सांगलीत विजयनगर सुटलं, पण गूढ नाही संपलं

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 मे 2020

आज अखेर विजयनरच्या रस्त्यांवरचे अडथळे दूर झाले अन्‌ इथला माणूस बाहेर पडू लागला... विजयनगर सुटलं, पण एक गूढ संपलं नाही.

सांगली ः हार्ट ऑफ सिटी, महापालिकेचं नवं केंद्रस्थान... विजयनगर. जिल्हाधिकारी कार्यालय, न्यायालय, मल्टिप्लेक्‍स, हॉटेल्स या वाढत्या व्यापारी केंद्रांमुळे नेहमी गजबजलेलं... 19 एप्रिलला एक बातमी येऊन धडकली... इथला एक बॅंक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आहे... सारं विजयनगर हादरून गेलं... गेली 28 दिवस ते मोकळा श्‍वास घेऊ शकलं नाही.

आज अखेर विजयनरच्या रस्त्यांवरचे अडथळे दूर झाले अन्‌ इथला माणूस बाहेर पडू लागला... विजयनगर सुटलं, पण एक गूढ संपलं नाही. तो बाधित व्यक्ती मृत झाला आणि संगे हजार प्रश्‍न मागे उरले, जे कधीच सुटणार नाहीत.
विजयनगरला कोरोना पॉझिटिव्ह सापडणं, हा सांगली शहराला पहिला शॉक होता. त्यात तो बॅंक कर्मचारी, सलग कामावर हजर राहिलेला. त्रास होत असल्याने दोन खासगी रुग्णालयात उपचार घेतलेला, एक्‍स-रे काढून झालेला...

मेडिकलमधून औषधे घेतलेला, अनेकांना भेटलेला... विजयनगरला राहणारा आणि स्फुर्ती चौकात सासूरवाडी असणारा... सासूरवाडीचे कनेक्‍शन गावभागाशी... बॅंकेत कर्मचारी टाकळीपासून ते पलूसपर्यंतचे... अधिकारी इचलकरंजीचे... किती मोठा पसारा, किती मोठी साखळी. शोधून-शोधून साऱ्यांना होम क्वारंटाईनं केलं, पत्नी आणि मुलांना संस्था कॉरंटनाईन करण्यात आलं. हा व्यक्ती नेमका कुणाच्या संपर्कात आला, याची उकल होण्याआधीचं त्यांनी अखेरच्या श्‍वास घेतला.

दुसऱ्या दिवशी पत्नी व मुलांचे नमुने तपासून अहवाल आला, सारे निगेटिव्ह... तो खरा धक्का होता. सुखद असला तरी प्रश्‍नांची मोठी जंत्री जमली. पत्नीने त्यांची सेवा केली होती, मुले घरीच होती. मग त्यांना कसा झाला नाही कोरोना? या प्रश्‍नाला पाय फुटले. कुणी म्हणाले, तो पॉझिटिव्ह नव्हताच, अहवाल चुकला असेल... इत्यादी.

प्रशासन मात्र दक्ष होते. काडीची चूक महागात पडू शकते, याची पुरती जाणीव होती. त्यामुळे हा भाग 28 दिवस सील करायचाच, यावर सारे ठाम राहिले. या काळात अनेकांच्या तपासण्या करून झाल्या. सारे निगेटिव्ह आले आणि साऱ्यांनीच निश्‍वास टाकला. आज विजयनगरने मोकळा श्‍वास घेतला, तब्बल 28 दिवसांनी रस्ते मोकळे झाले.

दुकाने उघडली गेली. सांगली-मिरज रस्त्यावरील अडथळे काढण्यात आले. पण, एक प्रश्‍न उरलाच, त्याला कोरोना झाला कसा? खरचं झाला होता का? नसेल तर मग टेस्ट चुकीची आली का? या प्रश्‍नांची उत्तरे काही मिळायची नाहीत, विजयनगर मात्र ती शोधत राहिल, कारण त्यांना या कोड्यानं 28 दिवस कोंडीत घातलं होतं.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vijaynagar roads are open, but some questions alive