Vita Municipal Newsletter: Will the BJP, which is scattered in groups, fight unitedly?
Vita Municipal Newsletter: Will the BJP, which is scattered in groups, fight unitedly?

विटा नगरपालिका वार्तापत्र : गटागटात विखुरलेली भाजप एकसंध लढणार का? 

विटा (जि. सांगली) : आगामी पालिका निवडणुकीसाठी शिवसेनेचे विद्यमान आमदार अनिल बाबर व राष्ट्रवादीत नुकतेच प्रवेश केलेले माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्यात पारंपरिक लढती होणार हे निश्‍चित. यांच्याबरोबर शहरातील भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी पालिका निवडणूक लढविण्यासाठी निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र शहरात भाजपचे विविध गट निर्माण झाले आहेत. बाबर - पाटील या मातब्बर नेत्यांना शह देण्यासाठी शहरातील विविध गटागटात विखुरलेली भाजप एकसंध लढणार का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 


विट्याच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी युतीच्या काळात सदाशिवराव पाटील यांनी तत्कालीन उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळी पाटील यांनी पालिका भाजपमय केली होती. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला. त्यानंतर सदाभाऊंनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आणि भाजपच्या विस्ताराला उतरती कळा लागली. आजघडीला विटा शहरात असणारी भाजप चार गटात विभागली आहे.

शहरातील गावभाग व संघाचे काही कार्यकर्ते सदाशिव पाटील यांच्यामागे आहेत. विनोद गोसावी व श्रीधर जाधव यांचा एक गट आमदार अनिल बाबर यांचे समर्थन करतात. सध्याला अनिल म. बाबर, किशोर डोंबे, कुमार लोटके अशी भाजपची एक टिम एकला चलोच्या भूमिकेत आहेत. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता अनिल म. बाबर आमदारांच्या गोटात सामील होऊ शकतात. तर भाजपाचे तालुकाध्यक्ष सुहास पाटील आणि नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले सदाशिव पाटील यांचे समर्थक पंकज दबडे यांची आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली वाटचाल सुरू आहे.

गेल्या पाच वर्षांपासून पालिका निवडणुकीत गोपीचंद पडळकर लक्ष घालणार अशा चर्चा सुरू आहेत. पडळकर आमदार झाल्यानंतर येथील कार्यकर्त्यांना बळ मिळेल. अशी अपेक्षा होती. परंतु प्रत्यक्ष असे घडताना दिसून येत नाही. आगामी पालिका निवडणूक लढविण्यासाठी सत्ताधारी पाटील व विरोधी बाबर गट तयारीला लागले आहेत. भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी पालिका निवडणुकीत उडी घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र विखुरलेले सर्व भाजपचे नेते, कार्यकर्त्यांनी निवडणुकीसाठी एकत्र प्रयत्न केले तर भाजपचे शहरात आशादायक चित्र निर्माण होऊ शकते. 


युती का स्वतंत्र 
गत विधानसभा निवडणुकीत युतीमुळे गोपीचंद पडळकर यांनी आमदार अनिल बाबर यांना मदत केली होती. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आहे. त्याच धर्तीवर विटा पालिका निवडणुकीत स्थानिक पातळीवर शिवसेना व भाजपची युती होणार की दोन पक्ष स्वतंत्र लढणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

संपादन : युवराज यादव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com