Vidhansabha2019 : कोल्हापुरात काँग्रेसकडून उमेदवारीसाठी 'यांचे' शक्तीप्रदर्शन

Vidhansabha2019 : कोल्हापुरात काँग्रेसकडून उमेदवारीसाठी 'यांचे' शक्तीप्रदर्शन

कोल्हापूर - विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसतर्फे झालेल्या इच्छुकांच्या मुलाखतीदरम्यान आमदार सतेज पाटील, माजी आमदार पी. एन. पाटील, आमदार सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज, माजी महापौर सागर चव्हाण, माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्या पत्नी सौ. संगीता यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारीची मागणी केली. 

पक्षाचे निरीक्षक साताऱ्याचे आमदार आनंदराव पाटील, अजय छाजेड यांच्या उपस्थितीत काँग्रेस कमिटीत या मुलाखती झाली. मुलाखतीच्या निमित्ताने झालेल्या शक्तिप्रदर्शनामुळे बऱ्याच वर्षांनी काँग्रेस कमिटीचा परिसर कार्यकर्त्यांनी फुलून गेला. या वेळी कार्यकर्त्यांनी पक्षासह आपल्या नेत्यांच्या विजयाच्या घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. भर पावसात कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण आले होते. 

कोल्हापूर उत्तरमधून सर्वाधिक आठ, तर राधानगरीतून सहा इच्छुकांनी पक्षाकडे उमेदवारी मागताना पक्ष देईल त्याच्या मागे उभे राहण्याचे आश्‍वासन दिले. राधानगरी विधानसभा मतदारसंघापासून मुलाखतीला सुरवात झाली. १९९९ मध्ये राधानगरी मतदारसंघ काँग्रेसने जिंकला होता. तेव्हापासून काँग्रेसचे वर्चस्व या मतदारसंघावर आहे. ‘राष्ट्रवादी’सोबत आघाडी झाल्यास हा मतदारसंघ त्यांना न देता तो काँग्रेसकडे घ्यावा, काँग्रेसकडे सक्षम उमेदवार निवडणूक लढण्यास तयार असल्याचे निवेदन भुदरगडचे तालुकाध्यक्ष शामराव देसाई यांनी निरीक्षकांना दिले. त्यानंतर कोल्हापूर उत्तरच्या मुलाखती झाल्या. 

उत्तरचे इच्छुक ऋतुराज पाटील म्हणाले, की उत्तरमधून अनेकांची मागणी आहे. मी स्वतः युवा कार्यकर्त्यांना घेऊन काम करीत आहे. विविध प्रश्‍नांच्या माध्यमातून पक्षाचे काम मी करतोय. त्यामुळेच महापालिकेत पक्षाला चांगले दिवस आले आहेत. उमेदवारी मिळविण्यामागे कोणताही स्वार्थ नाही, पण संधी दिली तर त्याचे सोने करण्याची तयारी आहे. आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली काम करीत असताना काँग्रेस हा पक्ष पुढे गेला पाहिजे, एवढीच अपेक्षा आहे. आमच्यापैकी कोणालाही उमेदवारी दिली तर त्याचे काम निष्ठेने करू.

या वेळी सचिन चव्हाण, सागर चव्हाण यांचीही भाषणे झाली. श्री. चव्हाण यांना उमेदवारी देण्याची मागणी माजी उपमहापौर विक्रम जरग यांनी केली; तर ऋतुराज पाटील यांना उमेदवारी दिली तर त्यांचा विजय निश्‍चित असल्याचे उपमहापौर भूपाल शेटे, नगरसेवक अशोक जाधव, माधुरी लाड, गणी आजरेकर यांनी या वेळी सांगितले. ऋतुराज यांच्या समर्थनासाठी स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख, सभापती श्रावण फडतारे, नगरसेविका वृषाली कदम, नगरसेवक राहुल माने, डॉ. संदीप नेजदार यांच्यासह महापालिकेतील काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते. 

करवीरमधून पी. एन. पाटील यांना उमेदवारी देण्याची मागणी तालुकाध्यक्ष शंकरराव पाटील यांनी केली. पक्षाबरोबर जनता निष्ठेने राहते, पण व्यासपीठावरील नेत्यांनी एकजुटीने काम केले तर दोन्ही काँग्रेसला जिल्ह्यात चांगले दिवस आल्याशिवाय राहणार नाहीत, असे श्री. पाटील म्हणाले.

कोल्हापूर दक्षिणमधून आमदार सतेज पाटील यांनी पक्षाकडून उमेदवारी मागितली. त्यांच्या उमेदवारीचा विचार करावा, नेत्यांनी त्यासाठी एकसंघ राहावे, असे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य एकनाथ पाटील म्हणाले. करवीरचे माजी सभापती प्रदीप झांबरे यांनीही आमदार पाटील यांना उमेदवारी देण्याची जोरदार मागणी केली. 

या मुलाखतीवेळी महाराष्ट्राच्या प्रभारी सोनल पटेल, जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे, माजी आमदार पी. एन. पाटील, दिनकरराव जाधव, माजी खासदार जयवंतराव आवळे, ॲड. सुरेश कुराडे, शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सुप्रिया साळोखे, शहराध्यक्षा संध्या घोटणे, ग्राहक सेलचे संजय पवार-वाईकर, आर. के. देवणे, एस. के. माळी, प्रकाश सातपुते आदी उपस्थित होते. 

