Vidhan Sabha 2019 : डॉ. नंदिनी बाभूळकर यांच्या मार्गात काटेच अधिक

Vidhan Sabha 2019 : डॉ. नंदिनी बाभूळकर यांच्या मार्गात काटेच अधिक
Updated on: 

चंदगड - भाजपचे कमळ हाती धरू इच्छिणाऱ्या डॉ. नंदिनी बाभूळकर यांच्या मार्गात काटेच अधिक असल्याची चर्चा आहे. चंदगड विधानसभा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला असून, पक्षश्रेष्ठी ही जागा सोडण्यास तयार नसल्याचे समजते. ऐनवेळी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती धरायचा म्हटले तर शिवसैनिकांना तो कितपत रुचेल आणि यातून नेमके ध्येय साधले जाईल का, याविषयी साशंकता आहे.

डॉ. बाभूळकर यांच्या आई संध्यादेवी कुपेकर यांनी पोटनिवडणूक आणि त्यानंतरच्या पंचवार्षिक निवडणुकीत विधानसभेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतिनिधित्व केले. मात्र, गेल्या पाच वर्षांत त्यांचे पक्षाच्या जिल्हास्तरीय नेत्यांशी संबंध ताणले गेले. त्यातच एव्हीएच प्रकल्पाच्या विरोधात उभारलेल्या जनआंदोलनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगला प्रतिसाद दिला. फडणवीस यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे हा प्रकल्प हद्दपार करणे सोपे झाले. त्यावेळेपासून डॉ. बाभूळकर यांची भाजपशी जवळीक झाली. 

केंद्रात आणि राज्यात भाजपचे वाढते प्राबल्य पाहता पक्षात प्रवेश करणाऱ्यांची रीघ लागली आहे. एकूणच राजकीय परिस्थिती पाहता डॉ. बाभूळकर यांनीही या पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्यादृष्टीने त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधून मते आजमावली. मात्र, प्रवेश करण्यापूर्वी त्यांना आमदारकीच्या तिकिटाचा शब्द पाहिजे होता, तर भाजप श्रेष्ठी प्रथम प्रवेश करा, असे सांगत होते. यामुळे निर्णयाला विलंब होत गेला. सध्या मतदारसंघात गोपाळराव पाटील हे आधीपासून पक्षाचे काम करत आहेत. त्यातच माजी राज्यमंत्री भरमू पाटील यांनीही पक्ष प्रवेश केल्याने पक्षाची स्थिती मजबूत झाली आहे.

दरम्यान, शिवसेना-भाजप युती झाल्यास ही जागा शिवसेनेच्या वाट्याला असून, ती सोडण्यास सेना तयार नाही. यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर भाजप नेत्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्याचे समजते. मात्र, त्यांनी ही जागा कोणत्या स्थितीत शिवसेनेकडेच हवी, असे सांगितले आहे. त्यावर डॉ. बाभूळकर यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली असल्याचे सांगितले जाते.

शिवसेनेत डॉ. बाभूळकर यांचे चुलत भाऊ संग्रामसिंह कुपेकर, प्रभाकर खांडेकर व सुनील शिंत्रे यांनी फिल्डिंग लावली आहे. त्यामुळे त्यांना नाराज करून ऐनवेळी आलेल्या उमेदवाराला तिकीट देणे शिवसेना श्रेष्ठींना परवडणारे नाही. या स्थितीत डॉ. बाभूळकर यांची मोठी अडचण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चर्चिली जात आहे. एक मात्र खरे, त्यांच्या निर्णयावर मतदारसंघातील अन्य पक्षाचे उमेदवार निश्‍चित होणार आहेत. त्यामुळे सध्याची राजकीय संभ्रमावस्थेची कोंडी फोडण्यासाठी त्यांच्या निर्णयाची वाट पाहावी लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Miraj Ganesh Visarjan Political Controversy
Bomb Detection Squad Miraj ganeshotsav
Rare Smooth-Coated Otters Spotted in Sangli
Miraj Ganeshotsav 2026
Marathi News Esakal
www.esakal.com