Vidhansabha 2019 : विखे-थोरात सामना रंगणार

ॲड. डॉ. बाळ ज. बोठे पाटील
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

नगरमध्ये युतीची शक्‍यता
नगरमध्ये शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड व राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्यात या वेळीही सामना होईल. गेल्या वेळी युती न झाल्याने राठोड यांचा पराभव झाला. आता युती होण्याची आशा पल्लवीत झाल्याने राठोड यांच्या अपेक्षा उंचावल्यात. जगताप यांनीही सहा महिन्यांपासून भाजप- शिवसेना युतीशी सामना करण्यासाठी मोर्चेबांधणी चालविली आहे. राहुरीत भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्याविरुद्ध राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपुरे यांच्यातील सामना चांगलाच रंगणार आहे.

नगर जिल्ह्यात विधानसभेच्या बारा जागा आहेत. त्यापैकी पाच भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना प्रत्येकी एक असे पक्षीय बलाबल आहे. विखे पाटील यांच्या प्रवेशाने भाजपची ताकद वाढेल, असे वातावरण भाजपच्या गोटात आहे. थोरातांनीही गेल्या वेळेपेक्षा पक्षाची ताकद वाढविण्याची तयारी चालवली आहे. शिवसेनाही एकवरून पुढे सरकण्याच्या तयारीत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला आमदार वैभव पिचड यांनी ‘झटका’ दिल्याने आता दोनच आमदार उरले आहेत.  या वेळच्या निवडणुकीत कर्जत-जामखेड मतदारसंघातील पालकमंत्री राम शिंदे आणि युवा नेते रोहित पवार यांच्यातील संभाव्य सामना गाजणार आहे. मंत्रीपदाच्या माध्यमातून केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडणारे फलक शिंदेंनी गावोगावी लावलेत. पवार यांनीही वर्षभरापासून नियमित संपर्क आणि विकासकामांचा सपाटा लावलाय. 

चितपट करण्याचा चंग
विखे-थोरात यांनी एकमेकांच्या अनुक्रमे शिर्डी आणि संगमनेर मतदारसंघात संपर्क वाढविला. त्यामुळे थोरात यांच्या या शिर्डीतील कार्यक्रमांना लाभत असलेली उपस्थिती आणि संगमनेरमध्ये विखे यांच्या सुरू झालेल्या चकरा आणि चहापानांचे कार्यक्रम दोन्ही मतदारसंघांमध्ये चर्चेचा विषय आहे.

थोरातांविरुद्ध राधाकृष्ण विखे यांच्या पत्नी व जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनी विखे पाटील, तर विखेंविरोधात थोरातांचे मेव्हणे आमदार सुधीर तांबे उभे राहणार असल्याच्या चर्चेने शिर्डी आणि संगमनेर मतदारसंघातील राजकीय वातावरण तापले आहे. 

या तिन्ही मतदारसंघांखालोखाल ‘हॉट’ मतदारसंघ श्रीगोंदा आहे. तेथे गेल्या वेळी अकरा वर्षे मंत्री व सहा वेळा आमदार असलेल्या बबनराव पाचपुते यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढविलेल्या राहुल जगताप या नवख्या उमेदवाराने पराभूत केले होते. आता पाचपुते यांनीही भाजपच्या माध्यमातून बांधणी चालविली आहे. राहुल जगताप यांनीही विजयासाठीचे आडाखे बांधले नसतील तर नवलच. पारनेरमध्ये विधानसभेचे उपाध्यक्ष व शिवसेना नेते विजय औटी केवळ विकासकामांच्या बळावर सलग चौथ्यांदा विधानसभेत जाण्याची तयारी करीत आहेत. 

कोपरगावात भाजपच्या आमदार स्नेहलता कोल्हे आणि राष्ट्रवादीचे युवा नेते आशुतोष काळे यांच्यातील संघर्ष रंगणार आहे. विखे पाटील यांचे मेव्हणे राजेश परजणे व कोपरगावचे नगराध्यक्ष विजय वहाडणे हेही रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. अकोल्यात आमदार वैभव पिचड यांनी हातात कमळ घेतले. पिचड यांना विजयाची खात्री असून, अशोक भांगरे, डॉ. किरण लहामटे यांच्यासह इतर विरोधक पिचडांच्या भाजप प्रवेशाची ‘रिॲक्‍शन’ कशी येईल, यादृष्टीने प्रयत्नशील असणे स्वाभाविक आहे. राखीव श्रीरामपूर मतदारसंघात आमदार भाऊसाहेब कांबळे यांचा सामना कोणाशी होणार हे अद्याप स्पष्ट नाही. 

नेवासे मतदारसंघात शंकरराव गडाख यांच्या भाजप व शिवसेना प्रवेशाची चर्चा झडत आहे. परंतु गडाख यांनी मात्र आपण अध्यक्ष असलेल्या क्रांतिकारी शेतकरी पक्षातूनच लढणार असल्याचे जाहीर केले आहे. आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी गडाखांविरोधात तयारी चालविली असून, त्यांना स्वपक्षातच संघर्षाचा सामना करावा लागतोय. राष्ट्रवादीतर्फे पांडुरंग अभंग किंवा विठ्ठल लंघे हेही नेवाश्‍याच्या रिंगणात उतरण्याची चिन्हे आहेत. 
शेवगाव-पाथर्डीमध्ये भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांचा सामना करण्यासाठी माजी आमदार चंद्रशेखर घुले, राष्ट्रवादीचे नेते ॲड. प्रताप ढाकणे यांच्यासह इतर नेते तयारीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhansabha Election 2019 Nagar District Radhakrishna Vikhe Patil Balasaheb Thorat Politics