
टेंभू उपसा सिंचन योजनेचा लाभ क्षेत्रातील पाण्याची पातळी खालावत चालल्याने शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण पसरले आहे. रब्बी हंगामातील पिकासाठी पाणी उपसा वाढला आहे. गहू, हरभरा, मका, ज्वारी पिकांची पेरणी क्षेत्रात वाढ झाली आहे.
लेंगरे : टेंभू उपसा सिंचन योजनेचा लाभ क्षेत्रातील पाण्याची पातळी खालावत चालल्याने शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण पसरले आहे. रब्बी हंगामातील पिकासाठी पाणी उपसा वाढला आहे. गहू, हरभरा, मका, ज्वारी पिकांची पेरणी क्षेत्रात वाढ झाली आहे. त्यामुळे टेंभूचे आवर्तन सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
टेंभूच्या पाण्याची खात्री असल्याने शेतकऱ्यांनी माळाचे मळे करून ऊस लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे. याशिवाय भाजीपाला पिकांत टोमॅटो, मिरची, वांगी, दोडका, कारली या भाजीपाल्याची लागवड केली आहे टेंभूचे. पाणी बंद पाईपातून सोडून ओढे-नाले वरील बंधारे पाझर तलाव भरण्याची सोय आहे. पावसाच्या पाण्याने प्रवाहित झालेले ओढे कोरडे पडले आहेत. बंधारे, पाझर तलावातील पाणी पातळी कमी झाली आहे. सध्याची स्थिती पाहता टेंभूचे आवर्तन सुरू करणे गरजेचे बनले आहे.
परिसरात बागायत जमिनीच्या क्षेत्रात मोठी वाढ झाल्याने पाणी उपसा वाढला आहे. पाऊस असल्याचे कारण देत टेंभूचे आवर्तन लांबणीवर टाकले आहे. यामुळे टेंभूचे आवर्तन वेळेत सुरू न झाल्यास ऊस भाजीपाला रब्बी हंगामातील पिकांना पाणीटंचाईची झळ बसून नुकसान होणार आहे. टेंभूचे आवर्तन सुरू केल्यानंतर भागात पाणी पोहोचण्यास किमान पंधरा दिवस लागतात. त्यासाठी टेंभूचे आवर्तन वेळेस सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे.
दरम्यान, भिकवडी बुद्रुक हदीतील पाझर तलावात टेंभूचे पाणी सोडून वलखड माहुली चिखलहोळकडे वाहणाऱ्या ओढ्यावरील बंधारे भरले जातात. पंधरा दिवसांपासून ओढ्यावरील बंधारा ओढा कोरडा पडला आहे. ओढ्याच्या काठावरील विहिरींतील पाण्यानेही तळ गाठला आहे. परिसरातील पिके वाळू लागली आहेत.
संपादन : प्रफुल्ल सुतार