आम्हा ओढ भाकरीची; आमचं कुठलं आलंय पॅकेज 

1farmer_20market_5.jpg
1farmer_20market_5.jpg

सांगली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्योग, व्यापार,व्यवसाय, शेती, शेतकरी अशा सर्वांसाठी कोटीची उड्डाणे असणाऱ्या पॅकेजचा सध्या जोरदार बोलबाला आहे. मात्र गुंठ्यापासून अर्धा एकर पर्यंत जमिनीच्या तुकड्यावर गुजराण करणारे अल्पभूधारक शेतकरी सर्वत्र मोठ्या संख्येने आहे. चिपट्या मापट्याने आपल्या शेतातला माल गावच्या बाजारात जाऊन आपल्या कुटुंबाच्या भाकरीची तजवीज करणारे शेतकरी या पॅकेज मध्ये कुठे असणार आहेत ? हे कोणत्या पॅकेजचा भाग असतील ? बाजारात जाऊन काहीतरी किडुक-मिडून विकणेच थांबल्याने या वर्गाचे पोटाला चिमटे काढणे सुरू आहे. आम्हा ओढ फक्त भाकरीची ? असे चित्र आहे. 


कोणत्याही पॅकेजचा गवगवा यांच्या पर्यंत पोहोचत नसल्याने या वर्गाला पॅकेजचं काही देणं-घेणं ? अशी या वर्गाची स्थिती आहे. प्रशासनाने जीवनावश्‍यक वस्तू विकायला व्यापारी नेमले असल्याने त्यांचा धंदा मात्र सुरु आहे. तो ही या वर्गाकडून मातीमोल दराने शेतमाल खरेदी करूनच. मार्च पासून राज्यासह देश लॉकडाऊन आहे. सर्वत्र बंद..बंद आणि बंद अनुभवतो आहोत. या दरम्यान उद्योग, व्यवसाय, व्यापार, दळण - वळण ठप्प झाले. एकच घटक राबतोय तो म्हणजे शेतकरी. त्याने पिकवलेला माल शहरात विक्रीला जातोय पण तो बहुतांश व्यापाऱ्याच्या माध्यमातूनच. काही ठिकाणी स्वतः शेतकऱ्यांनी थेट विक्रीचे प्रयोग केलेत पण तेही तोकडेच. तर काही प्रशासन आणि परवानगीच्या फेऱ्यात अडकलेत. दर आठवड्यातून एकदा-दोनदा पाटी, डालगं, बुट्ट, पिशवी यामधून आपला शेतमाल विकायला घेऊन जाणाऱ्यांचा बाजार मात्र बंद पडला आहे. आजघडीला काही ठिकाणे, जिल्हे थोडे-थोडे शिथिल होतायेत. पण अशा बाजारांना मात्र अद्याप कोठेही परवानगी नाही.

दळण - वळण नसल्यानेही कोठे जाता येत नाही. जिल्हा, तालुक्‍याच्या ठिकाणांसह मोठ्या गावात आठवडी बाजार दर आठवड्याला भरत असतात. या बाजारात छोटे-छोटे शेतकरी कडधान्ये, शाळू, ज्वारी, बाजरी, विविध प्रकारच्या डाळी , केळी , हंगामी फळे, पपई, पेरू, चिकू, अशी फळे, मेथी, कोथिंबीर, करडई, तांदळ, घोळ असा भाजीपाला, अंडी, कोंबडी, वर्षात एखाद-दुसरे शेळीचे-मेंढीचे करडू, असा शेती आणि शेतीपूरक माल विक्रीला घेऊन जातात. मापट्या-चिपट्याने, पेंढीने, डझनाने, तागडीत जोकून वर वजनाला भारी करून अशी माल विक्री होत असते. असा शेतकरी सर्वत्र खूप मोठ्या संख्येने आहेत. त्या बरोबरच बागायतदार शेतकऱ्यांकडून शेतमाल विकत घेऊन माळव विकायला बाजारात आणणाऱ्या महिला-पुरुषांचीही संख्या मोठी आहे. या बांधवांचे सगळं अर्थकारण गावोगावच्या बाजाराभोवतीच फिरतंय. आता हे बाजारचं थांबल्याने यांचं पोटाचं गणित कोलमडलंय. बाजारात सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळ पर्यंत बाजारात बसून दिवसाकाठी अडीचशे ते पाचशे रुपयांपर्यंत कमाई होते.

या तुटपुंज्या कमाईवरच यांची गुजराण होत असते. या एवढ्याशा बाजाराकरिता सुद्धा खाजगी सावकाराचे कर्ज काढून शेतमाल खरेदी करून विकायला आणणारा वर्गही मोठा आहे. हे सावकार या शेतकऱयांना दहा टक्‍क्‍यापर्यंत व्याज आकारतात. आता हे कर्ज सरकार दरबारी नोंद असणार नाही त्यामुळे इथे कुठल्या पॅकेजचे निशाण असणार नाही. लवकरात लवकर कोरोना संपवा आणि व्हावी एवढीच माफक अपेक्षा या वर्गाची आहे हे मात्र नक्की. पण सरकार माय-बाप या कोणत्यातरी पॅकेज मध्ये घेईल काय ? 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com