Vidhan Sabha 2019 : चंदगडमधून राष्ट्रवादीतर्फे 'यांच्या' उमेदवारीची चर्चा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

सोमवारी सकाळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत गोकुळचे संचालक राजेश पाटील यांनी केलेला प्रवास, चंदगड विधानसभेच्या निवडणूक रिंगणात निर्णायक ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. 

कोल्हापूर - चंदगड विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादीच्या आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी लढण्यास नकार देत राजकीय संन्यासाची घोषणा केली. मात्र परत कुपेकर यांच्या कन्या डॉ. नंदाताई बाभूळकर यांनी निवडणूक लढण्याची घोषणा केली असून पक्ष मात्र नंतर ठरवण्याचे जाहीर केले आहे. भारतीय जनता पक्षातून त्या निवडणूक लढवण्याची चिन्हे आहेत. या सर्व पार्श्‍वभूमीवर सोमवारी सकाळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत गोकुळचे संचालक राजेश पाटील यांनी केलेला प्रवास, चंदगड विधानसभेच्या निवडणूक रिंगणात निर्णायक ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. 

राष्ट्रवादीने बाबासाहेब कुपेकर यांच्यानंतर आमदार संध्यादेवी कुपेकर यांच्यावर चंदगड विधानसभेची धुरा सोपवली. मात्र या विधानसभा निवडणुकीत लढण्यास आ.कुपेकर यांनी नकार दिला आहे.तसेच कुपेकर यांच्या कन्या डॉ. नंदाताई बाभूळकर यांना राष्ट्रवादीकडून या निवडणुकीत उतरण्याची केलेली सुचनाही फेटाळण्यात आली आहे. दरम्यान कुपेकरांचा राजकीय संन्यास व पुन्हा डॉ. बाभूळकर यांनी निवडणूक लढण्याची केलेली घोषणा व राष्ट्रवादीशी अंतर ठेवत भाजपात जाण्याची केलेली तयारी, यामुळे राष्ट्रवादीनेही आपल्या हालचाली गतीमान केल्या आहेत. 

प्रा. एन. डी. पाटील यांची तब्येत ठिक नसल्याने रविवारी रात्री शरद पवार यांचे कोल्हापुरात आगमन झाले. प्रा.पाटील यांच्या तब्येतीची विचारपूस करुन ते परत मुंबईला जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र पवार यांनी कोल्हापुरात मुक्‍काम ठोकला. यावेळी पवार यांना भेटण्यासाठी गोकुळचे संचालक राजेश पाटील उपस्थित होते. गेले काही वर्षे पाटील हे चंदगड विधानसभेसाठी तयारी करत आहेत. वडिल माजी आमदार नरसिंगराव पाटील यांनी पवार यांच्यासोबत बराच काळ काम केले आहे. पाटील यांचा या मतदार संघात मोठा गट आहे. तसेच कॉंग्रेसचेही राजेश पाटील यांच्या नावाला पसंती आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर त्यांनी पवार यांची भेट घेतली. त्यावेळी पवार यांनी त्यांना सोमवारी सकाळी परत भेटण्यास सांगितले. 

सोमवारी सकाळी पवार हे परतीच्या प्रवासाला निघाले असताना त्यांनी राजेश पाटील यांना आपल्या सोबत घेतले. चंदगड विधानसभा मतदार संघातील सद्यस्थिती, गट - तट, राजकीय समिकरणे याची माहिती घेतली. किणी टोल नाक्‍यापर्यंत पाटील हे पवार यांच्यासोबत होते. या मतदार संघावर घटक पक्षांनीही दावा केला आहे. त्याबाबत आज मुंबईत चर्चा होणार आहे. कोणत्याही परिस्थिती राष्ट्रवादी या मतदार संघातून ताकतीने लढणार असून कुपेकर यांनी राष्ट्रवादीतून लढण्यास नकार दिला तर राजेश पाटील यांच्या गळ्यात राष्ट्रवादीच्या उमेदवारीची माळ पडण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 Rajesh Patil will fight from NCP in Chandgad constituency