सांगलीतील हा गाव कंटेन्मेंट घोषित 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 मे 2020

भिकवडी खुर्द (ता. कडेगाव, जि. सांगली) येथील 65 वर्षीय वृद्ध व्यक्तीचा कोरोनामुळे मिरज येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रशासनाने संपूर्ण गाव व परिसर सील केला असून पूर्ण गावात कंटेन्मेंट घोषित केले आहे.

कडेगाव : भिकवडी खुर्द (ता. कडेगाव, जि. सांगली) येथील 65 वर्षीय वृद्ध व्यक्तीचा कोरोनामुळे मिरज येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे तालुका अक्षरशः हादरून गेला, तर तालुका प्रशासन व पोलिस प्रशासनाने संपूर्ण गाव व परिसर सील केला असून पूर्ण गावात कंटेन्मेंट घोषित केले आहे. येथे एकूण कोरोना बाधितांची संख्या चारवर पोहोचली आहे. त्यामुळे गावात पोलिस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली आहे. 

भिकवडी खुर्द येथे गुजरात कनेक्‍शनमुळे यापूर्वीच कोरोनाने शिरकाव केला होता. त्यामुळे येथील कोरोना बाधितांची संख्या चारवर पोहोचली आहे. त्यामुळे येथे यापूर्वीच पोलिस प्रशासनाने संपूर्ण गाव सील केले होते. 
त्यानंतर मुंबईहून येथे आलेल्या 65 वर्षीय वृद्ध व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तालुक्‍यात कोरोनाने पहिला बळी गेल्याने येथील प्रशासनाने हाय अलर्ट जारी केला आहे. मृत व्यक्तीच्या संपर्कातील त्यांची पत्नी, मुलगी, जावई व दोन नातू यांना कडेगाव येथे संस्थात्मक विलगीकरणात दाखल केले आहे. त्यांच्या घशातील स्वॅबचे नमुने घेतले आहेत. त्यांचे रिपोर्ट काय येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

ग्रामपंचायतीच्यावतीने गावात औषधांची फवारणी करण्यात आली आहे, तर आरोग्य विभागाच्यावतीने घरोघरी जाऊन प्रत्येक नागरिकाची आरोग्य तपासणी सुरू करण्यात आली आहे. तसेच अजूनही कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंगचे कामही सुरू आहे. 

प्रांताधिकारी डॉ. गणेश मरकड, तहसीलदार डॉ. शैलजा पाटील, आरोग्य अधिकारी अशोक वायदंडे व पोलिस निरीक्षक विपीन हसबनीस यांनी येथे लॉकडाउनची प्रभावी अंमलबजावणी केली असून येथील प्रत्येक घडामोडीवर बारीक लक्ष ठेवले असून लोकांना दिलासा देत स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: This village in Sangli was declared containment