मोलमजुरी करणाऱ्यांच्या पोटापाण्यासाठी गावच झाले एक 

सनी सोनावळे
सोमवार, 23 मार्च 2020

कोरोनासारख्या महाभयंकर संकटाशी तोंड देत असताना आपले काही बांधव उपाशीपोटी राहू नयेत ही आपली सर्वांची सामाजिक जबाबदारी आहे.

टाकळी ढोकेश्वर : कर्फ्यू, मोर्चा, बंद ज्या-ज्या वेळी होतो, त्यावेळी सर्वात जास्त हाल होतात ते हातावर पोट असलेल्यांचे. त्यातील बहुतेकांना उपाशीपोटी दिवस ढकलावे लागतात. त्या कुटुंबांच्या हाल-अपेष्टा होऊ नये यासाठी ढवळपुरी (ता.पारनेर) येथील सरपंच राजेश भनगडे यांनी अभिनव उपक्रम राबवला. मोलमोजरी करणाऱ्या कुंटुंबांना आठ दिवस दिवस पुरेल एवढे अन्न-धान्य घरपोच केले. 

या करीता गावातील नागरिकांनी आर्थिक हातभार लावला आहे. या उपक्रमाबात भनगडे यांनी सांगितले की, 
जनता कर्फ्यूचे पालन करताना घरी असताना पण गावातील अशा लोकांची आम्हा सर्व मित्रांना काळजी वाटत होती. मुख्यमंत्र्यांनी संचारबंदीचा आदेश काढला आहे. त्यामुळे कामे बंद राहणार आहेत. त्यामुळे अशा कुटुंबियांना निदान आठ दिवसाचा पोटापाण्याचा प्रश्न सुटावा म्हणून दैनंदिन वस्तूंच्या बॅग तयार करण्यात आल्या. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमार्फत त्या-त्या कुटुंबापर्यंत गाजावाजा न करता पोहोचविल्या. 

कोरोनासारख्या महाभयंकर संकटाशी तोंड देत असताना आपले काही बांधव उपाशीपोटी राहू नयेत ही आपली सर्वांची सामाजिक जबाबदारी आहे. पुढील काही दिवसात परिस्थिती आणखी खालवली तर गावातील प्रतिष्ठित व्यापारी, व्यावसायिक, नोकरदार, विविध पदाधिकारी, डॉक्‍टर्स, शिक्षक यांना सगळ्यांना विनंती करण्यात येत आहे. बाजरी, साखर, डाळ, कडधान्ये, डेटॉल साबण, तेल, चहा पावडर, मिरची, मीठ यांसह अन्य 

वस्तूपैकी आपापल्या इच्छेप्रमाणे वस्तू देणगी स्वरूपात द्याव्यात. कोणीही पैशाच्या स्वरूपात मदत करू नये असे आवाहनदेखील डॉ. भनगडे यांनी केले आहे. या सर्व वस्तू एकत्रित संकलित करून गरजूंना त्यांचे वाटप करण्यात येईल. 
राज्यात पूरस्थिती असताना विविध ठिकाणच्या पूरग्रस्त भूकंपग्रस्तांसाठी आपण वेळोवेळी मदत केली आहे. आज तर आपल्या गावातील आपल्या माणसांना आपली गरज आहे. सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन डॉ. भनगडे यांनी केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The village has become one for the welfare of the laborers