Vidhan Sabha 2019 : गोव्याचे मुख्यमंत्री म्हणाले, महाडिक यांचे महायुतीत उज्वल भविष्य

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

कोल्हापूर - स्वत:चे खासगी दवाखाने चालविण्यासाठी सरकारी दवाखाने बंद पाडणाऱ्यांपेक्षा गरिबांसाठी सरकारी दवाखाना सक्षम करणाऱ्या आमदार अमल महाडिक यांचे महायुतीत उज्वल भविष्य आहे, पुन्हा त्यांनाच निवडून सेवेची संधी द्या, असे आवाहन गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज येथे केले.

कोल्हापूर - स्वत:चे खासगी दवाखाने चालविण्यासाठी सरकारी दवाखाने बंद पाडणाऱ्यांपेक्षा गरिबांसाठी सरकारी दवाखाना सक्षम करणाऱ्या आमदार अमल महाडिक यांचे महायुतीत उज्वल भविष्य आहे, पुन्हा त्यांनाच निवडून सेवेची संधी द्या, असे आवाहन गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज येथे केले.

आमदार अमल महाडिक यांच्या प्रचारार्थ भारतीय युवा मोर्चाने आयोजित केलेल्या "कॉफी वुईथ युथ' या कार्यक्रमात ते बोलत होते. राम मंगल कार्यालयात हा कार्यक्रम झाला. 

श्री. सावंत म्हणाले, केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील देवेंद्र फडणवीस यांचे सरकार मजबूत आहे. ते धाडसी निर्णय घेत आहेत. काश्‍मीरमधील 370 कलम रद्द करुन अखंड भारत करण्याचे काम या सरकारने केले. राज्यातील फडणवीस सरकारचीही कामगिरी चांगली आहे.

कोल्हापूर दक्षिण मतदारसंघाचे आमदार महाडिक यांनी मोठा निधी आणला आहे. कोल्हापुरात आयटी हब करण्याचे त्यांचे स्वप्न आहे. मागच्या पाच वर्षात त्यांनी अनेक कामे केली असली तरी हा कार्यकाल विकास पूर्ण करण्यासाठी पुरेसा नाही. त्यामुळे त्यांना पुन्हा पाच वर्षे काम करण्याची संधी दिली पाहिजे.

- प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

आमदार महाडिक यांनी पाच वर्षात केलेल्या कामाचा आढावा घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सहकार्यामुळे कोल्हापूरचे विमानतळ विकसित करणे, आयटी क्षेत्रात संधी उपलब्ध करणे आदी कामे केली आहेत. दक्षिण मतदारसंघाबरोबरच कोल्हापूर जिल्हा कसा विकसित करता येईल. याकडे लक्ष दिल्याचे त्यांनी सांगितले. 

अजय चौगुले यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, अशोक देसाई, पृथ्वीराज महाडिक, सुभाष रामुगडे आदी उपस्थित होते. 

विरोधक महाडिकव्देषातून बोलतात : धनंजय महाडिक 
माजी खासदार धनंजय महाडिक म्हणाले, यापूर्वी मी आणि अमल वेगवेगळ्या पक्षात होतो. आम्ही दोघेही चोरुन एकमेकाचा प्रचार करायचो. लोकसभा निवडणुकीनंतर मी स्वत: भाजपमध्ये येण्याचा निर्णय घेतला. अमल महाडिक यांनी मोठी विकासकामे या मतदारसंघात केली आहेत. त्यामुळे त्यांचे कामच त्यांना विजयापर्यंत नेणार आहे. दक्षिण मतदारसंघ म्हणजे येथे लढाई आहे. आमचे विरोधक विकासावर बोलतच नाहीत. ते महाडिकव्देषातून बोलतात. पण त्यांच्या कारकीर्दीत त्यांनी काय काम केले, हे सर्वांना माहीत आहे. त्यांनी कोल्हापुरकरांवर टोल लादला. सर्व जिल्ह्याचा विरोध असताना स्वत: टोलची पावती फाडली. दुसरा प्रकल्प थेट पाईपलाईनचा. आमच्या नातवंडाना तरी त्या पाईपलाईनमधुन पाणी मिळणार की नाही? याची शंका आहे, असा टोलाही श्री. महाडिक यांनी विरोधकांना लगावला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 Goa Chief Minister Pramod Sawant comment