प्रतीक्षा संपली...."वऱ्हाड निघालंय'चा 26 ला प्रयोग 

घनशाम नवाथे 
Thursday, 21 January 2021

लॉकडाऊननंतर तब्बल दहा महिन्यांनी नाट्यपंढरीतील भावे नाट्यमंदिरात नाटकाची घंटा वाजणार आहे. दोनवेळा गिनिज बुकात नोंद झालेले "वऱ्हाड निघालंय लंडनला' हे नाटक 26 जानेवारी रोजी सादर होत आहे.

सांगली : लॉकडाऊननंतर तब्बल दहा महिन्यांनी नाट्यपंढरीतील भावे नाट्यमंदिरात नाटकाची घंटा वाजणार आहे. दोनवेळा गिनिज बुकात नोंद झालेले "वऱ्हाड निघालंय लंडनला' हे नाटक 26 जानेवारी रोजी सादर होत आहे. सांगलीत 380 वा प्रयोग घेऊन हरहुन्नरी कलाकार संदीप पाठक येत आहे. तीन वर्षांनंतर या नाटकाचा प्रयोग सांगलीत सादर होत असून नाट्यरसिकांना उत्सुकता लागली आहे. 

कोरोनाच्या संकटामुळे गतवर्षी मार्च 2020 पासून नाट्यप्रयोग बंद करण्यात आले. काही दिवसांपूर्वी नाट्यप्रयोगांना परवानगी दिली. परंतु नाटकाचे बजेट आणि निम्म्या प्रेक्षक संख्येची अट लक्षात घेता बिग बजेट नाटकाचे प्रयोग सादर करणे आर्थिकदृष्ट्या अडचणीचे ठरले आहे. तसेच प्रेक्षक देखील नाटकासाठी येतील की नाही अशी शंका होती. परंतु नुकतेच गाण्यांच्या दोन मैफली नाट्यगृहात रंगल्या. तसेच एका संस्थेचा पुरस्काराचा कार्यक्रमही झाला. परंतु नाट्यपंढरीत नाट्यप्रयोगाची रसिकांना प्रतीक्षा होती. ती आता संपली आहे. 

गिनिज बुकात दोनवेळा नोंद झालेले विक्रमी नाटक "वऱ्हाड निघालंय लंडनला' हे नाटक घेऊन संदीप पाठक येत आहे. डॉक्‍टर लक्ष्मणराव देशपांडे यांच्या निधनानंतर संदीप पाठक यांने नाटकाचे शिवधनुष्य उचलले आहे. एक दोन नव्हे 52 पात्रे घेऊन नाटक सादर करणाऱ्या संदीपने या नाटकाला पुन्हा वैभव प्राप्त करून दिले आहे. जगातले अशा प्रकारचे एकमेव नाटक असलेल्या वऱ्हाडचा प्रयोग सादर होऊन 10 महिन्यांची नाट्यरसिकांची प्रतीक्षा संपणार आहे. निम्म्या प्रेक्षक क्षमतेने हे नाटक भावे नाट्यमंदिरात सायंकाळी 4.30 वाजता सादर होत आहे. या निमित्ताने दहा महिन्यांनी नाटकाची घंटा वाजली जाणार आहे. 

नाट्यपंढरी सांगलीला नाटकांची दीडशेहून अधिक वर्षांची परंपरा आहे. लॉकडाऊननंतर 10 महिन्यांनी येथे वऱ्हाडचा पहिला प्रयोग सादर करण्याचा आनंद होतोय. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सर्व प्रकारची काळजी घेतली जाईल. नाट्यरसिकांनी वऱ्हाड घेऊन नाटकाला यावे हीच विनंती राहील.
- संदीप पाठक, नाट्यकलाकार

 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The wait is over ... the 26th experiment of "Varhad Nighalanya"