सोलापूरजवळ होणार विपश्‍यना केंद्राची उभारणी

राजाराम कानतोडे
बुधवार, 11 जुलै 2018

सोलापूर : कोणत्याही शुल्काशिवाय जात, धर्म आणि लिंग असा कोणताही भेदभाव न करता पूर्णतः शास्त्रीय पद्धतीने मानवी जीवनातील दुःखमुक्तीचा मार्ग शिकविणाऱ्या विपश्‍यना विद्येचे केंद्र सोलापूरजवळ होत आहे. पाच एकर परिसरातील हे केंद्र सोरेगाव-डोणगाव रस्त्यावर भाटेवाडी गावाजवळ आकारास येत असून त्याचे भूमिपूजन रविवारी झाले.

सोलापूर : कोणत्याही शुल्काशिवाय जात, धर्म आणि लिंग असा कोणताही भेदभाव न करता पूर्णतः शास्त्रीय पद्धतीने मानवी जीवनातील दुःखमुक्तीचा मार्ग शिकविणाऱ्या विपश्‍यना विद्येचे केंद्र सोलापूरजवळ होत आहे. पाच एकर परिसरातील हे केंद्र सोरेगाव-डोणगाव रस्त्यावर भाटेवाडी गावाजवळ आकारास येत असून त्याचे भूमिपूजन रविवारी झाले.

विपश्‍यना विद्या ही भगवान गौतम बुद्धांनी मानव जातीला दिलेली मोठी देणगी आहे. त्यांनी या विद्येचा प्रसार केला. त्या काळात जगभर ही विद्या पसरली. त्यानंतर काही शतकांनी ही विद्या भारतातून लुप्त झाली. त्यानंतर गेल्या शतकात विपश्‍यना आचार्य सत्यनारायण गोयंका यांनी ही विद्या ब्रह्मदेशातून आत्मसात करून भारतात तिचा प्रसार केला. सध्या जगभर 200 पेक्षा जास्त केंद्रांतून ही विद्या शिकविली जाते. इगतपुरी येथील विपश्‍यना विश्‍व विद्यापीठ हे या विद्येचे केंद्र आहे. 

विपश्‍यना ही मनशुद्धीसाठीची एक शास्त्रीय पद्धत आहे. श्‍वास आणि संवेदना यांचे तटस्थ निरीक्षण केल्यावर आपल्या मनातील राग, द्वेष, दुर्भानेवर मात करता येते. ही साधन शिकण्यासाठी विपश्‍यना केंद्रात 10 दिवसांचे निवासी शिबिर करावे लागते. शिबिराच्या कालखंडात पूर्ण मौन बाळगावे लागते. त्याशिवाय पंचशील आणि अन्य शिबिराचे नियम काटेकोरपणे पाळावे लागतात. आतापर्यंत लाखो लोकांनी या विद्येचे लाभ घेतला आहे.

इगतपुरीसह नागपूर, पुणे, कोल्हापूर, अमरावती आदी ठिकाणी विपश्‍यना केंद्र आहेत. सोलापूर अथवा परिसरातील जिल्ह्यात हे केंद्र नव्हते. हे नवे केंद्र या ठिकाणी होत असल्याने ही विद्या शिकू इच्छिणाऱ्यांची सोय होणार आहे. सोलापूरसह नजीकच्या सर्व जिल्ह्यांना या केंद्राचा लाभ मिळणार आहे. 
या शिबिरासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. निवास, भोजन आणि ध्यान शिकण्याची व्यवस्था जुन्या साधकांनी दिलेल्या दान आणि सेवेतून केली जाते. सध्या भाटेवाडीच्या पाच एकरांच्या केंद्रात 600 झाडे लावली आहेत. रविवारी भूमिपूजनाच्या वेळी जपानचे शास्त्रज्ञ डॉ. मियाविकी यांच्या पद्धतीने 10 हजार फुटांमध्ये एक हजारापेक्षा जास्त झाडे लावली आहेत. ही सर्व झाडे 25 ते 30 प्रजातींची असणार आहेत. याबाबत माहितीसाठी सुयश गुरुकुल एसआरपी कॅंम्पसमोर, विजापूर रोड या ठिकाणी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

सोलापूर शहर स्मार्ट सिटी होत आहे. रस्ते, वीज, स्वच्छतागृहाची कामे प्रगतिपथावर आहेत. येथील नागरिकांचे अंतरंग स्मार्ट करण्यासाठी या ध्यान केंद्राची उभारणी केली जात आहे. लोकांनी या ध्यान केंद्राच्या उभारणीसाठी आर्थिक सहभाग व सेवा द्यावी. 
- केशव शिंदे, सुयश गुरुकुल, सोलापूर 

विद्यार्थ्यांनाही लाभ 
विपश्‍यना विद्या शिकण्यासाठी अठरा वर्ष पूर्ण असावी लागतात. परंतु केंद्रात शाळेतील विद्यार्थ्यांसाठी एक किंवा दोन दिवसांची आनापान ध्यान शिबीर घेतली जातात. कॉलेजमधील तरुणांसाठी सात दिवसांचे युवा शिबीर घेतले जाते. अभ्यासातील ताणतणाव, परीक्षेतील व्यवस्थापन, स्मरणशक्ती आणि आत्मविश्‍वास वाढण्यासाठी याचा लाभ होतो.

Web Title: vipashyana center near solapur