जुन्या व नव्या महाबळेश्वरचा दुवा दुर्लक्षित ; सात गावांत नाराजी

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 19 September 2019

 सह्याद्रीच्या माथ्यावरील सात गावांत नाराजी ; "हिलस्टेशन'ला अनुकूल वातावरण.

कास ः नवीन महाबळेश्वर प्रकल्पाच्या आराखड्यासाठी शासनाने अधिसूचना काढली असून, त्यात जावळी, महाबळेश्वर व पाटण तालुक्‍यांतील 52 गावे समाविष्ट करताना सह्याद्रीच्या माथ्यावरील जुने महाबळेश्वर व नवीन महाबळेश्वरला जोडणारी गावे दुर्लक्षित ठेवल्यामुळे ग्रामस्थांत नाराजी व्यक्त होत आहे. 

सध्याच्या अधिसूचनेत जावळीतील 15 गावे समाविष्ट असून, यामध्ये कास, अंधारी, मजरे शेंबडी, शेंबडी, फळणी, देऊर, वाघळी, मुनावळे, जांबरुख, उंबरेवाडी, वेळे, वासोटा, सावरी, म्हावशी, कसबे बामणोली या गावांचा समावेश आहे. कास पठाराच्या पश्‍चिमेला असलेल्या ऐतिहासिक राजमार्गाने ही गावे जुन्या महाबळेश्वरला जोडली जाणार आहेत. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रयत्नाने या राजमार्गाचे डांबरीकरणही झाले आहे. सद्यःस्थितीत या रस्त्याने कास पठार व बामणोली या पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी अनेक पर्यटक या रस्त्याचा वापर करतात. असे असताना कास आणि बामणोली भागातील नियोजित नवीन महाबळेश्वर प्रकल्पातील गावांना जोडणाऱ्या या रस्त्यावरील अनेक छोटी गावे आजही विकासापासून वंचितच आहेत. या सह्याद्री डोंगर रांगामधील अंधारी या नवीन महाबळेश्वर प्रकल्पाच्या गावालगत असणारे सह्याद्रीनगर, तेथून पुढील मांटी, आपटीमुरा, पाटणेमाची, तेटलीमुरा, म्हातेमुरा, गाळदेव ही गावेही या प्रकल्पात समाविष्ट करणे आवश्‍यक आहे. 

वर्षानुवर्षे दुर्गम व डोंगराळ असलेला हा पट्टा पर्यटनाच्या दृष्टीने विकसित होणे गरजेचे असून, नवीन "हिलस्टेशन'मधील 15 गावांपैकी दहा गावे ही डोंगराच्या पायथ्याशी आहेत. त्यामुळे तेथील वातावरण हे महाबळेश्वरशी जुळणारे नाही; पण जी डोंगर माथ्यावरील गावे वगळली आहेत, ती जुन्या महाबळेश्वरजवळ व वर्षभर महाबळेश्वरसारखे वातावरण असणारी असल्याने येथे खऱ्या अर्थाने "हिलस्टेशन'चा नकी अनुभव येणार आहे. पर्यटकांच्या सोयीच्या दृष्टीनेही या गावांचा व येथील पायाभूत सुविधांचा विकास न झाल्यास नवीन महाबळेश्वरपर्यंत पोचताना मधला हा पट्टा अविकसित राहून लोकांना त्रास होणार आहे. त्यामुळे ही गावे समाविष्ट करणे गरजेचे आहे. 
 

नवीन व जुन्या महाबळेश्वरमध्ये एकसंधता येणार 

सह्याद्रीनगर येथून महाबळेश्वर हे अंतर साधारणतः 25 किलोमीटर आहे. कास- माचूतर रस्त्यावरील (जुना राजमार्ग) ही गावे नवीन महाबळेश्वर प्रकल्पात समाविष्ट केल्यास जुने महाबळेश्वर व नवीन महाबळेश्वर या मधला दुवा साधला जाणार असून, दोन्ही पर्यटनस्थळांत एकसंधपणा येऊन संपूर्ण डोंगर भागाचा विकास होणार आहे. 

सन 2004 मध्ये विक्रमसिंह पाटणकर हे मंत्री असताना या प्रकल्पाच्या दृष्टीने राजमार्गाचा दौरा केला होता. त्या वेळी हा सर्व पट्टा नवीन महाबळेश्वरात समाविष्ट करणार असल्याचे सांगितले होते. मग आता नवीन अधिसूचनेतही डोंगरमाथ्यावरील गावे का वगळली? या गावांचाही समावेश करून मुंबईवर अवलंबून असलेल्या येथील जनतेला विकासाची संधी मिळावी.

- तुकाराम शिंदे, ग्रामस्थ, सह्याद्रीनगर. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The village between the old and the new Mahabaleshwar are ignored