Vidhansabha 2019 : निकालानंतर विधानसभेची गणिते

Nagar-Vidhansabha
Nagar-Vidhansabha

नगर लोकसभा मतदारसंघ आणि त्या मतदारसंघातील विधानसभा निवडणुका यांचा आतापर्यंत फारसा संबंध नव्हता. या वेळी चित्र वेगळे आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय यांच्या भाजप प्रवेशामुळे नगर लोकसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणे पुरती बदलली आहेत. साहजिकच, त्यांचा राजकीय प्रभाव व उपद्रवमूल्य विचारात घेता लोकसभेच्या निकालानंतरच या मतदारसंघातील विधानसभेची गणिते निश्‍चित होतील, असे दिसते.

लोकसभेच्या निकालानंतर ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचाही भाजप प्रवेश होऊ घातला आहे. या मतदारसंघातील सर्व सहाही विधानसभा मतदारसंघांमधील काँग्रेसचे अस्तित्व विखेंनी जवळजवळ संपवल्यात जमा आहे. तरीही विधानसभेच्या निवडणुकीवेळेपर्यंत काय उलथापालथी होतात, बेरीज-वजाबाकीची गणिते होतात, यावर खूप काही अवलंबून असेल.

नगर शहर विधानसभा मतदारसंघातील आमदार संग्राम जगताप स्वत:च लोकसभेचे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार आहेत. जगताप लोकसभेत गेल्यास नगर शहर विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त होईल, ही अटकळ लक्षात घेऊन विविध पक्षांतील इच्छुकांनी जगताप यांच्या विजयासाठी नाईलाजाने ‘हातभार’ लावल्याचे सांगण्यात येते. जगताप यांना लोकसभेत अपयश आल्यास साहजिकच त्यांना विधानसभेलाही सहानुभूती राहील. युती आणि आघाडी कायम राहिल्यास पुन्हा जगताप विरुद्ध शिवसेना उपनेते अनिल राठोड असा रंगतदार सामना होईल. 

राहुरीत भाजपचे विद्यमान आमदार शिवाजी कर्डिले विरुद्ध राहुरीचे नगराध्यक्ष व माजी मंत्री जयंत पाटील यांचे भाचे प्राजक्त तनपुरे यांच्यात कोण बाजी मारणार हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरेल. विखेंचा मोठा प्रभाव या मतदारसंघात असल्याने लोकसभेत ऐनवेळी जावई संग्राम जगताप यांचा छुपा प्रचार कर्डिलेंनी केल्याप्रकरणी विखेंची भूमिका काय राहील, हेही महत्त्वाचे आहे. पारनेरमध्ये विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी यांना या वेळीदेखील राष्ट्रवादीतील बंडाळीचा फायदा होईल, असे दिसते. 

श्रीगोंदे हा मतदारसंघ जिल्ह्यात सर्वात ‘हॉट’. आमदार राहुल जगताप, अनुराधा नागवडे, घनश्‍याम शेलार या इच्छुकांच्या भाऊगर्दीत आपली लॉटरी लागण्याची तयारी भाजप नेते बबनराव पाचपुते यांनी चालवली आहे. कर्जत-जामखेडमध्ये पालकमंत्री राम शिंदे आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांच्यातील संभाव्य सामना रंगतदार ठरेल.  

पाथर्डी-शेवगाव विधानसभा मतदारसंघात लोकसभेला विखेंसाठी भाजप आमदार मोनिका राजळे यांनी, तर जगताप यांच्यासाठी माजी आमदार व जयंत पाटील यांचे मेव्हणे चंद्रशेखर घुले यांनी जोरदार मोहीम हाती घेतली होती. हर्षदा काकडे यांनीही जगताप यांच्या पारड्यात अचानकपणे आपले वजन टाकले. विधानसभेला लढत कोणामध्ये होणार, हे स्पष्ट झाल्यानंतरच तेथील राजकीय चित्रावर भाष्य करणे योग्य राहील.

असे आहेत पक्षनिहाय इच्छुक 
भाजप -
राम शिंदे, बबनराव पाचपुते, मोनिका राजळे, बाबासाहेब वाकळे, नामदेव राऊत, विश्‍वनाथ कोरडे, अश्‍विनी थोरात, सुवेंद्र गांधी, दीपाली सय्यद, अभय आव्हाड, ॲड. अभय आगरकर. 

राष्ट्रवादी - संग्राम जगताप, राहुल जगताप, रोहित पवार, ॲड. उदय शेळके, सुजित झावरे, अभिषेक कळमकर, नीलेश लंके, राजेंद्र फाळके, राजेंद्र कोठारी, चंद्रशेखर घुले, प्रताप ढाकणे, हर्षदा काकडे, घनश्‍याम शेलार, प्रशांत गायकवाड. 

काँग्रेस - सत्यजित तांबे, राहुल शिंदे, राहुल झावरे, डॉ. भास्कर शिरोळे, अनुराधा नागवडे, राजेंद्र नागवडे. 

शिवसेना - अनिल राठोड, विजय औटी, संभाजी कदम, दिलीप सातपुते, अनिल शिंदे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com