Vidhan Sabha 2019 : महात्‍मा फुले, सावरकरांना ‘भारतरत्‍न’ दिलाच पाहिजे

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 16 October 2019

महात्मा फुले, स्वातंत्र्यवीर सावरकर ही नररत्ने याच भूमीत जन्माला आली. त्यांना भारतरत्न मिळावा अशीच आमची मागणी आहे. मुलींना ज्या काळात शिक्षण शक्‍य नव्हते, त्या काळात महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांनी शाळा सुरू केल्या. त्यांचे ऋण मोठे आहे.

- उद्धव ठाकरे

कोल्हापूर - सत्ताभक्षक नशा डोक्‍यात घुसली की त्याचे काय होते, याचे उत्तम उदाहरण म्हणून दोन्ही काँग्रेसकडे पाहता येईल. सत्तेच्या जोरावर त्यांनी पैशांच्या तुंबड्या भरल्या. त्यांची चौकशी करायची नाही, तर करायची कोणाची? सत्तेची लालसा असणाऱ्या काँग्रेस-राष्‍ट्रवादी काँग्रेसचा विनाश अटळ असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. 

महात्मा फुले, स्वातंत्र्यवीर सावरकर ही नररत्ने याच भूमीत जन्माला आली. त्यांना भारतरत्न मिळावा अशीच आमची मागणी आहे. मुलींना ज्या काळात शिक्षण शक्‍य नव्हते, त्या काळात महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांनी शाळा सुरू केल्या. त्यांचे ऋण मोठे आहे, असेही ते म्‍हणाले.

महायुतीचे कोल्हापूर उत्तरमधील शिवसेना उमेदवार राजेश क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत श्री. ठाकरे बोलत होते. पेटाळा मैदानावर मंगळवारी (ता. १५)  रात्री ९ वाजता ही सभा झाली. या वेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार क्षीरसागर, खासदार संजय मंडलिक, उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकर, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव, राहुल चिकोडे, जिल्हाप्रमुख विजय देवणे, माजी आमदार सुरेश साळोखे, शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले, विशाल देवकुळे,  आकलाक मुजावर यांची भाषणे झाली. रवी चौगुले, बाबा पार्टे, शहरप्रमुख शिवाजी जाधव, भाजपचे विजय जाधव, अशोक देसाई, शिवाजीराव कदम, उदय पोवार, अशोक पोवार, रमेश मोरे आदी उपस्थित होते. तसेच उद्धव ठाकरे यांचे कनिष्‍ठ पुत्र तेजस ठाकरे व्‍यासपीठाशेजारी बसले होते.

नेहमीच्या ठाकरे शैलीत भाषणाला सुरवात करून उद्धव यांनी कोल्हापूरकरांना उद्देशून तुम्ही जेव्हा संकटात होता तेव्हा मी येऊ शकलो नाही. त्यामुळे मी आपली नम्रपणे माफी मागत असल्याचे सांगितले. तुम्हाला दोन पायावर चालणारे सरकार हवे आहे की, चार पावलांवर चालणारे सरकार हवे आहे, ते एकदा ठरवून घ्या. बंडखोर निवडून द्यायचे की नाही याचा विचार करा. युती सरकारने गेल्या पाच वर्षांत जी कामे केली त्यात शिवसेनेचा सिंहाचा वाटा आहे. प्रसंगी आम्ही एकमेकांच्या उरावर बसलो, पण आता गोडवे गात आहेत, असा समज तुमचा होईल. पण जी गोष्ट मला पटत नाही त्यावर मी उघड बोलतो. चंद्रकांतदादा तुम्ही सरकारमध्ये जबाबदार मंत्री आहात. शिवसेनेने कधीही सरकारला दगाफटका केला नाही किंवा सरकार अस्थिर केले नाही. जी काँग्रेस शिवसेनाप्रमुखांनी गाडली ती पुन्हा डोक्‍यावर बसू नये, याची काळजी आम्ही घेतली. शिवसेनाप्रमुखांमुळेच भगवे धुमारे महाराष्ट्रात निर्माण झाले. महाराष्ट्रातील जनता नेहमी भगव्यावर प्रेम करते.

