माधवनगर परिसरात "ओपीडी' बंद केल्यामुळे उपचारासाठी भटकंती

घनश्‍याम नवाथे 
Wednesday, 9 September 2020

माधवनगर आणि कारखाना परिसरात काही डॉक्‍टर कोरोना पॉझिटीव्ह झाल्यामुळे तसेच काहींनी स्वत:हून "ओपीडी' बंद केल्यामुळे कोरोना व्यतिरिक्त इतर आजारांचे रूग्ण धास्तावले आहेत.

सांगली : माधवनगर आणि कारखाना परिसरात काही डॉक्‍टर कोरोना पॉझिटीव्ह झाल्यामुळे तसेच काहींनी स्वत:हून "ओपीडी' बंद केल्यामुळे कोरोना व्यतिरिक्त इतर आजारांचे रूग्ण धास्तावले आहेत. त्यांना उपचारासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे त्यांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. तर काहीजण थेट मेडिकल दुकानातून औषधे खरेदी करून उपचार घेत आहेत. 

माधवनगर परिसरात रूग्णसंख्या वाढल्यामुळे लॉकडाउन जाहीर केला आहे. लॉकडाउन करण्यापूर्वी काही डॉक्‍टर कोरोना बाधित आढळले. त्यामुळे माधवनगर परिसरातील इतर डॉक्‍टरांच्या दारात रांग लागल्याचे चित्र पहायला मिळाले. गर्दी वाढत असल्याचे पाहून त्यापैकी काहींनी ओपीडी बंद केली. त्यामुळे साखर कारखाना, लक्ष्मीनगर, पंचशीलनगर येथील दवाखान्यात गर्दी झाली. गेले काही दिवस गर्दी पाहून डॉक्‍टरांची तारांबळ उडाली. रूग्ण वाढत असल्याचे पाहून डॉक्‍टर फेसशिल्ड वापरून तसेच रूग्णाचे शरीराचे तापमान मोजून, सॅनिटायझर, मास्कचा वापर अशा उपाययोजना करून रूग्ण तपासत होते. परंतू कारखाना परिसरातील एक डॉक्‍टर तसेच अन्य डॉक्‍टरच्या कुटुंबातील सदस्य पॉझिटीव्ह आल्यामुळे त्यांनी ओपीडी बंद ठेवली आहे. तसेच इतर ठिकाणी देखील तीच अवस्था आहे. 

कोरोना व्यतिरिक्त इतर आजारांसाठी डॉक्‍टर नसल्यामुळे काहींनी महापालिका दवाखान्यात गर्दी केली आहे. मात्र तेथील गर्दी पाहून अनेकजण तेथे जाणे टाळत आहेत. तसेच खासगी डॉक्‍टरांवर विश्‍वास असलेल्या रूग्ण व नातेवाईकांना भटकंती करावी लागत आहे. डॉक्‍टरच उपलब्ध नसल्यामुळे अनेक रूग्णांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. काही रूग्णांनी थेट मेडिकल दुकानातूनच औषधे घेण्यास सुरवात केली आहे. 

कोरोना व्यतिरिक्त इतर आजार असलेल्या रूग्णांना सध्या डॉक्‍टरच उपलब्ध नसल्यामुळे त्रासाला सामोरे जावे लागत आहे. महापालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे रूग्णांची गैरसोय होणार नाही यासाठी तातडीने उपाययोजना करावी.
- अशोक गोसावी (सामाजिक कार्यकर्ते) 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wandering for treatment due to closure of OPD