Vidhan Sabha 2019 : स्मृती इराणी म्हणाल्या, घरात साफसफाई करतो, तसे काँग्रेस साफ करा

Vidhan Sabha 2019 : स्मृती इराणी म्हणाल्या, घरात साफसफाई करतो, तसे काँग्रेस साफ करा

सांगली - काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सरकारने पंधरा वर्षात जनतेच्या विकासाचा आवाज दाबण्याचे काम केले. त्यांना प्रगतीची संधी नाकारली गेली. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत दिवाळीला आपण जसे घरात साफसफाई करतो तसे काँग्रेसला साफ करुन महाराष्ट्र काँग्रेसमुक्त करा, असे आवाहन केंद्रीय महिला बालविकास आणि वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी आज येथे बोलताना केले. 

सांगली विधानसभा मतदार संघातील भाजपचे उमेदवार सुधीर गाडगीळ यांच्या प्रचारार्थ केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांची सांगलीत मारुती चौकात सभा आयोजित केली होती. यावेळी त्यांनी काँग्रेसवर टीकेची झोड उठवतानाच राष्ट्रवादीचे घड्याळ बंद पडले आहे. त्यांच्याबद्दल वेळ घालवणार नाही, असा टोमणा हाणला.

खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, ज्येष्ठ नेते माजी आमदार संभाजी पवार, आमदार पृथ्वीराज देशमुख, महापौर संगीता खोत, प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर आदी प्रमुख नेते उपस्थित होते. 

मंत्री स्मृती इराणी म्हणाल्या, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने महायुतीला प्रश्‍न विचारणाऱ्यांनी स्वत: सत्तेत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक का केले नाही? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक का केले नाही? काँग्रेसने 70 वर्षात देशात काही केले नाही याची कबुली राहुल गांधींनी दिली आहे. विरोधकांचा केंद्रबिंदू गांधी परिवार आहे. पण आम्ही धरती, जनता यांना केंद्रबिंदू मानले असल्याचे त्या म्हणाल्या. 

"राहूल गांधींनी दिल्ली विद्यापीठात जाऊन भारताचे तुकडे होण्याचे समर्थन केले. मात्र भाजपचे सदस्य 370 कलम हटवून देश अखंड ठेवण्यासाठी काम करत होते. या देशात प्रथमच सैन्याला त्यांच्या ऊरी, बालाकोटमधील सर्जिकल स्ट्राईकच्या शौर्याचा पुरावा मागितला गेला. देशाचे तुकडे करण्याची चर्चा करणाऱ्यांच्या विरोधात आमची लढाई आहे

- स्मृती इराणी 

त्या म्हणाल्या, " महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस सरकारने 50 लाख शेतकऱ्यांचे 24 हजार कोटींचे कर्ज माफ केले. शेतकऱ्यांचा सन्मान करणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या नावाने ही कृषी सन्मान योजना केली. मात्र अमेठीत शेतकऱ्यांची जमीन हडपकरणारे राहूल गांधी महाराष्ट्रात येवून शेतकऱ्यांवर बोलतात हा विरोधाभास आहे. फडणवीस सरकारने महाराष्ट्रात 25 हजार मेगावॅट वीजेचे उत्पादन केले आहे. तर पावणेचार लाख कोटी रुपये विदेशी गुंतवणूक राज्यात आली आहे.' 

इराणी म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात महिलांसाठी अकरा कोटी प्रसाधनगृहे उभारली. तर महाराष्ट्रात 60 लाख प्रसाधनगृहे उभारली. विरोधकांनी महिला बचतगटांची निर्मिती राजकारणासाठी केली. मात्र फडणवीस सरकारने राज्यात पाच लाख महिलांचे बचतगट बनवले. त्यांच्या माध्यमातून दोन लाख कोटी रुपये महिलांना दिले.' 

यावेळी आमदार सुधीर गाडगीळ यांनी सांगलीचा आणखी विकास करण्यासाठी मला पुन्हा एकदा संधी द्यावी असे आवाहन केले.

खासदार संजय पाटील म्हणाले, सुधीर गाडगीळ यांनी गेल्या पाच वर्षात गट तट पक्ष न पाहता सर्वसामान्यांची कामे केली. त्यांच्या पाठिशी मतदारांनी ताकद उभी करावी.' 

माजी आमदार नितीन शिंदे, दिनकर पाटील, राजाराम गरुड आदी उपस्थित होते.  
 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com