विजय देशमुखांना "पालकत्वा'चा अर्थच नाही कळाला - महेश कोठे

विजयकुमार सोनवणे
शुक्रवार, 4 मे 2018

सोलापूर : महापालिका परिवहन कर्मचाऱ्यांचा संप मिटवण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने विजय देशमुख यांनी पुढाकार घेणे आवश्‍यक होते. मात्र, त्यांनी जबाबदारी झटकल्याचे वाचण्यात आले. ते पाहता देशमुखांना "पालकत्वा'चा अर्थच कळाला नाही, असा टोला महापालिकेतील विरोधी पक्षनेते शिवसेनेचे महेश कोठे यांनी लगावला. 

सोलापूर : महापालिका परिवहन कर्मचाऱ्यांचा संप मिटवण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने विजय देशमुख यांनी पुढाकार घेणे आवश्‍यक होते. मात्र, त्यांनी जबाबदारी झटकल्याचे वाचण्यात आले. ते पाहता देशमुखांना "पालकत्वा'चा अर्थच कळाला नाही, असा टोला महापालिकेतील विरोधी पक्षनेते शिवसेनेचे महेश कोठे यांनी लगावला. 

कोठे म्हणाले, "देशमुख यांच्याकडे एसटीचे खाते आहे. त्यामुळे त्यांच्याकडे असलेल्या जिल्ह्याच्या पालकत्वाची जबाबदारी संपत नाही. शहर व जिल्ह्यात होणाऱ्या प्रत्येक घटना-घडामोडीबाबत "पालकमंत्री' या नात्याने त्यांची जबाबदारी असायला हवी. मी व माझे खाते बस्स इतकेच अशी त्यांची भूमिका असेल तर, "पालकत्व' काय असते हे त्यांना समजलेच नाही, असेच म्हणावे लागेल. '' 

परिवहन खाते त्यांच्याकडे आहे. पण महापालिका परिवहन उपक्रमाशी आपला संबंध नाही असे त्यांना म्हणता येणार नाही. ते जिल्ह्याचे पालक आहेत. त्यामुळे परिवहनचा संप मिटवण्यासाठी त्यानी पुढाकार घ्यावा असेही ते म्हणाले.

आयुक्तांनी हेकटपणा सोडावा - नरोटे 
परिवहन कर्मचाऱ्यांना पगार न देण्याची हेकट भूमिका आयुक्तांनी सोडावी, असे काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे यांनी सांगितले. ते म्हणाले, "महापालिकेचे शिक्षण आणि आरोग्य विभागही तोट्यातच आहेत. त्यावर होणारा खर्च आणि मिळणारे उत्पन्न हे परिवहनपेक्षाही जास्त नुकसानदायक आहे. त्या खात्याबाबत आयुक्त गप्प का? परिवहन बाबतच वक्रदृष्टी ठेवण्यामागे त्यांचा हेतू स्पष्ट होत नाही.'' 

मुख्यमंत्र्यांना पाठविणार पत्र - महापौर 
परिवहनसंदर्भात तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक बोलावण्याचा आदेश सोलापुरात दिला आहे. त्यासंदर्भात त्यांच्याशी पत्रव्यवहार करणार आहे. पत्रामध्ये न्यायालयाने दिलेल्या आदेशाचाही उल्लेख असेल, जेणेकरून या समस्येवर तोडगा काढताना मदत होईल, असे महापौर शोभा बनशेट्टी यांनी सांगितले. 

नियामित वेळेवर सहा अंकी पगार घेणाऱ्या अधिकाऱ्याला कर्मचाऱ्यांच्या पोटाची आग दिसत नाही. 10 महिने वेतन नाही; पण मुलीचं लग्न अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलं आहे. कुणाकडे काय मागू लग्नकार्य कसं पार पाडू असा प्रश्‍न समोर असणारा कामगार हतबल झाला. आयुक्ताच्या मुलीच लग्न ठरलं अन्‌ शासनाने त्यांचे वेतन 10 महिन्यांपासून तटवले तर, त्यांनी काय केले असते? आडमुठे धोरण स्वीकारऱ्या अधिकाऱ्याला सरळ करण्याची ताकद यूनियनमध्ये आहे, त्याचे परिणाम निश्‍चित दिसून येतील. 
- व्यंकटेश कोंगारी, माजी नगरसेवक माकप 
 

Web Title: vijay deshmukh did not get exact meaning of guardian