Vidhan Sabha 2019 : आदित्य ठाकरे म्हणाले, हे आहे माझे स्वप्न...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 ऑक्टोबर 2019

नव महाराष्ट्र घडवण्याची, बेरोजगारीमुक्त, दुष्काळमुक्त,  प्रदुषणमुक्त, सुशिक्षित व सुरक्षित महाराष्ट्र घडवण्याचे स्वप्न मी पाहिले आहे. मी एकटा नवा महाराष्ट्र घडवू शकत नाही, त्यासाठी मला तुमची भक्कम साथ हवी आहे व तेव्हाच सुजलाम सुफलाम महाराष्ट्र घडू शकेल.

शिरोली पुलाची - दुष्काळमुक्त, भयमुक्त, आत्महत्या व बेरोजगार मुक्त नवा महाराष्ट्र घडवणे हे माझे स्वप्न आहे. मात्र हे माझे एकट्याचे काम नाही, यासाठी विधानसभेत मला जिल्ह्यातील महायुतीच्या सर्व आमदारांची गरज आहे. माझ्या बरोबर महायुतीच्या सर्व उमेदवारांना तुमचा आशीर्वाद द्याल ना, अशी भावनिक हाक युवासेने प्रमुख आदित्य ठाकरे यांनी घातली. 

हातकणंगले विधानसभा मतदार संघातील शिवसेना - भाजप महायुतीचे उमेदवार आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. शिरोली पुलाची ( ता. हातकणंगले ) येथील धर्मवीर संभाजीराजे चौकात सभा झाली.

आदित्य ठाकरे म्हणाले, गेली पाच वर्ष सत्तेत राहून ही सेना संघर्ष करत आहे, ती जनतेच्या हितासाठी व राज्याच्या जनकल्याणासाठी. आता वेळ आली आहे. नव महाराष्ट्र घडवण्याची, बेरोजगारीमुक्त, दुष्काळमुक्त,  प्रदुषणमुक्त, सुशिक्षित व सुरक्षित महाराष्ट्र घडवण्याचे स्वप्न मी पाहिले आहे. मी एकटा नवा महाराष्ट्र घडवू शकत नाही, त्यासाठी मला तुमची भक्कम साथ हवी आहे व तेव्हाच सुजलाम सुफलाम महाराष्ट्र घडू शकेल.

‘या ठिकाणी मी निर्धार मेळाव्यासाठी आलो आहे. परंतु इथे असलेले भगवे वादळ पहिले तर आजचा हा मेळावा निर्धार मेळावा नाही, तर विजयी मेळावा आहे. असे मला वाटते, असे ठाकरे म्हणाले.  जिल्ह्यासह राज्यात भगवी लाट आहे. दिल्लीत फडकत असलेली भगवी पताका राज्यातही डौलाने फडकेल असा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला.

खासदार धैर्यशील माने म्हणाले, विकासातून हातकणंगले तालुक्याला नवसंजिवनी देण्याचे काम आमदार डॉ. मिणचेकर यांनी केले आहे. ही वेळ नाराजी व्यक्त करण्याची नाही, तर शिवसेनेचे हात बळकट करण्याची आहे. त्यामुळे सर्व शिवसैनिकांनी महायुतीच्या विजयरथाचे चालक व्हावे. 

आमदार डॉ. सुजीत मिणचेकर म्हणाले, निवडणूकीत आयात केलेल्या उमेदवारांना सूज्ञ मतदार जागा दाखवतील.

कोल्हापुरात आले की घरी आल्याचा आनंद

वरळीतील अनेक मतदार कोल्हापूर जिल्हयातील आहेत. त्यामुळे कोल्हापूरात आले की घरी आल्याचा आनंद मिळतो, असे मत ठाकरे यांनी व्यक्त केले.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 Aditya Thackeray comment