esakal | काँग्रेसचा 'हा' उमेदवार राज्यातून सार्वाधिक मतांनी झाला आहे विजयी | Election Results

बोलून बातमी शोधा

Vishawajeeet kadam wins Vidhansabha Election Highest margin

- विश्‍वजित ठरले राज्यात "विक्रमादित्य' 
- पलूस-कडेगाव मतदारसंघातून राज्यातील सर्वाधिक मतदान मिळविण्यात यशस्वी 

काँग्रेसचा 'हा' उमेदवार राज्यातून सार्वाधिक मतांनी झाला आहे विजयी | Election Results
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कडेगाव : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघातील लढतीत आमदार डॉ. विश्‍वजित कदम यांनी महायुतीच्या संजय विभुते यांना धोबीपछाड देत एक लाख 62 हजार 521 इतक्‍या विक्रमी मताधिक्‍याने विजय मिळविला. ते सबंध राज्यात विक्रमादित्य ठरले. विश्‍वजित यांच्या विजयानंतर कार्यकर्त्यांनी फटाक्‍यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करीत जल्लोषच जल्लोष केला. 

येथील आयटीआयमध्ये आज सकाळी साडेआठच्या सुमारास मतमोजणीस सुरवात झाली. सुरवातीला टपाली मते मोजण्यात आली. आमदार डॉ. कदम हे पहिल्या फेरीपासून शेवटच्या पंधराव्या फेरीअखेर आघाडीवर राहिले. पहिल्या फेरीत 11 हजार 257, दुसऱ्या फेरीत 21 हजार 491, तिसऱ्या फेरीत 32 हजार 61, चौथ्या फेरीत 41 हजार 495, पाचव्या फेरीत 51 हजार 854, सहाव्या फेरीत 63 हजार 960, सातव्या फेरीत 76 हजार 286, आठव्या फेरीत 87 हजार 872, नवव्या फेरीत एक लाख 597, दहाव्या फेरीत एक लाख 12 हजार 757, अकराव्या फेरीत एक लाख 24 हजार 101, बाराव्या फेरीत एक लाख 35 हजार 258, तेराव्या फेरीत एक लाख 47 हजार 257, तर चौदाव्या फेरीत एक लाख 59 हजार 442, तर शेवटच्या पंधराव्या फेरीत एक लाख 61 हजार 127 मतांची आघाडी मिळाली; तर टपाली एक हजार 393 व सैनिक 70 मते मिळून एकूण एक लाख 62 हजार 521 इतक्‍या विक्रमी मताधिक्‍याने डॉ. विश्वजित कदम यांचा दणदणीत विजय झाला. 

पहिल्या फेरीपासून पंधराव्या फेरीपर्यंत सलग विश्‍वजित कदम यांच्या मताधिक्‍याचे फटाके फुटत राहिले. अन्‌ विश्‍वजित यांनी नवव्या फेरीत लाखाचा टप्पा पार केला. त्यानंतर शेवटच्या फेरीअखेर एक लाख 62 हजार 521 इतकी मते मिळवून ते विक्रमादित्य ठरले; तर महायुतीचे संजय विभुते यांना एकाही फेरीत मताधिक्‍य घेता आले नाही. येथे संग्रामसिह देशमुख यांनी निवडणूक मैदानातून माघार घेतल्याने ही निवडणूक विश्‍वजित यांना सोपी झाली होती. तरीही कुठेही गाफील न राहता ही निवडणूक सोपी असतानाही त्यांनी पूर्ण ताकदीने लढविली. देशभरातील कॉंग्रेसचे बडे नेते येथे प्रचारात आणून शक्तिप्रदर्शन केले. चुलते आमदार मोहनराव कदम, शिवाजीराव कदम, आई विजयमाला, पत्नी स्वप्नाली, बंधू शांताराम कदम, जितेश कदम यांच्यासह सर्व कुटुंबाची विश्‍वजित यांना साथ मिळाली. कुटुंबातील सर्व सदस्यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला. याबाबत पुढील पाच वर्षांत करणार असलेल्या विकासकामांचा त्यांनी आराखडा मांडला. तसेच, कार्यकर्त्यांनी घेतलेल्या कष्टामुळेच विक्रमी मताधिक्‍य मिळवत डॉ. विश्‍वजित हे "विक्रमादित्य' ठरले. 

शिवसेना महायुतीचे संजय विभुते यांनी येथे सेनेची ताकद नसतानाही खिंड लढवली. येथे ते पहिल्यांदाच लढले. त्यांना भाजपची साथ पाहिजे तेवढी मिळाली नाही. पक्षाचे नेते प्रचाराला आले नाहीत. त्यांना केवळ आठ हजार 976 इतकी मते मिळाली. येथील मतदारांनी विश्‍वजित कदम यांच्या पाठीशी आपली ताकद उभी करीत येथे कॉंग्रेसचा बालेकिल्ला आणखी भक्कम केला, असेच म्हणावे लागेल. 

विश्‍वजित यांनी मोडला वडिलांचा विक्रम 
2004 च्या विधानसभा निवडणुकीत डॉ. पतंगराव कदम यांनी एक लाख चार हजार इतके मताधिक्‍य घेऊन विक्रम केला होता; तर या निवडणुकीत डॉ. विश्‍वजित कदम यांनी एक लाख 62 हजार 521 इतके मताधिक्‍य घेत वडिलांचा विक्रम मोडला आहे. 


विश्‍वजित यांना अश्रू अनावर 
पतंगराव कदम यांच्या निधनानंतर विश्‍वजित यांची ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे; तर या निवडणुकीत त्यांनी एक लाख 62 हजार 521 इतक्‍या मताधिक्‍याने विजय संपादन केल्यानंतर त्यांनी सहकुटुंब सोनहिरा कारखाना कार्यस्थळावरील डॉ. पतंगराव कदम यांच्या समाधीचे दर्शन घेतले. या वेळी वडिलांच्या आठवणीने विश्‍वजित यांना अश्रू अनावर झाले. या वेळी आई विजयमाला कदम, चुलते मोहनराव कदम, पत्नी स्वप्नाली कदम यांनाही अश्रू आवरता आले नाहीत. 


पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघ अंतिम निकाल 
उमेदवारनिहाय मिळालेली एकूण मते 
1) विश्‍वजित कदम- कॉंग्रेस- 1,71,521 
2) राहुल शिवाजी पाटील- बसप- 941 
3) संजय आनंदा विभुते- शिवसेना- 8,976 
4) अधिकराव चन्ने- अपक्ष- 323 
5) अजिंक्‍यकुमार वसंत कदम- अपक्ष- 715 
6) अनिल बाळा किणीकर- अपक्ष- 188 
7) संदीप रामचंद्र जाधव- अपक्ष- 408 
8) ऍड. प्रमोद गणपतराव पाटील- अपक्ष- 2132 
9) विलास शामराव कदम- अपक्ष- 706 
10) नोटा- 20,631 

आठ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त 
पलूस-कडेगाव मतदारसंघातून डॉ. विश्‍वजित कदम राज्यात विक्रमी एक लाख 62 हजार 521 इतक्‍या मताधिक्‍याने विजयी झाले. परंतु, इतर सर्व आठ उमेदवार आपले डिपॉझिटही वाचवू शकले नाहीत.