Vidhan Sabha 2019 : ‘आमचं ठरलंय, आता दक्षिण उरलंय’

Vidhan Sabha 2019 :  ‘आमचं ठरलंय, आता दक्षिण उरलंय’

कोल्हापूर - नुसतं ‘आमचं ठरलंय’ असे म्हटले तर लोकसभा निवडणुकीत तुमचा दोन लाख ७० हजार मतांनी ‘कार्यक्रम’ झाला. मी कुस्ती चितपट करून दाखविली. विश्‍वासघातकीचे राजकारण करणाऱ्याने नीतिमत्तेच्या गप्पा मारू नयेत. मतांच्या रूपाने वळवाचा पाऊस नव्हे, तर ढगफुटी झाली, अशा शब्दांत आमदार सतेज पाटील यांनी आज माजी खासदार धनंजय महाडिक यांचे नाव न घेता समाचार घेतला. ‘आमचं ठरलंय, आता दक्षिण उरलंय’ असा टोलाही त्यांनी मारला. काँग्रेसचे उमेदवार ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ कंदलगाव येथे सभेत ते बोलत होते.

सतेज पाटील म्हणाले, ‘‘माजी खासदारांना आमच्या नीतिमत्तेविषयी बोलण्याचा काय अधिकार आहे? कुठल्या तोंडाने बोलता तुम्ही? सकाळी उठल्यानंतर मफलर राष्ट्रवादीचा अडकवू की भाजपचा, अशी तुमची अवस्था आहे. तुमचं खरं रूप काय आहे? तुमच्या कुटुंबाचे काय कर्तृत्व आहे? आनंदराव पाटील-चुयेकर यांनी स्थापन केलेला गोकुळ संघ घशात घातला. नुसतं ‘आमचं ठरलंय’ असे म्हटले तर लोकसभा निवडणुकीत तुमचा दोन लाख ७० हजार मतांनी ‘कार्यक्रम’ झाला. लग्न ‘राष्ट्रवादी’सोबत आणि संसार भाजपसोबत करणाऱ्यांनी हिंमत असेल तर दहाही मतदारसंघांत फिरून युतीधर्म पाळावा.

विश्‍वासघात हे तुमचे ब्रीदवाक्‍य आहे. तुम्ही ज्या वेळी भाजपमध्ये प्रवेश केला, त्या वेळी त्यांच्याकडून १०० रुपयांचा स्टॅम्प लिहून घ्या, की ते पाच वर्षे पक्षात राहणार आहेत का, असे मी पालकमंत्र्यांना सांगितले. सहीची खात्री करा, असेही सांगितले. उद्या म्हणतील ही माझी सही नव्हतीच.’’

आमदारांनी बिनकार्यकर्त्यांचे फिरावे. आमदार हुडका आणि बक्षीस मिळवा, असे सांगून पाटील म्हणाले, ‘‘बंटी पाटील नुसता फिरला तरी तीन वर्षांचे मूल म्हणते, की बंटी पाटील आले. लॉटरी लागून आमदार झालेल्यांना साधे खड्डेही भरता आले नाहीत. ज्या योजना पुढे न्यायला हव्या होत्या, त्या नेल्या नाहीत. बाळाचा पायगुण एवढा चांगला, की वस्तूंचे भाव गगनाला भिडले. ’’

महाडिक गटाचे कार्यकर्ते का सोडून गेले, याचे त्यांनी आत्मचिंतन करावे. महाडिक ज्या पायरीवरून पुढे जातात ती पायरी विसरत नाहीत, असे म्हणतात. पायरीला ते विसरत नाहीत तर पायरीच तोडून टाकतात. आता नैतिकतेच्या गप्पा मारतात. फुलेवाडी रिंगरोडचे काम रखडल्याने आमदार उपोषणास बसतात, यापेक्षा दुर्दैव ते काय? तुम्हाला मतदारसंघाचे प्रश्‍न कळत नाहीत की सरकारमधून काढून टाकले, हेच समजत नाही. ज्याने माझ्याविरोधात पोराला उभे केले त्या बापाची आमदारकीच मी काढून घेतली. तुम्ही फक्त पैशांचे नाते जोडले आणि आम्ही विकासकामांशी. या मतदारसंघातील अमल लवकरच दूर होऊन नवा ऋतू येईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

शशिकांत खोत, युवराज गवळी, राजू लाटकर, प्रा. विश्‍वास देशमुख, विनय काळे आदींची भाषणे झाली. सरपंच अर्चना पाटील, विलास कांबळे, मंगल भोसले, सुजाता अतिग्रे, पांडुरंग कांबळे, दगडू रणदिवे, शिवाजी निर्मळ, शिवाजी रणदिवे उपस्थित होते. सेनेच्या कार्यकर्त्यांनी ऋतुराज यांना पाठिंबा जाहीर केला.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com