आमच्या ताकदीवर तयारी - खाडे
काँग्रेसचा जिल्ह्याचा इतिहास ज्यावेळी लिहिला जाईल आणि निष्ठावंतांची यादी तयार होईल, त्यात पी. एन. पाटील यांचे नाव आघाडीवर असेल. जिल्ह्यातील काँग्रेस वाढीसाठी त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले. पक्षहिताची भूमिका घेऊन श्री. पाटील काम करीत आहेत. पण, या वेळी आम्ही आमच्या ताकदीवर निवडून येण्याची तयारी केली आहे. सर्वांनी एकसंधपणे काम केल्यास पक्षाला चांगले दिवस येतील, असे ‘गोकुळ’चे संचालक बाळासाहेब खाडे यांनी सांगितले. 

अजूनही खानविलकर डोक्‍यात
करवीरचे तालुकाध्यक्ष शंकरराव पाटील हे भाषणावेळी २०१९ चा करवीरचा आमदार हे दिग्विजय असतील असे म्हणणार तोच त्यांच्या लक्षात आपली चूक आली. चूक सुधारत त्यांनी पी. एन. हेच आमदार होतील, असे सांगितले, त्यावर सभागृहात हास्याचे फवारे उडाले. त्यांच्या डोक्‍यातून दिग्विजय खानविलकर जात नाहीत, असा टोला आमदार पाटील यांनी या वेळी लगावला. 

धनदांडग्यांचा विचार
शिरोळ मतदारसंघातून ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष दिलीप पाटील यांनी उमेदवारी मागितली. गेली अनेक वर्षे आपण पक्षाशी एकनिष्ठ आहोत, दरवेळी मी उमेदवारी मागतो; पण पक्षाकडून नेहमी धनदांडग्या उमेदवारांचा विचार होतो, असा टोला त्यांनी लगावला. या मतदारसंघातून गणपराव पाटील हेही इच्छुक आहेत. आमच्यापैकी कोणालाही उमेदवारी दिली तरी चालेल, असे ते म्हणाले.

खबरदारी घेऊन उमेदवारी द्या
निष्ठावंत म्हणून मी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. ऋतुराज पाटील यांनी उशिरा ‘उत्तर’मधून अर्ज नेला. त्यांचासारखा सक्षम उमेदवार उमेदवारी मागत असेल तर त्याचा प्राधान्याने विचार करावा. ‘उत्तर’ची जागा राष्ट्रवादी मागत आहे, पण कोणत्याही परिस्थितीत ही जागा सोडू नये, काँग्रेस ही जागा जिंकू शकते. आमदार सतेज पाटील यांच्या घरातील उमेदवारांचा प्राधान्याने विचार करावा. निवडणुकीनंतर कर्नाटकात जे घडले ते महाराष्ट्रात घडू नये, याची खबरदारी घेऊन उमेदवारी द्यावी, अशी मागणी प्रदेश सरचिटणीस नगरसेवक तौफिक मुल्लाणी यांनी केली. 

क्षीरसागर हॅट्ट्रिक करणार नाहीत
आंदोलनामुळेच कोल्हापूर उत्तरमधून आमदार राजेश क्षीरसागर विजयी झाले. एक आंदोलकच दुसऱ्या आंदोलकाला तोंड देऊ शकतो, असे सांगत किसान सेलचे प्रदेशाध्यक्ष संजय पाटील यांनी उमेदवारी मागणी केली. पण, या वेळी काँग्रेसकडे सक्षम उमेदवार असल्याने श्री. क्षीरसागर हॅट्ट्रिक करणार नाहीत, काँग्रेसचा उमेदवार २५ हजार मतांनी विजयी होईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. 

ओबीसी सेलचा बहिष्कार
मुलाखतीपूर्वी पक्षाचे सर्व पदाधिकारी व विविध विभागांच्या प्रमुखांची आसनव्यवस्था निश्‍चित करण्यात आली होती. खुर्चीवर नावाच्या पट्ट्या लावण्यात आल्या होत्या. त्यात काँग्रेसच्या ओबीसी सेलचा उल्लेखच नसल्याने जिल्हाध्यक्ष उमेश पोर्लेकर यांनी निषेध व्यक्त करून या बैठकीवरच बहिष्कार घातला. पक्षाला ओबीसीची गरज नाही का, असा संतप्त सवालही त्यांनी उपस्थित केला. 

‘गोकुळ’च्या अध्यक्षांची उपस्थिती
‘गोकुळ’वर माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे नेतृत्त्व आहे. सध्या श्री. महाडिक हे भाजपबरोबर असताना संघाचे अध्यक्ष रवींद्र आपटे यांनी मात्र या मुलाखतीला हजेरी लावून सर्वांनाच आश्‍चर्याचा धक्का दिला. राधानगरीच्या मुलाखती झाल्यानंतर ते निघून गेले. पण, त्यांची उपस्थिती चर्चेचा विषय ठरली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com