यंदा 110 गावांत टंचाईचा मुक्काम 

यंदा 110 गावांत टंचाईचा मुक्काम 

सातारा -  जिल्ह्यात महाबळेश्‍वर, सातारा तालुका वगळता सर्वच तालुक्‍यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असून, भूजल पातळी खालावल्यामुळे यंदा 110 गावांत पाणीटंचाईचे संकट निर्माण होणार आहे. माण तालुक्‍यात सरासरीपेक्षा निम्माच पाऊस झाल्याने टंचाईची तीव्रता वाढणार आहे. पूर्व भागात पावसाळ्यापासूनच काही गावांना टॅंकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. 

जावळी, महाबळेश्‍वर, सातारा तालुका वगळता सर्वच तालुक्‍यांतील भूजल पातळीने धोक्‍याची पातळी ओलांडली आहे. फलटण व खटाव तालुक्‍यांत भूजल पातळी सरासरीपेक्षा एक ते दीड मीटरने घटली आहे. माण तालुक्‍यात तीन मीटरपेक्षाही जास्त भूजल पातळी खालावली आहे. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने जिल्ह्यातील सप्टेंबरअखेर पडलेल्या पावसामुळे झालेले पुनर्भरण व उपसा याचा अभ्यास करण्यासाठी 106 निरीक्षण विहिरींची पाहणी करण्यात आली. त्यामध्ये हे चित्र समोर आले आहे. 106 विहिरींपैकी 72 विहिरींमध्ये कमीत कमी 0.23 ते जास्तीत जास्त साडेतीन मीटरपर्यंत पाणीपातळीत घट झाली आहे. 

माण तालुक्‍यातील 47, खटाव-16, फलटण -23, खंडाळा -17, पाटण- सात अशा एकूण 110 गावांत पाणीटंचाईचे संकट आहे. जिल्ह्यातील 106 पैकी 34 निरीक्षण विहिरींची पाणीपातळी एक मीटरपर्यंत, 17 विहिरींतील एक ते दोन मीटर, आठ विहिरींतील दोन ते तीन मीटर व 13 विहिरींतील पाणीपातळी तीन मीटरपेक्षाही जास्त खालावलेली आहे. 

माण तालुक्‍यातील जाधववाडी, तोंडले, बिजवडी, राजवडी, दानवलेवाडी, शिंगणापूर, पांगरी, वडगाव, भालवडी, पालवन, पिंगळी खुर्द, काळेवाडी, पिंपरी, आंधळी, मलवडी, सत्रेवाडी, बोडके, कासारवाडी, शिंदी बुद्रुक, महिमानगड, पिंगळी बुद्रुक, स्वरुपखानवाडी, बिदाल, पुकळेवाडी, कुकुडवाड, वळई, पर्यंती, खडकी, भाटकी, कारखेल, धुळदेव, हिंगणी, विरळी, शेनवडी, मोगराळे, दिवडी, टाकेवाडी, परकंदी, शिरताव, वाकी, देवापूर, वरकुटे म्हसवड, खडकी, महाबळेश्‍वरवाडी, वरकुटे मलवडी, पांढरवाडी, कोळेवाडी या गावांत टंचाई भासणार आहे. खटाव तालुक्‍यातील मांडवे, गोपूज, गुरसाळे, होळीचागाव, भूषणगड, पाचवड, मोळ, गारवडी, डिस्कळ, राजापूर, बुध, वेटणे, राहाटणी, वांझोळी, खरशिंगे, राजाचे कुर्ले या गावांत टंचाई जाणवेल. फलटण तालुक्‍यातील शेरेशिंदेवाडी, सोनवडी बुद्रुक, झिरपवाडी, भाडळी बुद्रुक, वडले, सोनवडी खुर्द, अलगुडेवाडी, हणमंतवाडी, कुरवली बुद्रुक, आंदरुड, जावली, बोडकेवाडी, विंचूर्णी, जाधववाडी, तरडफ, वेळोशी, मिरेवाडी, उपळवे, वडजल, चौधरवाडी, तावडी, ठाकूरकी, मिरगाव येथे टंचाई जाणवेल. खंडाळा तालुक्‍यातील मिरजे, जवळे, कवठे, आसवली, केसुर्डी, धनगरवाडी, म्हावशी, मोर्वे, अहिरे, धावडवाडी, घाडगेवाडी, अतीट, जवळे, लोहोम, लिंबाचीवाडी, कर्णवडी, झगलवाडी या गावांत टंचाईची शक्‍यता आहे. पाटण तालुक्‍यातील बोरगेवाडी, धनगरवाडी, फडतरवाडी, घोट, जंगलवाडी, जुगाईवाडी, काटेवाडी येथे टंचाई जाणवणार आहे. खंडाळा व फलटण तालुक्‍यांत धोम-बलकवडी धरणाचे पाणी सोडल्यास टंचाईची तीव्रता कमी जाणवेल. 

भूजलाचा अमर्याद उपसा नको 
जलयुक्त शिवारमधील कामांमुळे अनेक गावांत पाणी उपलब्धतेत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे टंचाईच्या कालावधीमध्ये घट झालेली आहे. मात्र, जिल्ह्यातील सर्वच गावांत भूजलाचा अमर्याद उपसा सुरू राहिल्यास टंचाईची तीव्रता वाढणार आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याचा वापर काटकसरीने करण्याची जरुरी आहे. रब्बी हंगामात कमी पाण्याची पिके घेण्याची गरज असल्याचे भूजलतज्ज्ञ विलास भोसले यांनी सांगितले. 

काय केले पाहिजे? 
-विहीर पुरर्भरण, वनीकरण, कुरणविकास, मृद्‌संधारणाची कामे व्हावीत 
- पिकांसाठी ठिबक सिंचनाचा वापर 
-भूजल अधिनियमाचा काटेकोर वापर करावा 

सध्याची पाणीपातळी 
सध्याची पाणीपातळीतील घट तालुकानिहाय मीटरमध्ये अशी ः माण- 3.24, फलटण - 1.17, खटाव - 0.95, खंडाळा- 0.49 , कऱ्हाड - 0.40, कोरेगाव - 0.46, पाटण - 0.23, वाई - 0.46. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com