विष्णूदास भावे पदक समारंभात 61 वर्षात तिसऱ्यांदा खंड; यंदाचा पुरस्कार लांबणीवर 

अजित झळके
Monday, 12 October 2020

सांगलीची ओळख सांगताना अभिमानाने "नाट्यपंढरी सांगली', अशी करून दिली जाते. हा सांगलीकरांचा अभिमान आहे. हे ज्यांच्यामुळे झाले त्या विष्णूदास भावे यांच्या नावाने शहरात एक प्रशस्त नाट्यमंदिरही उभे आहे. त्याच ठिकाणी दरवर्षी गौरव पदक देऊन मराठी रंगभूमीवरील प्रख्यात व्यक्तीमत्वाचा गौरव केला जातो.

सांगली ः सांगलीला नाट्यपंढरी म्हणून ज्यांच्यामुळे ओळख मिळाली, त्या दिवंगत विष्णूदास भावे यांच्या नावचे "विष्णूदास भावे गौरव पदक' म्हणजे सांस्कृतिक क्षेत्रात मानाचे पान मानले जाते. सन 1959 साली नटश्रेष्ठ बालगंधर्व यांचा या गौरव पदकाने पहिल्यांदा गौरव झाला आणि त्यानंतर काही वर्षांनी दरवर्षी गौरव पदक देण्याची परंपरा सुरु झाली. त्यात याआधी दोनवेळा खंड पडला. यंदाही कोरोना संकट काळामुळे 5 नोव्हेंबर रोजी मराठी रंगभूमीदिनी हा सोहळा होणार नाही, असे अखिल भारतीय नाट्य विद्यामंदिर समिती, सांगलीने कळवले आहे. याआधी सन 1976 आणि सन 2000 या दोनवर्षी या सोहळ्यात खंड पडला होता. 

सांगलीची ओळख सांगताना अभिमानाने "नाट्यपंढरी सांगली', अशी करून दिली जाते. हा सांगलीकरांचा अभिमान आहे. हे ज्यांच्यामुळे झाले त्या विष्णूदास भावे यांच्या नावाने शहरात एक प्रशस्त नाट्यमंदिरही उभे आहे. त्याच ठिकाणी दरवर्षी गौरव पदक देऊन मराठी रंगभूमीवरील प्रख्यात व्यक्तीमत्वाचा गौरव केला जातो. प्र. के. अत्रे, पु. ल. देशपांडे, ज्योत्स्ना भोळे, हिराबाई बडोदेकर, शिलेदार कुटुंबिय, दिलीप प्रभाळकर, निळू फुले, मोहन जोशी, विक्रम गोखले, मोहन आगाशे, सुधा करमरकर, प्रभाकर पणशीकर अशी कितीतरी मोठी माणसं या पदकानं गौरवली गेली.

25 हजार रुपये रोख, सोन्याचा मुलामा दिलेले पदक असे पुरस्काराचे स्वरुप असते. कलाकार कितीही महान असो, या पदकाने त्यांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला जातो. गेल्यावर्षी रोहिणी हट्टंगडी यांचा गौरव झाला होता. यंदा त्यावर निर्णय होऊ शकला नाही आणि तो विषय तूर्त लांबणीवर टाकण्यात आला आहे. कोरोनाचे संकट आटोक्‍यात आल्यानंतर त्यावर निर्णय होईल, असे समितीचे उपाध्यक्ष विनायक केळकर यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. 

याआधी सन 1976 ला युद्ध परिस्थितीमुळे विष्णूदास भावे पदक सोहळा झाला नव्हता, अशी आठवण श्री. केळकर यांनी सांगितले. सन 2000 साली प्रख्यात मराठी नाटककार विजय तेंडुलकर यांना हा पुरस्कार जाहीर झाला होता, मात्र काही तांत्रिक कारणाने ते आले नाहीत. त्यामुळे त्यावर्षी पदक प्रदान करण्याचा सोहळा होऊ शकला नव्हता. त्यानंतर आता त्यात खंड पडला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Volume for the third time in 61 years at the Vishnudas Bhave Medal Ceremony; This year's award on extension