Vidhan Sabha 2019 : ...यासाठी महायुतीला साथ द्या; गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

कोल्हापूर - गेल्या पाच वर्षात देशात नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांनी विकासाच्या अनेक योजना आणल्या. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील सर्व जागांवर महायुतीचेच उमेदवार निवडून येतील, असा विश्‍वास आज गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला. आमदार अमल महाडिक यांच्या प्रचारासाठी आज ते येथे आले होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत माध्यमांशी संवाद साधला.

कोल्हापूर - गेल्या पाच वर्षात देशात नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांनी विकासाच्या अनेक योजना आणल्या. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील सर्व जागांवर महायुतीचेच उमेदवार निवडून येतील, असा विश्‍वास आज गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला. आमदार अमल महाडिक यांच्या प्रचारासाठी आज ते येथे आले होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत माध्यमांशी संवाद साधला.

दरम्यान, नवमहाराष्ट्र घडवण्यासाठी महायुतीला साथ द्या, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी आमदार अमल महाडिक, पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, गोकुळचे संचालक बाबा देसाई आदी यावेळी उपस्थित होते. 

मुख्यमंत्री श्री. सावंत म्हणाले, ""देशात आणि महाराष्ट्रात पहिल्यांदाच पाच वर्षे सरकारने कार्यकाल पूर्ण केला. शेती, शिक्षण, उद्योग असोत किंवा युवकांसाठीच्या विविध योजना प्रभावीपणे राबवल्या गेल्या. त्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळाला. पाच वर्षे मी सुध्दा कोल्हापुरात वास्तव्याला होतो. त्यामुळे येथील जनमाणसाचा अंदाज मला आहे. या निवडणुकीतही ते महायुतीचेच उमेदवार निवडून देतील.'' 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे जम्मू-काश्‍मिर भारताचा अविभाज्य भाग बनला असून अखंड भारत झाला आहे. मात्र, या निर्णयाला विरोधकांनी विरोध केला. मग, त्यांना जम्मू-काश्‍मिर देशात नको होते का, असा सवाल उपस्थित करून कलम 370 हटवल्यानंतर एकाही निष्पापाचा बळी गेला नाही किंवा गोळीबार झालेला नाही, असेही मुख्यमंत्री श्री. सावंत यांनी सांगितले.

ते म्हणाले, ""पाच वर्षाच्या सत्ताकाळात अनेक योजना आणल्या. अनेक मोठे निर्णय घेतले. पण, पाच वर्षात काय केले, असा प्रश्‍न विचारणाऱ्यांनी पंधरा वर्षे काय केले ? स्वच्छ भारत अभियान राबवतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देश हागणदारीमुक्त होण्यासाठी मोठे पाऊल उचलले आणि ते यशस्वीही झाले. आमदार अमल महाडिक यांनी पाच वर्षात अनेक कामे केली. विशेषतः "सीपीआर'साठी त्यांनी विशेष निधी आणला. केंद्र व राज्य सरकारच्या योजना प्रभावीपणे राबवल्या. विमानतळ सुरू झाले. लवकरच त्याचे विस्तारीकरणही होईल. त्यासाठी त्यांचा पाठपुरावा सुरू आहे.'' 

"राफेल' शस्त्रच 
राफेल विमानाची संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पूजा केली. ती योग्य आहे का, या प्रश्‍नावर मुख्यमंत्री श्री. सावंत म्हणाले, ""विजया दशमी दसऱ्याला शस्त्रपूजनाची आपली परंपरा आहे. राफेल विमान हे सुध्दा देशाच्या संरक्षणासाठीचे एक शस्त्र असून त्याची पूजा केली म्हणून काय बिघडले?'' 

पुतण्याला हरवणे सोपे 
आमदार अमल महाडिक यांनी कोल्हापूर टोलमुक्त केले. "मेक इन इंडिया', "स्टार्ट अप इंडिया'मधून लवकरच अनेक उद्योग येथे येणार आहेत. त्यांचे एकूणच काम पहाता त्यांचा विजय निश्‍चित आहे. त्यांनी गेल्या वेळी माजी मंत्र्यांचा पराभव केला. मग, आता तर त्यांच्या पुतण्याला हरवणे फारच सोपे असल्याचेही मुख्यमंत्री श्री. सावंत म्हणाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 Goa Chief Minister Pramod Sawant comment