म्हैसाळ, टेंभूतून दुष्काळी भागांसाठी रोज पाव टीएमसी पाणी उपसा

विष्णू मोहिते 
Thursday, 27 August 2020

पावसाळ्यात महापूराचे पाणी कर्नाटकला वाहून जाते. त्याच काळात दुष्काळी भागाला पाणी द्यावे, ही अनेक वर्षाची मागणी यंदा प्रत्यक्षात अंमलात आली. टेंभू, म्हैसाळ योजना आज आठ दिवसांपासून सुरु आहेत.

सांगली : पावसाळ्यात महापूराचे पाणी कर्नाटकला वाहून जाते. त्याच काळात दुष्काळी भागाला पाणी द्यावे, ही अनेक वर्षाची मागणी यंदा प्रत्यक्षात अंमलात आली. टेंभू, म्हैसाळ योजना आज आठ दिवसांपासून सुरु आहेत.

दोन्ही योजनांतून रोज सर्वसाधारणपणे पाव टीएमसी पाण्याचा उपसा केला जात आहे. त्यासाठी वीज बिलावर सुमारे 65 ते 70 लाख रुपये खर्च होतात. पाणी शेवटच्या टप्प्यात गेल्यानंतर विविध टप्प्यांवरील पंप पूर्ण क्षमतेने सुरु केले जातील. दोन्ही योजनांतून सात टीएमसीपेक्षा अधिक पाणी उचलले जाण्याची अपेक्षा आहे. म्हैसाळ योजनेतून जत, सांगोला आणि मंगळवेढा तर टेंभू'तून तासगाव, आटपाडी, सांगोला तालुक्‍यातील तलाव बंधारे भरुन घेण्याचे काम सुरु आहे. 

कृष्णा नदीच्या पुराचे पाणी थेट दुष्काळी भागाला देण्यास सन 2020 ची वाट पाहवी लागली. अन्यथा गेली काही वर्षे मागणी आणि घोषणा यावरच समाधान मानावे लागायची. म्हैसाळ, टेंभू उपसा सिंचन योजनेचे पंप सुरु करून पाटबंधारे विभागाने जत, कवठेमहांकाळ, खानापूर, आटपाडी, तासगाव आणि सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्‍यातील दुष्काळी भागातील तलाव भरून घेतले जाणार आहे. हे पाणी थेट शेतीला, पिण्यासाठी आणि तेथील भूजल पातळी उंचावण्यास फायद्याचे ठरणार आहे. त्यामुळे दुष्काळी भागातील जनतेला दिलासा मिळणार आहे. 

जलसंपदा तथा पालकमंत्री जयंत पाटील यांनी मार्चमध्ये एका बैठकीत पुराचे पाणी दुष्काळी भागात देण्यासाठी नियोजन करण्याचे आदेश दिले. पूर्व नियोजनामुळे म्हैसाळ, टेंभू योजना सध्या सुरु आहेत. म्हैसाळ योजनेतून तासगाव, जत, कवठेमहांकाळ, सांगोला, मंगळवेढा तर टेंभू योजनेतून खानापूर, आटपाडी, तासगाव आणि सांगोला तालुक्‍यातील तलाव भरून घेतले जाणार आहेत. कृष्णा, वारणा नद्यांच्या काठावर एकीकडे महापुराची भिती वाटत असताना दुष्काळी भागात शेतीच्या पाण्यासाठी धडपड सुरु असायची. कोयना, वारणा धरणातून विसर्ग बंद केला असला तरी दोन्ही योजनांचा उपसा कायम ठेवला जाणार आहे. पुराचे पाणी समुद्राला मिळते, ते उचला आणि दुष्काळी भागाला द्या, ही मागणी होती. 

म्हैसाळ योजनेचे विविध टप्प्यावरील 60 आणि टेंभूचे विविध टप्प्यावरील 50 पंप सुरु आहेत. सर्व पंपांची क्षमता 3 लाख अश्‍वशक्ती होते. चार दिवसाला विनाव्यत्यय अन्यथा पाच दिवसांत एक टीएमसी पाणी उचलले जात आहे. दुष्काळी भागातील तलाव, बंधारे भरुन घेतले जातील. 
- हनुमंत गुणाले, अधिक्षक अभियंता, पाटबंधारे, सांगली 

एक टीएमसीसाठी अडीच कोटी... 
उपसा योजनांतून पाणी उपसा करण्याचा वीजेचा खर्च एक टीएमसी पाण्यासाठी साधारणपणे अडीच कोटी रूपये येतो. दोन्ही योजनांतून साधारणपणे रोज पाव टीएमसी पाणी उपसले जाते. त्यानुसार पुराचे पाणी उपसा करून ते दुष्काळी भागाला देण्याचा रोजचा खर्च सुमारे 60 ते 70 लाख रूपयांत जातो, अशी माहिती पाटबंधारे विभागातून देण्यात आली.  

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: water for drought prone areas from Mahisal, Tembhut