Vidhan Sabha 2019 : काँग्रेसचे स्टार प्रचारक कोल्हापुरात यादीपुरतेच

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 ऑक्टोबर 2019

कोल्हापूर - विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजप-सेना युतीचे नेते काँग्रेस नेत्यांवर तुटून पडत आहेत, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार पायाला भिंगरी बांधल्यासारखे महाराष्ट्र पिंजून काढत युतीच्या नेत्यांना जशास तसे उत्तर देत असताना काँग्रेसच्या गोटात मात्र अजून शांतताच आहे.

कोल्हापूर - विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजप-सेना युतीचे नेते काँग्रेस नेत्यांवर तुटून पडत आहेत, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार पायाला भिंगरी बांधल्यासारखे महाराष्ट्र पिंजून काढत युतीच्या नेत्यांना जशास तसे उत्तर देत असताना काँग्रेसच्या गोटात मात्र अजून शांतताच आहे.

काँग्रेसने ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली; पण ती यादीपुरतीच मर्यादित राहिल्यासारखे चित्र आहे. एकही राज्य पातळीवरील नेता जिल्ह्यात आलेला नाही. परिणामी, काँग्रेसची जिल्ह्यातील भिस्त एकट्या आमदार सतेज पाटील यांच्यावर अवलंबून आहे. तथापि पुतण्याच्या प्रचारामुळे त्यांच्यासमोरही इतर मतदारसंघात जाऊन प्रचार करण्याचे आव्हान आहे.

विधानसभा निवडणुकीचे मतदान जेमतेम दहा दिवसांवर आले आहे. अशा स्थितीत भाजप, सेना युतीकडून महाराष्ट्रभर प्रचाराचे रान उठवले जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह युतीच्या नेत्यांकडून काँग्रेस, राष्ट्रवादीवर राज्यभर हल्ला सुरू आहे. त्याचा प्रतिकार एकट्या राष्ट्रवादीकडून केला जात आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार वयाच्या ८० व्या वर्षी तब्बेत साथ देत नसताना महाराष्ट्रभर फिरून युतीच्या नेत्यांना सडेतोड उत्तर देत आहेत. त्यांच्यासह खासदार डॉ. अमोल कोल्हे, धनंजय मुंडे, अमित मिटेकरी, अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, असे एक से बढकर एक नेते राष्ट्रवादीच्या प्रचारात सक्रिय आहेत; पण काँग्रेसच्या राज्यपातळीवर नेत्यांच्या सभांची प्रतीक्षा मात्र जिल्ह्यातील काँग्रेस व मित्र पक्षांच्या आघाडीच्या उमेदवारांना लागून राहिली आहे.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, प्रियंका गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, गुलामनबी आझाद, ज्योतिरादित्य शिंदे या राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांबरोबरच प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण हे राज्य पातळीवरील नेते, अशा ४० जणांची यादी पक्षाचे स्टार प्रचारक म्हणून जाहीर केली. यापैकी श्री. थोरात, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आदी स्वतःच उमेदवार असल्याने ते मतदारसंघात अडकून पडले आहेत, तर राष्ट्रीय पातळीवरील राहुल गांधी वगळता इतर नेत्यांचा महाराष्ट्र दौराच निश्‍चित नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 Congress star campaigner in Kolhapur in list only