अंगणवाडी सेविकांना शासकिय सेवेत सामावून घेणार : विखे

रवींद्र काकडे
मंगळवार, 3 सप्टेंबर 2019

सामाजिक दायित्व स्वीकारणाऱ्या अंगणवाडी सेविकांना शासकिय सेवेत सामावून घेतले जावे, यासाठी प्रयत्न करणार आहे, असे प्रतिपादन गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

लोणी (नगर) : अंगणवाडी सेविकांचे काम सेवेचा संदेश देणारे आहे. राज्यातील काही अपवादात्मक तालुके वगळले, तर संपूर्ण राज्यात कुपोषण कमी करण्यात अंगणवाडी सेविकांच्या मोठा वाटा आहे. आता अंगणवाड्यांना केवळ केंद्राच्या योजनांवर थांबता येणार नाही. आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सामाजिक दायित्व स्वीकारणाऱ्या अंगणवाडी सेविकांना शासकिय सेवेत सामावून घेतले जावे, यासाठी प्रयत्न करणार आहे, असे प्रतिपादन गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

प्रवरानगर (जि. नगर) येथील कामगार सांस्कृतिक भवनात जिल्हा परिषदमार्फत पंचायत समिती व एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प, राहाता अंतर्गत आदर्श अंगणवाडी सेविका व मदतनीस पुरस्कार वाटप व मेळाव्यात विखे पाटील ते बोलत होते. जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनी विखे पाटील, सभापती हिरा कातोरे, उपसभापती बाबासाहेब म्हस्के, संजय कदम, रोहिणी निघुते, समर्थ शेवाळे, विखे कारखान्याचे उपाध्यक्ष कैलास तांबे आदी उपस्थित होते.

विखे पाटील म्हणाले, ""अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांवर गदा आणणारा "मेस्मा' कायदा मागे घेण्यास सरकारला भाग पाडले. आता अंगणवाडी सेविकांना शासकिय सेवेत सामावून घेतले जावे, यासाठी प्रयत्न करणार आहे.''

(स्व.) सिंधूताई विखे पाटील यांच्या सामाजिक कामाच्या स्मृती भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी असाव्यात, या साठी (स्व.) सिंधूताई एकनाथराव विखे पाटील यांच्या नावाने अंगणवाडी सेविकांसाठी प्रत्येक तालुक्‍यातून एक, असे जिल्हास्तरावर 13 आणि राहता तालुक्‍यातून तीन पुरस्कार सुरू करणार असल्याचे विखे पाटील यांनी घोषीत केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vikhe says Anganwadisevika will accommodate in government service