प्रतिक्रिया दिली. यापुढे पाऊस जास्त पडेल असे कवटगीमठ म्हणाले, तर बेळगाव आगुंबे बनल्याचे जारकीहोळी म्हणाले. पहिल्या फेरीतच निवडून येण्याचा विश्‍वास कॉंग्रेस व भाजपने केल्यामुळे अपक्ष उमेदवार लखन जारकीहोळी यांचे काय? असा प्रश्‍न मात्र यामुळे उपस्थित झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com