Vidhan Sabha 2019 : कोल्हापुरात नेत्यांच्या अस्तित्वाची कसोटी

politics Vidhan Sabha 2019
politics Vidhan Sabha 2019

कोल्हापूर - राजकारणात हार आणि जीत नवी नाही; मात्र काही वेळा झालेली हार, ही अस्तित्वाचे प्रश्‍न घेऊन उभी राहते. यावेळीही जिल्ह्यातील काही प्रमुख नेत्यांसाठी विधानसभेची निवडणूक ही त्यांच्या अस्तित्वासाठी निर्णायक ठरणार आहे. यात पी. एन. पाटील, प्रकाश आवाडे, विनय कोरे, के. पी. पाटील, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक आदी नेत्यांचा समावेश आहे. त्यामुळेच त्यांनी कंबर कसली आहे; मात्र सुज्ञ मतदार त्याला किती प्रतिसाद देतात, यावरच त्यांचे राजकीय भवितव्य अवलंबून आहे. 

कोरेंना ताकद दाखवावी लागणार
शाहूवाडी-पन्हाळा मतदारसंघात आमदार सत्यजित पाटील व जनसुराज्यचे विनय कोरे यांच्यात सरळ लढत आहे. कोरे यांना ताकत दाखवावी लागणार आहे. त्यातच जनसुराज्यच्या माध्यमातून उमेदवार उभे करून त्यांनी रोष ओढवून घेतला आहे. साखर कारखान्याच्या अनुषंगाने अनेक प्रश्‍न कोरेंना त्रासदायक ठरत आहेत. या निवडणुकीचा निकाल कोरे आणि वारणा समूहाच्या अस्तित्वासाठी निर्णायक ठरणार आहे. 

संजय घाटगेंचे भवितव्य टांगणीला

अनेक वर्षे कागलात आणि जिल्ह्यात राष्ट्रवादीची सत्ता आमदार हसन मुश्रीफ यांनी अबाधित ठेवली आहे. पुन्हा एकदा कामाच्या आणि राजकीय जोडण्याच्या जोरावर ते रिंगणात आहेत, तर शाहू कारखान्याचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे हे पहिल्यांदाच विधानसभेच्या मैदानात अपक्ष म्हणून उतरले आहेत; मात्र शिवसेनेचे संजय घाटगे यांच्यासाठी ही निवडणूक निर्णायक आहे. विजयी झाले तर गटाला उभारी मिळणार आहे; मात्र पराजय झाला तर घाटगे आउट ऑफ फोकस जाण्याची शक्‍यता आहे.

यड्रावकरांची बंडखोरी यशस्वी होणार?
शिरोळमध्ये चौरंगी लढत होत असली तरी ही निवडणूक राष्ट्रवादीचे बंडखोर राजेंद्र पाटील-यड्रावकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सावकार मादनाईक यांच्यासाठी महत्त्वाची आहे. आघाडी धर्म म्हणून राष्ट्रवादीने ही जागा स्वाभिमानीला सोडली; मात्र यड्रावकर यांनी बंडखोरी करून आघाडी धर्माला तिलांजली दिली आहे. संघटनेने दुसऱ्यांदा मादनाईक यांना संधी दिली आहे. शेट्टी यांचा पराभव, संघटनेला लागलेली गळती या सर्व पार्श्‍वभूमीवर संघटनेला उभारी घेण्याच्यादृष्टीने मादनाईक यांचा विजय महत्त्वाचा आहे. 

कुपेकरांना झगडावे लागणार
चंदगडात दुसऱ्यांदा लढणाऱ्या संग्रामसिंह कुपेकर यांच्यासाठी अस्तित्वाची लढाई आहे. मागील वेळी घरातील उमेदवारीमुळे मतविभागणी झाली. यावेळी अशी परिस्थिती नाही. तसेच यावेळी कुपेकर यांना सेना-भाजपच्या युतीचे बळ मिळालेले आहे. युतीकडे तोडीस तोड उमेदवार असताना कुपेकर यांनी तिकिटात बाजी मारली आहे. त्यामुळे या संधीचे, त्यांना सोने करावे लागणार आहे. त्या तुलनेत राष्ट्रवादीकडून राजेश पाटील, जनसुराज्यकडून अशोक चराटी, तर अपक्ष म्हणून शिवाजी पाटील पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे कुपेकरांसाठीच अस्तित्वाची लढाई आहे.

के.पीं., देसाईंसाठी निर्णायक निवडणूक 
राधानगरी-भुदरगडमधून राष्ट्रवादीचे उमेदवार के.पी.पाटील, तर अपक्ष उमेदवार राहुल देसाई यांच्यासाठी ही निवडणूक निर्णायक आहे. तिकीट घेताना घरातीलच संघर्षाला पाटील यांना सामोरे जावे लागले आहे. गतवेळी विरोध करणाऱ्यांना एकत्र करण्यात के.पी. यशस्वी झाले आहेत; मात्र विजयापर्यंत जाण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागणार आहे, तर गतवेळी  देसाई गटाने नाट्यपूर्णरीत्या माघार घेतली. त्यानंतर राहुल देसाई यांनी भाजपत केलेला प्रवेश, पक्षाकडून तिकीट न मिळाल्याने केलेली बंडखोरी यामुळे देसाई गट चर्चेत आहे. पाटील व देसाई यांना अस्तित्व टिकवण्यासाठी जिवाचे रान करावे लागत आहे. तर आमदार प्रकाश आबिटकर यांना कमी वयात मिळालेली संधी, केलेले काम व तरुणातील क्रेझ विरोधकांना त्रासदायक ठरत आहे.

