ठेकेदाराचा प्रताप : अधिकाऱ्यांची पाठ फिरताच पाणी बंद

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 फेब्रुवारी 2020

वादग्रस्त ठरलेली एरंडोली गावची पाणीपुरवठा योजना गावच्या जान्हवी देवी यात्रेवेळीच पुन्हा बंद पडली. चौकशी समितीमधील अधिकाऱ्यांची पाठ फिरताच ही योजना बंद पडल्याने ऐन यात्रेमध्ये गावच्या कारभाऱ्यांना पाण्याची पर्यायी व्यवस्था करताना नाकीनऊ आले.

एरंडोली : वादग्रस्त ठरलेली एरंडोली गावची पाणीपुरवठा योजना गावच्या जान्हवी देवी यात्रेवेळीच पुन्हा बंद पडली. चौकशी समितीमधील अधिकाऱ्यांची पाठ फिरताच ही योजना बंद पडल्याने ऐन यात्रेमध्ये गावच्या कारभाऱ्यांना पाण्याची पर्यायी व्यवस्था करताना नाकीनऊ आले. एवढे घडूनही कोट्यवधी रुपये हडप केलेल्या ठेकेदाराला जिल्हा परिषद प्रशासन पाठीशी घालत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. 

तब्बल दोन कोटी 63 लाख रुपये खर्चाच्या या योजनेवर आतापर्यंत दोन कोटी रुपयांहून अधिक खर्च झाला आहे. गेल्या सात ते आठ वर्षांपासून हे काम सुरू आहे. तरीही ही गावास अद्याप पाणी मिळालेले नाही. कामाची मुदत केवळ दीड वर्षांची असताना नऊ वर्षे उलटूनही या योजनेतून गावाला अद्याप थेंबही पाणी मिळालेले नाही. याप्रकरणी ग्रामपंचायत पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांच्या अनेक सभांमध्ये ओरड होऊनही जिल्हा परिषद प्रशासन आणि पाणीपुरवठा विभागास मात्र अद्याप जाग आलेली नाही.

गेल्या अनेक वर्षांपासून ही कोट्यवधी रुपयांचा अपहार झालेली योजना ग्रामपंचायतीने ताब्यात घेण्यासाठी ठेकेदाराकडून दबावतंत्र सुरू आहे. मात्र विद्यमान ग्रामपंचायत सदस्यांनी हा दबाव झुगारून योजना पूर्ण क्षमतेने सुरू झाल्याशिवाय किंबहुना योजनेतील कामे निविदेतील तांत्रिक निकषानुसार झाल्याची खात्री झाल्याशिवाय योजना ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. याबाबतही ग्रामपंचायतीने जिल्हापरिषद आणि पाणीपुरवठा विभागास वारंवार कळवले आहे. तरीही याकडे जिल्हा परिषद प्रशासन आणि पाणीपुरवठा विभागाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे.

या योजनेतील अपहाराची अनेक वेळा चौकशी झाली आहे. तरीही ही कारवाईचे मात्र धाडस जिल्हा परिषद प्रशासनाकडून होत नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. अनेक वेळा तक्रारी आणि तक्रारींचा पाठपुरावा केल्यानंतर जिल्हा परिषदेच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत बराच दंगा झाल्यानंतर प्रशासनाने या योजनेच्या चौकशीसाठी अधिकाऱ्यांचे पथक नुकतीच एरंडोलीस पाठवले हे पथक येण्याची चाहूल लागताच ठेकेदाराने अतिशय टुकारपणे योजनेचे पाणी कसेबसे गावापर्यंत आणले. परंतु ठेकेदाराचे हे नाटक केवळ काही तासच टिकले. त्यानंतर चौकशीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांनीही तक्रार केलेल्या ग्रामस्थांना दमात घेण्याचा प्रयत्न केला.

परंतु ग्रामस्थांनीही त्याच आवाज आणि भाषेत प्रतिप्रश्न केल्यानंतर या अधिकाऱ्यांचीही भंबेरी उडाली. चौकशी अधिकाऱ्यांची पाठ फिरताच केवळ काही तासात टुकारपणे सुरू केलेला पाणीपुरवठा बंद पडला. यावेळी एरंडोलीची ग्रामदेवता जान्हवीदेवीची यात्रा सुरू होती. यात्रेसाठी मोठी गर्दी झाली होती गावाला पिण्याचे पाणी देण्यासाठी गावच्या कारभाऱ्यांनी पर्यायी व्यवस्था करीत तातडीने पाणीपुरवठा केला. 

ठेकेदाराचे पाणी पिण्यास अयोग्य 
एरंडोलीची योजना सुरू असल्याचे नाटक वटवण्यासाठी ठेकेदाराने दिलेले पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा अहवाल जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने दिल्याने योजनेतील मोठी त्रुटी समोर आली. त्यामुळे पाणी बंद होऊन ग्रामस्थांचे पाण्यासाठी नव्याने हाल सुरू झाले. याबाबत जिल्हा परिषद प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water supply scheme of Erandoli village was closed again