जत तालुक्‍यातील 65 गावांना पाणी देणार  : जयंत पाटील...जिल्हा बॅंक राज्यात नंबर एकवर जाईल 

घनश्‍याम नवाथे
Monday, 4 January 2021

सांगली-  दुष्काळी जत तालुक्‍यातील 65 गावात म्हैसाळ योजनेचे पाणी जात नाही. परंतू आश्‍वासित पाणी उपलब्ध झाले तर या गावांना देण्याचे नियोजन तयार केले असून त्याला थोडा वेळ लागेल. या गावांना पाणी मिळाले तर चांदोलीपासून उमदीपर्यंत जिल्हा सुजलाम सुफलाम होईल. त्यामुळे वसंतदादा, राजारामबापू, गुलाबराव पाटील आदींचे स्वप्न पूर्ण होईल, असा विश्‍वास जलसंपदा तथा पालकमंत्री जयंत पाटील यांनी येथे व्यक्त केला. 

सांगली-  दुष्काळी जत तालुक्‍यातील 65 गावात म्हैसाळ योजनेचे पाणी जात नाही. परंतू आश्‍वासित पाणी उपलब्ध झाले तर या गावांना देण्याचे नियोजन तयार केले असून त्याला थोडा वेळ लागेल. या गावांना पाणी मिळाले तर चांदोलीपासून उमदीपर्यंत जिल्हा सुजलाम सुफलाम होईल. त्यामुळे वसंतदादा, राजारामबापू, गुलाबराव पाटील आदींचे स्वप्न पूर्ण होईल, असा विश्‍वास जलसंपदा तथा पालकमंत्री जयंत पाटील यांनी येथे व्यक्त केला. 

जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या नूतनीकरण केलेल्या पहिल्या मजल्याचे तसेच स्पोर्टस्‌ क्‍बल, वेब पोर्टलचे श्री. पाटील यांच्याहस्ते उद्‌घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. बॅंकेचे अध्यक्ष दिलीप पाटील हे अध्यक्षस्थानी होते. तसेच माजी अध्यक्ष प्रा. सिकंदर जमादार, बी.के. पाटील, सी.बी. पाटील, किरण लाड आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

श्री. पाटील म्हणाले, ""जिल्हा बॅंकेच्या इमारतीचे बांधकाम गुलाबराव पाटील यांच्या काळात झाले. तेव्हापासून फर्निचर व इतर व्यवस्था तशीच होती. दिलीपतात्या पाटील यांनी त्यात अमुलाग्र बदल केला. त्यामुळे 20 ते 25 वर्षे चांगले काम करता येईल अशी व्यवस्था झाली आहे. बॅंक कर्मचारी समाधानी, सुखी आणि तंदुरुस्त असला पाहिजे असा दृष्टीकोन ठेवला आहे. याठिकाणी तळमजल्यावर व्यायामशाळा उभारण्यासाठी राजारामबापू कारखाना आवश्‍यक ती सामग्री देईल. बॅंकेने वेबपोर्टल निर्माण केल्यामुळे कर्मचाऱ्यांची क्षमता वाढेल. गेल्या पाच वर्षात बॅंकेने 5800 कोटीपर्यंत ठेवी वाढवल्या आहेत. ही ताकद फार मोठी आहे. आता बॅंक राज्यात प्रथम क्रमांकावर नेणे आवश्‍यक आहे. कर्मचाऱ्यांचे सहकार्य, जागृती आणि विश्‍वास यामुळे जिल्हा बॅंक राज्यात एक नंबरची बॅंक होईल.'' 

ते पुढे म्हणाले, ""दुष्काळी भागात विश्‍वासाने आश्‍वासीत पाणी दिले तर प्रगती होते. त्याचे परिणाम बॅंकेच्या प्रगतीवर होत असतो. म्हैसाळचे पाणी जत तालुक्‍यात 65 गावांना जात नाही. परंतू पाण्याची उपलब्धता झाली तर पाणी कसे देता येईल याचे नियोजन तयार केले आहे. त्याला थोडा वेळ लागेल. परंतू त्यामुळे संपूर्ण जिल्हा सुजलाम सुफलाम होईल. आश्‍वासित पाणी शेतकऱ्यांना मिळाले तर बॅंकेच्या ठेवी 12 हजार कोटीपर्यंतही जातील. दिलीपतात्यांनी पाच वर्षात चांगले निर्णय घेतले. चांगली आणि प्रभावी व्यवस्था यामुळे बॅंकेचा नावलौकीक वाढेल.'' 

अध्यक्ष दिलीप पाटील म्हणाले, ""बॅंकेच्या इतिहासात प्रथमच बाहेरून पोर्टल न आणता आमच्या आयटी टीमने स्वत:च बनवलेल्या वेबपोर्टलचे उद्‌घाटन अभियंता मंत्र्यांच्याहस्ते होतेय याचा आनंद आहे. जयंतरावांनी मला अध्यक्षपद दिले तेव्हा 2800 कोटी ठेवी होत्या. त्या आता 5800 कोटीपर्यंत गेल्या आहेत. पाच वर्षात अनेक योजना राबवल्या. दुष्काळ, पूर, नोटाबंदी या संकटानंतर इनकम टॅक्‍स, नाबार्ड व इडीची चौकशी झाली. परंतू चकाचक कामामुळे नावाला बट्टा लावू दिला नाही. सर्वांना बरोबर घेऊन कारभार केला. येणारे जग कार्पोरेट असल्यामुळे त्यादृष्टीने जिल्हा बॅंक देखील कार्पोरेट बनवण्याचा प्रयत्न केला आहे.'' 
मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत कडू-पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविकात बॅंकेच्या प्रगतीचा आढावा सादर केला. यावेळी डिजिटल दिनदर्शिकेचेही प्रकाशन झाले. संचालक डॉ. प्रताप पाटील, चंद्रकांत हाक्के, गणपती सगरे, उदय देशमुख, बाळासाहेब होनमोरे, श्रद्धा चरापले, कमल पाटील, विनायक पाटील आदींसह बॅंकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 
 

कर्जमाफीचे व्याज परत- 
अध्यक्ष दिलीप पाटील म्हणाले, ""कर्जमाफीनंतर बॅंकेने व्याज जमा करून घेतले होते. ते व्याज माफ करावे यासाठी मागणी होत होती. सभासदांचा विचार करून आम्ही ते व्याज परत करण्याचा निर्णय घेतला आहे. सोसायट्यांना या व्याजापोटी 16 ते 17 कोटी रूपये परत केले जातील. सभासदांना त्याचा निश्‍चितच फायदा होईल.'' 

...तर वाटेल ती शिक्षा द्या- 
""बॅंकेत इडीनी चौकशी करून चिंधीही सापडली नाही. आमचे नेते जयंतरावांनी देखील गुप्तरित्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे बॅंकेविषयी चौकशी करावी. त्यांच्या मनात काय भावना आहेत? ते विचारावे. गैरकारभाराची एक जरी त्यांच्याकडे तक्रार आली तर वाटेल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे'' असा विश्‍वास दिलीपतात्यांनी यावेळी व्यक्त केला. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water will be provided to 65 villages in Jat taluka: Jayant Patil. District Bank will be number one in the state

टॉपिकस
Topic Tags: