Vidhan Sabha 2019 : फोन आला अन् यड्रावकरांचा एबी फाॅर्म...

Vidhan Sabha 2019 : फोन आला अन् यड्रावकरांचा एबी फाॅर्म...

शिरोळ - फोन आला आणि राजेंद्र पाटील यड्रावकर यांना देणेत आलेला पक्षाचा एबी फॉर्म चार मिनिटात काढुन घेण्यात आला. या चार मिनिटाच्या एबी फॉर्मच्या नाट्याने, राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे समर्थक तसेच संजय पाटील यड्रावकरांना गहिवरुन आले. 

पक्षाशी एकनिष्ठ राहुनही या निवडणुकीत यड्रावकरांना संघर्ष जनु पाचवीलाच पुजला आहे. गत निवडणुकीत पराभव झाल्यानंतर, पराभवाच्या दुसऱ्या दिवसापासुन राजेंद्र पाटील यांनी विधानसभेच्या निवडणुकीची तयारी केली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी यड्रावकर कुटुंबियांचे तीन पिढयांचे संबंध आहेत. शिवाय राष्ट्रवादीच्या परिवर्तन रॅलीत यड्रावकरांना आगामी विधानसभेचे तिकीट निश्‍चित दिले जाईल. त्यांच्या तिकीटाशिवाय माझा बारामतीतील फॉर्म भरणार नाही, अशी घोषणा अजित पवार यांनी केली होती. 

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभिमानी पक्षाच्या आघाडीमार्फत अनिल उर्फ सावकर मादनाईक यांना उमेदवारी जाहीर केल्या नंतर, यड्रावकर व त्यांचे समर्थक अस्वस्थ होते. अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत पक्षाचा एबी फॉर्म मिळेल, अशी अपेक्षा यड्रावकरांना होती. म्हणुन यड्रावकरांनी अर्ज दाखल करताना एक अपक्ष व एक राष्ट्रवादी काँग्रेस असे दोन अर्ज दाखल केले होते. 

दुपारी 2.56 ची वेळ, इस्लामपुराहुन राष्ट्रवादीचा एक जबाबदार कार्यकर्ता यड्रावकरांच्यासाठी एबी फॉर्म घेवुन आला. संजय पाटील, अमरसिंह पाटील, बबन यादव यांनी हा एबी फॉर्म निवडणुक कार्यालयात घेवुन गेले. राष्ट्रवादी पक्षाच्यावतीने दाखल केलेल्या अर्जास एबी फॉर्म जोडला जाणार इतक्‍यातच, त्या जबाबदार कार्यकर्त्याला फोन आला आणि त्याने दिलेला एबी फॉर्म काढुन घेतला व तो निघुन गेला. या चार मिनिटाच्या नाट्यामुळे यड्रावकर समर्थक गहिवरले आणि या निवडणुकीत संघर्ष केल्याशिवाय आमदारकी मिळणार नाही हे मनाशी ठाण मांडुन तहसिल कार्यालयाच्या आवारातुन निघुन गेले. 

धमकीमुळे एबी फॉर्म परत गेला. ..... 
आघाडीच्यावतीने शिरोळची उमेदवारी मादनाईक यांना जाहीर झाली असताना, यड्रावकरांना एबी फॉर्म दिल्यास, सांगली, कोल्हापुर, सातारा यासह कांही जागांच्या बाबतीत आमच्या पाठिंब्याचा विचार करावा लागेल, अशी धमकीच राष्ट्रवादीच्या एका जबाबदार नेत्याला एका माजी खासदाराने दिल्याची चर्चा यड्रावकर समर्थकात सुरु होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com