शिराळा तालुक्यात लग्नसराईचा धुमधडाका! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

wedding ceremony

शिराळा तालुक्यात लग्नसराईचा धुमधडाका!

बिळाशी: गेल्या दीड-दोन वर्षांत राज्यावर कोरोना विषाणूचे वाढते सावट होते. त्यामुळे विविध कार्यक्रमांवर अनेक निर्बंध घालण्यात आले होते. त्यामुळे त्या कार्यकाळात अनेकांनी मोजक्याच उपस्थितीमध्ये लग्नसोहळे उरकले होते; मात्र आता सर्व निर्बंध उठल्याने मंगल कार्यालये, मंडपवाले, वाजंत्री, केटरर्स यांच्या व्यवसायांनाही चांगली चालना मिळू लागली आहे. त्यामुळे विविधांगी कलाकार, व्यावसायिक यांच्यामध्ये समाधानाचे वातावरण आहे. शिराळा तालुक्यात सध्या लग्नसराईचा धुमधडाका सुरू आहे.

कोरोना कार्यकाळातील विवाह सोहळे हे मोजक्याच उपस्थितीमध्ये उरकले गेले होते. बहुतांश लोकांनी घरात, दारात, छोटेखानी हॉलमध्ये विवाह सोहळे उरकले होते. त्यामुळे विवाह समारंभांवर आधारित असणारे वाजंत्री, कॅटरर्स, मंडपवाले यांचे कोरोना संसर्ग कार्यकाळातील आर्थिक बजेटच कोलमडले होते. भारतीय संस्कृतीत लग्न समारंभात नातेवाईकांच्यात आपलेपणा जपण्यासाठी त्यांना ऋणानुबंधरूपी असणारा कपड्यांचा आहेर केला जातो. त्यासाठी लग्न मालक कपड्यांचा बस्ता (लग्न मंडपात जवळच्या नातलगांचा, पाहुण्यांचा मानपान करण्यासाठी कपडे दिले जातात) अनेक नातलग, मित्रपरिवार, हितचिंतक वधू-वरांना आहेर म्हणून विशेषतः भांडी देतात. कोरोना कार्यकाळात भांडी व्यवसायही अडचणीत आला होता.

तसेच मोठमोठ्या लग्न समारंभाच्या कार्यालयाबाहेर असणारी रसवंतीगृहे, चहावाले, आईस्क्रीमवाले यांचा व्यवसाय म्हणजे चरितार्थासाठी असणारे त्यांचे हातावरचे पोटच असते. विवाह सोहळे धुमधडाक्यात पुन्हा एकदा सुरू झाल्याने त्यांनाही आता पुन्हा एकदा उभारी मिळाली आहे. यावर्षी मोठ्या प्रमाणावर विवाह तिथी असल्याने लग्न समारंभासाठी लागणारी विविधांगी साधने व्यावसायिक यांच्यामध्ये समाधानाची लकेर असल्याने ते चांगलेच खूश आहेत.

तालुक्यातील लग्न कार्यालये

तालुक्यात शिराळा- ४, शेडगेवाडी- २, कोकरूड- २, आरळा, पावलेवाडी, अस्वलेवाडी प्रत्येकी १ अशी एकूण ११ मोठी विविधांगी कार्यक्रमांसह लग्न सोहळे पार पाडणारी विवाह सोहळे कार्यालये आहेत.

लग्नसराईवर मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या व्यावसायिकांचे व्यवसाय अवलंबून असतात. सध्या सर्वच मंगल कार्यालयांमध्ये विवाह सोहळे थाटामाटात साजरे होऊ लागल्याने यावर अवलंबून असणाऱ्या व्यावसायिकांना चांगलाच दिलासा मिळाला आहे.

-राजेंद्र जंगम, विवाह सोहळे विधीपाठक

टॅग्स :SangliKokanweddingshirala