शेतकऱ्यांचा सातबारा आम्ही कोरा केला असे सांगून ते म्हणाले, ‘‘काँग्रेस नावाचा एकेकाळी एक पक्ष होता. अशी ओळख या पक्षाची आता झाली आहे. हे नुसतेच शरीराने थकलेले नाहीत, तर खाऊन खाऊन थकले आहेत. स्वातंत्र्यलढ्यातील काँग्रेसही वेगळी होती. त्याकाळी दिग्गज नेते होते. साधीसुधी माणसे होती. महात्मा गांधी यांनी त्याचवेळी काँग्रेस विसर्जित करा, असे सांगितले होते. नंतर काँग्रेसला सत्ताप्राप्तीचा विकार जडला आणि विचार संपला. त्यांचे नेतृत्वच शिल्लक राहिले नाही. ऐन निवडणुकीत बॅंकॉकला जाणारे काय विचार देणार. आमचा विचार हा हिंदुत्ववादाचा विचार आहे. दहा रुपयांमध्ये सामान्य माणसाला, गोरगरीब जनतेला मी जेवण देणार म्हटल्यावर त्यात टीकेचे खडे कशाला टाकता. तुम्ही तुमच्या कर्माची फळे भोगता आहात. पैसे खाऊन स्वतःच्या तुंबड्या भरल्या, तुमची चौकशी करायची नाही, तर करायची कोणाची. ईडी, सीबीआयचा ससेमीरा मागे लावला की आम्ही सुडाचे राजकारण केले म्हणता; पण असे राजकारण तुम्ही केले. २००० साली शिवसेनाप्रमुखांना अटक करून महाराष्ट्र पेटवायला निघाला होता. काय गुन्हा होता त्यांचा. १९९२-९३ ला शरद पवार मुख्यमंत्री होते. त्याआधी सुधाकर नाईक मुख्यमंत्री होते. त्यावेळचा गुन्हा तुम्ही २००० साली बाहेर काढला. आठ वर्षांनंतर तुम्हाला गुन्हा आठवला. दादाभाई चाळ पेटवण्यात आली. त्यावेळी आम्ही काय बघत बसणार होतो. शिवसेनाप्रमुखांनी हिरव्या झेंड्याविरोधात मुंबईतील हिंदू वाचवला. त्यांना अटक करायची वेळ आली, तेव्हा ते स्वतः न्यायालयात हजर झाले. तुम्ही त्यांच्यासाठी बाहेरील राज्यातून पोलिस आणले. मात्र न्यायमूर्तींनी हा गुन्हा कसा काय होऊ शकतो हे सांगून फाईल तुमच्या तोंडावर भिरकावली. त्यावेळी विभागप्रमुख असणारे छगन भुजबळ हेही गप्प बसले. त्यावेळी शरद पवार तिकडे बसले होते. त्यावेळी भुजबळांचे तोंड उघडले नाही आणि आता बाळासाहेबांची अटक ही चूक होती, असे सांगत सुटले आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादीवाले ज्यावेळी आंदोलन करतील तेव्हा त्यांना मारू नका, तीही माझ्या मराठी मातीतील मुले आहेत, अशी भूमिका त्यावेळी शिवसेनाप्रमुखांनी घेऊन मनाचा मोठेपणा दाखवला. महाराष्ट्रामध्ये २८८ जागा याव्यात, ही श्रींची इच्छा असावी, मात्र राज्य आले की आपल्या दोघांनाही जबाबदारीने वागावे लागेल. आपण युती असताना आणि नसताना दोन्ही अनुभव घेतले आहेत. त्या शहाणपणातून आपण पुढे जात आहोत. हिंदुत्ववाद, भगवा, शिवशाही यांचे मातीशी इमान राखणारे आपण दोघे आहोत. त्यातून आपण महाराष्ट्र हे क्रमांक एकचे राज्य करू.’’ 

माझा आशीर्वाद असा कोणी गैरसमज करू नये 
बंडखोरांबद्दल तीव्र शब्दात टीका करताना उद्धव ठाकरे यांनी एकमेकांच्या विरोधात हे नवीन फ्याड आले आहे. मला उद्धव यांचा आशीर्वाद आहे. कोण म्हणेल मला दादांचा आशीर्वाद आहे. आणखी कोणी म्हणेल मला मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद आहे; पण आम्ही काही मुर्ख नाही, असा टोला त्यांना लगावला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर काहींनी मतदारसंघनिहाय वेगवेगळी भूमिका घेतली आहे. या पार्श्‍वभूमीवर उद्धव ठाकरे यांचा हा टोला इशारा देणारा ठरला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 Mahatma Phule, Savarkar must be given Bharat Ratna Uddhav Thackeray comment