esakal | Vidhan Sabha 2019 : युतीपेक्षा आघाडीसमोरच आव्हानांचा डोंगर
sakal

बोलून बातमी शोधा

Kolhapur-District

कोरेंचे तळ्यात-मळ्यात
शाहूवाडी-पन्हाळा मतदारसंघात ‘जनसुराज्य’चे अध्यक्ष माजी मंत्री विनय कोरे सध्या भाजपसोबत असले, तरी विधानसभेला हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला जाणार आहे. तेथे शिवसेनेचे विद्यमान आमदार सत्यजित पाटील-सरूडकर हेच उमेदवार असतील. अशा वेळी कोरे आघाडीसोबत जाण्याची शक्‍यता आहे. आघाडीत हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला आहे. आमदार हसन मुश्रीफ आणि कोरे यांची मैत्री पाहता ते आघाडीचे उमेदवार होण्याची शक्‍यता आहे.

Vidhan Sabha 2019 : युतीपेक्षा आघाडीसमोरच आव्हानांचा डोंगर

sakal_logo
By
निवास चौगले

विधानसभा 2019 : लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर भाजप-शिवसेना युतीपेक्षा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसमोर विधानसभा निवणुकीत आव्हानांचा डोंगर असणार आहे. मागील विधानसभा निवडणुकीतील सहा जागा राखण्याची तयारी युतीने सुरू केली आहे. एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या जिल्ह्यात गेल्या निवडणुकीत एकही जागा जिंकता आली नाही; तो डाग पुसण्याचे आव्हान काँग्रेससमोर असेल. राष्ट्रवादीला आहे त्या दोन जागा राखण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. युती झाल्यास आणि युती न झाल्यासही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासाठी जास्तीत जास्त जागा जिंकणे प्रतिष्ठेचे असेल.

करवीर मतदारसंघात शिवसेना आमदार चंद्रदीप नरके आणि माजी आमदार पी. एन. पाटील, कोल्हापूर दक्षिणमध्ये भाजप आमदार अमल महाडिक आणि काँग्रेसचे आमदार सतेज पाटील या दोन पारंपरिक विरोधकांमध्ये सामना रंगणार आहे. इचलकरंजीत भाजप आमदार सुरेश हाळवणकर आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे हे पुन्हा आमनेसामने असतील.

कोल्हापूर उत्तरमध्ये शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांची हॅट्ट्रिक रोखण्यासाठी काँग्रेसकडून आमदार सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज यांचे ‘कार्ड’ बाहेर काढले जात आहे. ज्या कसबा बावडा परिसराने क्षीरसागर यांना ‘हात’ दिला, त्या भागावर ऋतुराज यांचा प्रभाव आहे.

कागलमध्ये राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांना घेरण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे. त्यासाठी त्यांच्याविरोधात एकास एक लढत घडविण्याचे प्रयत्न सुरू होते. तथापि, त्याला माजी आमदार संजय घाटगे यांनी आताच सुरुंग लावला आहे. मुश्रीफ-संजय घाटगे यांच्याबरोबरीने ‘म्हाडा’चे अध्यक्ष समरजितसिंह हेदेखील भाजपचे उमेदवार असतील. या मतदारसंघातील खासदार सदाशिवराव मंडलिक यांचा गट कोणासोबत असेल, त्यावर विजयाचे गणित अवलंबून असेल. 

चंदगडमध्ये राष्ट्रवादीच्या आमदार संध्यादेवी कुपेकर पक्षाची उमेदवारी घ्यायची का मुलगी डॉ. नंदिती बाभूळकर यांना भाजपमध्ये पाठवायचे, अशा द्विधा मनःस्थितीत आहेत. येथील माजी आमदार, माजी मंत्री भरमू पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने डॉ. बाभूळकर भाजपमध्ये गेल्या, तरी त्यांना उमेदवारीसाठी श्री. पाटील यांची संमती घ्यावी लागणार आहे.

गोपाळराव पाटील गटही भाजपसोबत आहे, तर नरसिंगराव पाटील गटाने लोकसभेवेळी शिवसेनेला साथ दिली होती.

शिरोळमध्ये आमदार उल्हास पाटील यांच्या पराभवासाठी ‘स्वाभिमानी’ने कंबर कसली आहे; त्यातून काँग्रेस-राष्ट्रवादी-स्वाभिमानी आघाडी झालीच, तर या आघाडीकडून काँग्रेसचे माजी आमदार सा. रे. पाटील यांचे पुत्र गणपतराव यांना ऐनवेळी रिंगणात उतरविले जाईल. तसे झाल्यास राष्ट्रवादीचे राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्याकडून ‘वंचित’चा पर्याय पुढे येऊ शकतो. याशिवाय, काँग्रेसकडे उमेदवारी मागितलेले ‘गोकुळ’चे अध्यक्ष दिलीप माने-पाटील, विधानसभा डोळ्यांसमोर ठेवून भाजपमध्ये गेलेले ‘गोकुळ’चे संचालक अनिल यादव यांचीही भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

राधानगरी-भुदरगड मतदारसंघात राष्ट्रवादीमधील उमेदवारीवरून जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील आणि माजी आमदार के. पी. पाटील या मेहुण्या-पाहुण्यांतच जुंपली आहे. त्यात उमेदवारी कोणाला मिळणार, त्यावर या दोघांपैकी थांबणार कोण आणि बंडखोरी करणार कोण? हे स्पष्ट होईल. युतीत हा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. शिवसेनेकडून आमदार प्रकाश अबीटकर हेच उमेदवारीचे प्रमुख दावेदार असतील. त्यामुळे विधानसभा डोळ्यांपुढे ठेवून भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी आमदारपुत्र राहुल देसाई, आघाडी झाली नाही तर काँग्रेसची उमेदवारी मागितलेले ‘गोकुळ’चे अरुण डोंगळे, माजी आमदार दिनकरराव जाधव यांचे पुत्र सत्यजित यांच्या भूमिका महत्त्वाच्या असतील.

हातकणंगलेत ‘वंचित’ने लोकसभेला ४५ हजार मते मिळवली होती, हे दुर्लक्षून चालणार नाही. विद्यमान आमदार डॉ. सुजित मिणचेकर ‘हॅट्ट्रिक’साठी प्रयत्नशील आहेत. या मतदारसंघातील जय शिवराय किसान मोर्चा, जनसुराज्य शक्ती यांची भूमिका महत्त्वाची असेल.

loading image
go to top