इस्लामपुरात कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी वॉर रूम ! 

धर्मवीर पाटील 
Monday, 24 August 2020

इस्लामपूर (जिल्हा सांगली) : येत्या काळात कोरोनाचा वाढता धोका विचारात घेऊन पालिकेच्या माध्यमातून शहरात सहा ठिकाणी फिव्हर क्‍लिनिक सुरू करणार असल्याची माहिती नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. 'वॉर रूम'च्या माध्यमातून नॉन कोव्हिड रुग्णांचे हाल होऊ नयेत, यासाठीही स्वतंत्र नियोजन करण्यात आले आहे, असेही ते म्हणाले. 

इस्लामपूर (जिल्हा सांगली) : येत्या काळात कोरोनाचा वाढता धोका विचारात घेऊन पालिकेच्या माध्यमातून शहरात सहा ठिकाणी फिव्हर क्‍लिनिक सुरू करणार असल्याची माहिती नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. 'वॉर रूम'च्या माध्यमातून नॉन कोव्हिड रुग्णांचे हाल होऊ नयेत, यासाठीही स्वतंत्र नियोजन करण्यात आले आहे, असेही ते म्हणाले. 

शहरात राबवावयाच्या उपाययोजनांसंदर्भात आज पालिकेत अधिकाऱ्यांची बैठक झाली, त्यानंतर पत्रकार परिषदेत नगराध्यक्ष पाटील यांनी माहिती दिली. मुख्याधिकारी अरविंद माळी, विक्रम पाटील, वैभव पवार, संजय कोरे, विश्वनाथ डांगे, प्रमिला माने उपस्थित होते. 

ते म्हणाले, "सध्या सुरू असलेल्या वैश्विक महामारीत सर्वांनीच एकत्र येऊन तोंड देण्याची गरज निर्माण झाली आहे. अण्णासाहेब डांगे मेडिकल कॉलेज आणि प्रकाश हॉस्पिटल एकत्र येऊन फिव्हर क्‍लिनिकच्या माध्यमातून औषधांसह प्राथमिक आरोग्याच्या सुविधा मोफत देतील. प्रभागनिहाय नगरसेवकांच्या मदतीने पाच उत्स्फूर्त स्वयंसेवक नेमून त्यांच्या माध्यमातून गरज पडेल त्या रुग्णांची पूर्ण व्यवस्था केली जाईल.

त्यांना कोरोना योद्धा म्हणून मान्यता मिळेल. 30 ऑगस्टपासून पालिकेत 'वॉर रूम' सुरू होईल. संपर्कासाठी टोल फ्री नंबर असेल आणि इथून नागरिकांना 24 तास मदत पुरवली जाईल. कोरोनाची फक्त लक्षणे असणाऱ्यांनी होम आयसोलेशन करून घ्यावे, आरोग्य विभाग घरी उपचार करेल. शहरात 24 आशा वर्कर कार्यरत असतील.

कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यास एरिया कंटेन्मेंट झोन न करता बाधित रुग्णांची स्वतंत्र व्यवस्था करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. येत्या दोन दिवसात शहरातील वैद्यकीय व्यावसायिकांची बैठक घेऊन आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत त्यांनी सेवा बजावावी याबाबतचे निर्णय घेतले जातील." 

1000 अँटिजेन टेस्ट करणार... 
नगराध्यक्ष पाटील म्हणाले, "जिल्हा शल्यचिकित्सक आणि तालुका आरोग्य अधिकारी यांच्या मदतीने 1000 अँटीजेन किट्‌स मागवले आहेत, त्यातून एक हजार जणांची मोफत टेस्ट केली जाईल. योग्य वेळी निदान झाल्यास चांगले उपचार होतील." 

मृत कोरोनाबाधितांसाठी मोफत जळण. 
कोरोनाबाधित मृत रुग्णांच्या अंत्यविधीसाठी लागणारे जळण पालिकेकडून मोफत दिले जाणार आहे. ज्येष्ठ नेते संजय कोरे यांनी ही सूचना केली. 

असे असतील फिव्हर क्‍लिनिक... 
निनाईनगर जिल्हा परिषद शाळा, कुसुमगंध शाळा, जावडेकर हायस्कूल, कुलकर्णी हॉस्पिटल, शाळा नंबर एक, क्‍लब हाऊस. इमर्जन्सी साठी आंबेडकरनगरातील अर्बन हेल्थ सेंटर कायम सुरूच राहील. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: War room for the battle against Corona in Islampur!