दुधगावचे कुटुंब आम्ही  सारे मिळून उभे करणार 

अजित झळके
Monday, 7 September 2020

या कुटुंबाला आम्ही संकटातून सावरू, त्यांना उभे करू, अशी ग्वाही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश पाटील यांनी दिली. याबाबत पालकमंत्री जयंत पाटील यांच्याशी चर्चा झाली असून या कुटुंबाला सर्व ती मदत देण्याची सूचना त्यांनी केली आहे. 

सांगली ः दुधगाव (ता. मिरज) येथील एका कुटुंबावर कोरोना संकटामुळे घाला घातला गेला. या कुटुंबातील कर्त्या पुरुष गळफास लावून आत्महत्या केली आणि दुसऱ्याच दिवशी तरुण मुलाचा कोरोनाने मृत्यू झाला. ते कुटुंब आता उघड्यावर पडले आहे. या कुटुंबाला आम्ही संकटातून सावरू, त्यांना उभे करू, अशी ग्वाही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश पाटील यांनी दिली. याबाबत पालकमंत्री जयंत पाटील यांच्याशी चर्चा झाली असून या कुटुंबाला सर्व ती मदत देण्याची सूचना त्यांनी केली आहे. 

दुधगाव येथे रविवारी अत्यंत वेदनादायक घटना घडली. एकाच कुटुंबातील पाच जणांना कोरोनाची बाधा झाली. त्यातील 36 वर्षाचा तरूण मिरजेतील खासगी रुग्णालयात दाखल झाला. त्याची 80 वर्षाची आजी, 60 वर्षाचे वडील, 55 वर्षाची आई, 25 वर्षाची पत्नी, 9 वर्षाची मुलगी आणि 30 वर्षाचा भाऊ हे सारे घरी होते. पैकी मुलगी वगळता इतरांनाही कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले होते. या परिस्थितीत वडिलांनी गळफास घेतला आणि मुलगा कोरोनाचा बळी ठरला.

सुरेश पाटील म्हणाले, ""असे संकट कुणावरही येऊ नये. इतकी बिकट अवस्था या कुटुंबाची झाली आहे. त्यांनी आधीच हाक दिली असती तर शेकडो हात त्यांच्या पाठीशी उभे राहिले असते. आर्थिक संकटावर मात करता आली असती. पण, आता वेळ निघून गेली आहे. हे कुटुंब वाऱ्यावर सोडणार नाही. आम्ही त्यांना आधार देऊ. या कुटुंबातील एकाला नोकरी देण्याबाबत मी पालकमंत्री जयंत पाटील यांच्याशी बोललो आहे. त्यांनी तत्काळ त्याबाबत हालचाली करण्याचे आदेश दिले आहेत.''

 
ते म्हणाले, ""कोरोनाचे संकट मोठे आहे. त्यातून मार्ग काढत ही लढाई जिंकावी लागणार आहे. कुणाला समस्या असेल तर त्यांनी संवादातून ती सोडवली पाहिजे. अगदीच मोठे संकट असेल तर सामाजिक संस्था, संघटना, राजकीय लोक यांच्याकडे बोलले पाहिजे. त्यातून मार्ग निघतो. आत्महत्या हा मार्ग नाही. त्याकडे कुणी जावू नये. नातेवाईकांनीही कोरोना बाधित रुग्ण व त्यांच्या कुटुंबियांना आधार द्यावा.'' 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: We will build the family of Dudhgaon together