पकड असणाऱ्यांना झगडण्याची वेळ
जिल्ह्याच्या राजकारणात महादेवराव महाडिक, पी.एन., प्रकाश आवाडे यांचा दबदबा होता. मागील २० ते २५ वर्षे त्यांनी आपली पकड कायम ठेवली, मात्र काळाचा महिमा त्यांना बदलता आला नाही. जाता जाता एखाद्याला आमदार, खासदार आणि लाल दिवा देण्याची ताकद असणाऱ्या या नेत्यांना अलीकडच्या काळात मात्र स्वत:च्या निवडणुकीसाठी झगडावे लागत आहे. आजपर्यंत केलेल्या उलट-सुलट राजकारणाची परतफेड त्यांना करावी लागत असून, पुढील राजकीय पिढीने यातून धडा घेण्याचीच ही वेळ आहे. 

महाडिक पराभवाची हॅट्ट्रिक टाळणार?
२०१४ सालात जिल्ह्यातील सर्वाधिक भाग्यवान कुटुंब म्हणजे महाडिक. एकाच घरात दोन आमदार आणि एक खासदार, मात्र त्यांच्या या सत्तास्थानाला सुरुंग लावण्याचे काम केले सतेज पाटील यांनी. पहिल्यांदा विधान परिषदेला महादेवराव महाडिक यांचा पराभव केला. नुकताच लोकसभेला धनंजय महाडिक यांच्या पराभव करत त्यांनी निर्णायक भूमिका पार पाडली, तर आता विधानसभेच्या मैदानात आमदार अमल महाडिक यांच्या विरोधात पुतणे ऋतुराज पाटील यांना उभे करुन महाडिकांच्या पराभवाची हॅट्ट्रिक करण्यासाठी कंबर कसली आहे. त्यामुळे महाडिकांना काहीही करून हे मैदान मारावे लागेल, यात काही शंका नाही.

आवाडेंची अपक्ष खेळी 
इचलकरंजीतून अपक्ष असलेले प्रकाश आवाडे यांच्यासाठी अस्तित्वाची लढाई आहे. आवाडे यांचे विरोधक आमदार सुरेश हाळवणकर यांनी आवाडेंच्या परंपरागत सत्तेला सुरुंग लावला. महत्त्वाची सत्तास्थाने काढून घेतली. दहा वर्षे आवाडे हे सत्तेच्या रिंगणातून बाहेर आहेत. निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला रामराम ठोकत आवाडे अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. यावेळी पराभव झाला, तर पुढील राजकीय वाटचाल खुंटण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे जिंकण्यासाठी ते शर्थीचे प्रयत्न करत आहेत.

दोन्ही आवळेंची कसोटी
हातकणंगलेत शिवसेनेचे विद्यमान आमदार डॉ. सुजित मिणचेकर हॅट्‌ट्रिकसाठी प्रयत्न करत आहेत. जनसुराज्यतून अशोक माने आणि ताराराणी पक्षाचे किरण कांबळे दोन्हीही नवखे उमेदवार रिंगणात आहेत. खरी कसोटी आहे, ती काँग्रेसकडून लढणारे माजी मंत्री जयवंतराव आवळे यांचे पुत्र राजूबाबा आवळे व जनसुराज्यतून बंडखोरी करणाऱ्या राजू आवळे यांची. राजूबाबांबाना वडिलांच्या पराभवाची मालिका खंडित करण्याचे आव्हान आहे, तर राजू आवळे यांना त्यांचा गट टिकवण्याचे आव्हान आहे.

हॅट्‌ट्रीकसाठी क्षीरसागरांचा संघर्ष
कोल्हापूर उत्तरमध्ये आमदार राजेश क्षीरसागर यांना हॅट्‌ट्रीक करण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. काँग्रेसकडून नवखा उमेदवार असलेले उद्योगपती चंद्रकांत जाधव झुंज देणार नाहीत, अशी सैनिकांची अटकळ होती, ती साफ फोल ठरत असल्याचे चित्र आहे. जाधव यांना मिळत असलेला छुपा पाठिंबा दखलपात्र आहे. आजपर्यंत सेनेने कधीच हॅट्‌ट्रीक केलेली नाही. त्यामुळे क्षीरसागर यांना इतिहास घडवण्यासाठी राजकीय जोडण्या लावाव्या लागत आहेत. शिवसेनेचा उमेदवार पराभव झाला, की तो आउट ऑफ फोकस जातो, हा इतिहास आहे. त्याची पुनरावृत्ती होणार नाही, याची खबरदारी क्षीरसागर यांना घ्यावी लागणार आहे.

पी. एन. पराभवाची हॅट्‌ट्रिक टाळणार का?
अधूनमधून विविध नेत्यांची पक्ष बदलाबाबत चर्चा होते. मात्र, याला अपवाद आहेत पी.एन.पाटील. सलग दोन वेळा पाटील आमदार चंद्रदीप नरके यांच्याकडून पराभूत होऊनही त्यांच्या मतांचा गठ्ठा हलला नाही. गोकुळच्या राजकारणाचाही तिढा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत विधानसभेला मैदान मारण्याशिवाय पाटील व त्यांच्या गटाला पर्याय नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com