Vidhan Sabha 2019 : थोरात म्हणतात, ‘भाजप मजेशीर पक्ष; नेते सोडून पीएला उमेदवारी’

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

लातूर : भाजपने एकनाथ खडसे, विनोद तावडे आणि चंद्रशेखर बावनकुळे या तीन मंत्र्यांना यंदाच्या विधानसभेसाठी तिकिट नाकारले. यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी भाजपला लक्ष्य केले आहे. ‘भाजप हा खूप मजेशीर पक्ष आहे,’ टीका थोरात यांनी केली आहे.

लातूर : भाजपने एकनाथ खडसे, विनोद तावडे आणि चंद्रशेखर बावनकुळे या तीन मंत्र्यांना यंदाच्या विधानसभेसाठी तिकिट नाकारले. यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी भाजपला लक्ष्य केले आहे. ‘भाजप हा खूप मजेशीर पक्ष आहे,’ टीका थोरात यांनी केली आहे.

काय म्हणाले थोरात?
बाळासाहेब थोरात यांची आज, लातूर जिल्ह्यात औसा विधानसभा मतदारसंघात जाहीर सभा झाली. त्यात थोरात यांनी सत्ताधारी भाजपला लक्ष्य केले. थोरात म्हणाले, ‘भाजप हा खूप गमतीदार पक्ष आहे. पक्षातील एकनाथ खडसे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे यांचे तिकिट कापले. हे तिघेही मंत्रिमंडळात मोठे मंत्री होते. त्यांना तिकिट दिलं नाही आणि पीएला मात्र तिकिट देण्यात आलंय. भाजपनं तिकिट देण्यात चूक केली असेल. पण, जनता त्यांना निवडून देण्यात चूक करणार नाही.’ लातूर जिल्ह्यातील औसा विधानसभेचे काँग्रेसचे उमेदवार आमदार बस्वराज पाटील यांच्यासाठी लामजना येथे थोरात यांची जाहीर सभा झाली. 

कलम 370चा काय संबंध?
भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या प्रचार सभांमध्ये काश्मीरमधील 370 कलम हटविल्याचे सांगत आहेत. त्यावरून थोरात यांनी दोन्ही नेत्यांना लक्ष्य केले. महाराष्ट्राच्या निवडणुकीत काश्मीर व 370 चा काय संबंध असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला. थोरात म्हणाले,  ‘आज ते महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये काश्मीरचा संदर्भात बोलत आहेत. उद्या काश्मीरच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात दुष्काळ पडला आहे असं सांगणार आहेत का? ’

राहुल गांधी घेणार सभा
काँग्रेस नेते राहुल गांधी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला येणार नाहीत. यावरून सध्या उलट-सुलट चर्चा सुरू आहेत. त्यावर थोरात यांनी लातूर जिल्ह्यातील सभेत पडदा टाकला. येत्या 13 ऑक्टोबरला औसा येथे राहुल गांधी यांची जाहीर सभा होणार असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी सभेत जाहीर केले. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनीच राहुल यांच्या सभेच्या तारखेची घोषणा केल्यामुळे त्यांच्या प्रचार दौऱ्याविषयी असलेली अनिश्चितता दूर झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 congress leader balasaheb thorat speech latur district