Vidhan Sabha 2019 : सांगलीतील बंड रोखण्याची जबाबदारी चंद्रकांतदादांवर 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 ऑक्टोबर 2019

सांगली - भाजप - शिवसेना महायुतीपुढे जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदार संघातील बंडखोरी रोखण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. पैकी इस्लामपूर येथे नगराध्यक्ष निशिकांत पाटील तर जतमध्ये डॉ. रवींद्र आरळी यांची समजूत काढण्याची प्रक्रिया गतीमान झाली आहे. महसूलमंत्री तथा प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी स्वतःकडे ती जबाबदारी घेतली आहे.

सांगली - भाजप - शिवसेना महायुतीपुढे जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदार संघातील बंडखोरी रोखण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. पैकी इस्लामपूर येथे नगराध्यक्ष निशिकांत पाटील तर जतमध्ये डॉ. रवींद्र आरळी यांची समजूत काढण्याची प्रक्रिया गतीमान झाली आहे. महसूलमंत्री तथा प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी स्वतःकडे ती जबाबदारी घेतली आहे. सांगलीत जिल्हा परिषद सदस्य शिवाजी डोंगरे यांच्या बंडखोरीबाबत मात्र पक्ष फार गांभिर्याने पाहत नसल्याचे चित्र समोर आले आहे. 

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत उद्या (ता. 7) आहे. मैदानात कोण-कोण असणार, याचा निर्णय होणार आहे. युतीत इस्लामपूरची जागा शिवसेनेच्या वाट्याला गेली. तेथे हुतात्मा समुहातील गौरव नायकवडी उमेदवार आहेत. भाजपकडून लढण्याची तयारी केलेल्या निशिकांत पाटील यांनी बंडाचे निशाण फडकावले आहे. मोठे शक्तीप्रदर्शन करत त्यांनी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे "लढणारच' अशा तयारीत ते आहेत.

जतमध्ये आमदार विलासराव जगताप यांच्या विरोधात मोट बांधून पाच प्रमुख नेत्यांनी बंड केले होते. डॉ. आरळी यांना उमेदवार म्हणून पुढे करीत बंडाचा झेंडा फडकत ठेवला आहे. ते स्थानिक विकास आघाडीचे उमेदवार म्हणून समोर आलेत. 
इस्लामपूर येथे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या विरोधात एकास एक लढत उभी करण्याचा मनसुभा ढासळताना दिसतोय. त्यामुळे निशिकांत यांना थांबवून शिवसेनेसोबत युतीधर्म पाळण्याचे भाजपसमोर मोठे आव्हान आहे.

जतमध्ये डॉ. आरळी यांना थांबवले नाही तर भाजपला मोठा फटका बसू शकतो, असे राजकीय समीकरण पुढे येत आहे. त्यामुळे जास्त लक्ष तिकडे केंद्रीत करण्यात आले आहे. डॉ. आरळींच्या पाठीशी जगताप यांच्यापासून दुरावलेल्या नेत्यांनी ताकद उभी केली आहे. त्यामुळे ते माघार घेणार का, याकडे लक्ष असेल. 

मी माझे काम करतोय 

सांगलीतील भाजपचे उमेदवार सुधीर गाडगीळ हे शहर जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांच्याच पक्षातून शिवाजी डोंगरे यांनी अर्ज भरून बंड केले आहे. श्री. गाडगीळ म्हणाले, ""मी सध्या माझे काम करतोय. अन्य विषयांची जबाबदारी नेत्यांनी घेतली आहे. मी त्यात लक्ष घातलेले नाही.'' 

"निशिकांत पाटील आणि डॉ. रवींद्र आरळी यांच्याशी माझा संपर्क सुरु आहे. महसूलमंत्री चंद्रकातदादा स्वतः या दोघांशी संपर्कात आहेत. गरज लागलीच तर स्वतः मुख्यमंत्री बोलतील, मात्र बंडखोरी टाळण्यासाठी आमचा ताकदीने प्रयत्न सुरु आहे. ती होणार नाही, असा विश्‍वास आहे.'' 

- पृथ्वीराज देशमुख, 
जिल्हाध्यक्ष, भाजप 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 responsibility to stop Rebellion in Sangli on Chandrakant Patil