सायकल खरेदी करायचीय; महिनाभर आहे वेटिंग; वाचा कुठे...

घनशाम नवाथे 
Friday, 18 September 2020

नवीन दुचाकी किंवा मोटारीसाठी "वेटिंग' असल्याचे आतापर्यंत तुम्ही ऐकले असाल; परंतु सायकलसाठी "वेटिंग'चा अनुभव सध्या सांगलीत येऊ लागला आहे.

सांगली : नवीन दुचाकी किंवा मोटारीसाठी "वेटिंग' असल्याचे आतापर्यंत तुम्ही ऐकले असाल; परंतु सायकलसाठी "वेटिंग'चा अनुभव सध्या येऊ लागला आहे.

"लॉकडाउन' आणि "अनलॉक'च्या काळात व्यायाम आणि फॅशनसाठी सायकलींची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. सकाळी आणि सायंकाळी सायकलप्रेमींची रस्त्यावर गर्दी दिसू लागली आहे. त्यामुळे इतरांनाही आकर्षण निर्माण झाले आहे; परंतु सायकलींच्या काही शोरूम्समध्ये सध्या पंधरा दिवस ते महिनाभर "वेटिंग'चा अनुभव येतोय. 

गेल्या तीन-चार वर्षांपासून सायकलिंग करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. शहरात आणि ग्रामीण भागात सायकलप्रेमींचे ग्रुप तयार झालेत. त्यांच्याकडून वेगवेगळ्या सायकल सहलींचे आयोजन केले जाते. आतापर्यंत साधी सायकल, रेंजर आणि रेसर सायकल अशीच अनेकांना ओळख होती; परंतु सध्या सिटी बायसिकल, हायब्रीड बाईक, रोड बाईक, माऊंटन बाईक, फॅट बाईक आदी प्रकारच्या सायकली सांगलीतील रस्त्यांवर फिरताना दिसत आहेत. लॉकडाउन काळात तर मोठ्या प्रमाणात सायकलींची विक्री झाल्याचा अनुभव आला. 

कोरोनाचा प्रादुर्भाव आणि लॉकडाउन झाल्यानंतर अनेकजण व्यायामासाठी सायकलीकडे वळले. त्यामुळे अचानक मोठी मागणी वाढली. सायकल दुकानदारांनी त्यांच्याकडील सर्व प्रकारच्या सायकलींची विक्री केली. लहानापासून ते मोठ्यापर्यंतच्या सर्व सायकली खपल्या. लॉकडाउन काळात सकाळी आणि सायंकाळी अनेकजण सायकली घेऊन रस्त्यावर उतरल्याचे दिसले. अनेकांनी एकमेकांचे पाहून अनुकरण करत सायकलींवर प्रेम दाखवले. त्यातूनही सायकली रस्त्यावर आल्या. 

लॉकडाउन काळात सायकलींचे उत्पादन घटले होते. सध्या अनलॉक प्रक्रिया सुरू असली तरी मध्यंतरी राज्यबंदी, जिल्हा बंदी आदींमुळे उत्पादन आणि पुरवठ्यात अडथळे आले होते. सध्या मागणी वाढली असली तरी त्या प्रमाणात उत्पादक कंपन्यांकडून पुरवठा होत नाही. त्याचा परिणाम म्हणून सायकलप्रेमींना पसंतीची आणि हव्या असलेल्या कंपनीची सायकल मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागतेय. सांगलीत देशी आणि विदेशी कंपनीच्या सायकली मिळतात. काही कंपन्यांचा अपवाद वगळता हवी असलेली सायकल लगेच मिळेलच असे नाही. काही शोरुम्सनी ग्राहकांना परत पाठवताना त्यांच्या नोंदी घेण्यास सुरवात केली आहे. जशा सायकली येतील, तसे प्रतीक्षा यादीप्रमाणे कॉल करून कळवले जाते. यामुळे दुचाकी-चारचाकीसारखी प्रतीक्षा करण्याची वेळ सायकलप्रेमींवर आली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: "Waiting" for bicycles in Sangli; big sale in lockdown