२५ मेपर्यंत शेतीसाठी पाणी! उजनी धरणातून कॅनॉलद्वारे सोडलेले पाणी आज मोहोळ तालुक्यात; देगाव उपसा सिंचन योजनेच्या २८ किलोमीटर कालव्याची होणार चाचणी

उजनी धरणातून ६ मार्चपासून शेतीसाठी पाणी सोडण्यात आले असून २५ मेपर्यंत कालव्याचे पाणी सुरू राहणार आहे. त्यासाठी १६ टीएमसी पाणी लागणार आहे. कालव्यातील पाण्याचा विसर्ग २१०० क्युसेक करण्यात आला असून दोन दिवसांत मोहोळ तालुक्यातून पाणी पुढे मार्गस्थ होणार आहे.
solapur
ujani damsakal
Updated on

सोलापूर : उजनी धरणातून ६ मार्चपासून शेतीसाठी पाणी सोडण्यात आले असून २५ मेपर्यंत कालव्याचे पाणी सुरू राहणार आहे. साधारणतः १६ टीएमसी पाणी (सलग दोन आवर्तने) त्यासाठी लागणार आहे. सध्या कालव्यातील पाण्याचा विसर्ग २१०० क्युसेक करण्यात आला असून दोन दिवसांत मोहोळ तालुक्यातून पाणी पुढे मार्गस्थ होणार आहे. सध्या उजनी धरणात एकूण ८८.३० टीएमसी पाणी असून त्यात २४.६० टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे.

सध्या उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून शेतीपिकांना पाण्याची गरज आहे. जिल्ह्यातील दीड लाख हेक्टरला उजनी धरणाचे पाणी थेट मिळते. दरम्यान, मागील तीन वर्षांत यंदा पहिल्यांदाच शेतीसाठी तीन आवर्तने, त्यातही ऐन उन्हाळ्यात सलग दोन आवर्तने सोडण्याचा महत्त्वाचा निर्णय ५ मार्च रोजी मुंबईत झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून कालव्यातून सुरवातीला ७०० क्युसेकने सोडलेले पाणी सध्या २१०० क्युसेक करण्यात आले आहे.

उद्या (सोमवारी) कालव्याचे पाणी मोहोळ तालुक्यातून पुढे जाणार आहे. सध्या सीना-माढा उपसा सिंचन योजनेतून ३३३ क्युसेकने तर बोगद्यातून ७०० क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. कालव्यातून सोडलेल्या पाण्याचा विसर्ग रविवारी (ता. ९) वाढवून तो आता २१०० क्युसेक करण्यात आला आहे.

धरणातील पाणीसाठा

  • एकूण पाणी

  • ८८.३० टीएमसी

  • उपयुक्त पाणीसाठा

  • २४.६५ टीएमसी

  • पाण्याची टक्केवारी

  • ४६ टक्के

  • कालव्यातून सोडलेले पाणी

  • २१०० क्युसेक

देगाव उपसा सिंचन योजनेची पुन्हा चाचणी

देगाव उपसा सिंचन योजनेचा (मुख्य कालवा) पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. त्यात देगाव ते होटगी असा २८ किमी मुख्य कालवा आहे. या कालव्याद्वारे अक्कलकोट व दक्षिण सोलापूर या दोन तालुक्यातील चार हजार ८०० हेक्टर जमिनीला पाणी मिळणार आहे. त्या मुख्य कालव्यावरील उप- कॅनॉल झालेले नाहीत. डिसेंबर २०२५ पर्यंत ही कामे पूर्ण होतील. त्यावेळी या क्षेत्राला धरणाचे पाणी मिळणार आहे. तत्पूर्वी, फेब्रुवारी २०२५ मध्ये या २८ किमी मुख्य कालव्याची चाचणी झाली होती. आता पुन्हा एकदा या कालव्यातून थेट पाणी पुढे सरकते का, याची चाचणी घेतली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com