जयश्रीताईंना कॉंग्रेस सोडू नये यासाठी वजनदार पद

बलराज पवार
Monday, 20 July 2020

माजी मंत्री मदन पाटील यांच्या पत्नी श्रीमती जयश्री पाटील यांनी कॉंग्रेस सोडू नये यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत.

सांगली : माजी मंत्री मदन पाटील यांच्या पत्नी श्रीमती जयश्री पाटील यांनी कॉंग्रेस सोडू नये यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. त्यांना राज्यस्तरीय वजनदार पद देण्याबरोबरच त्यांच्या कार्यकर्त्यांनाही पक्षात सन्मान मिळेल अशी ग्वाही दिली आहे. मात्र तरीही जयश्री पाटील यांनी आपली भूमिका अधिकृतपणे अद्याप स्पष्ट केलेली नाही. 
राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर राष्ट्रवादीने आपली ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न चालू केले आहेत. त्यामध्ये सांगलीत कॉंग्रेसला खिंडार पाडण्याचा प्रयत्न प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या माध्यमातून आहे. खानापुरचे माजी आमदार सदाभाऊ पाटील हे कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष असतानाही त्यांनी पक्षाला रामराम ठोकून राष्ट्रवादीचा रस्ता धरला. मात्र त्यांची मनधरणी कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींनी केली नाही. 

मात्र जयश्री पाटील यांच्या नाराजीची दखल लगेच घेतली आहे. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांची दखल घेत त्यांच्याशी चर्चा केली. यासाठी राज्यमंत्री डॉ. विश्‍वजित कदम यांनी पुढाकार घेत जयश्री पाटील यांना पक्षातच थांबवण्यासाठी केलेले प्रयत्न प्रयत्न सार्थकी लागतील असे चित्र आहे. मदन पाटील यांच्या पश्‍चात त्यांच्या गटाला सावरण्याचे काम जयश्री 
पाटील यांनी केले. त्याला कॉंग्रेसने बळ देखील दिले महापालिका निवडणुकीत कॉंग्रेसचे नेतृत्व त्यांनी केले. यानिवडणुकीत कॉंग्रेसच्या 20 जागा आल्या. मात्र आपल्या कार्यकर्त्यांना पक्षात सन्मान मिळत नसल्याने त्या नाराज असल्याचे सांगितले जाते. त्यामुळेच त्यांनी राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला आहे. पण जयश्री पाटील यांनी अधिकृतपणे आपली भूमिका जाहीर केलेली नाही. 

राष्ट्रवादीत जाण्यास विरोध जयश्री पाटील यांच्या राष्ट्रवादीत प्रवेशासाठी काहीच नगरसेवक प्रयत्न करत आहेत. मात्र बहुसंख्य आजी माजी नगरसेवक, पदाधिकारी, ग्रामीण भागातील नेते, कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत जाण्यास विरोध आहे. त्यामुळे जयश्री पाटील कोणता निर्णय घेतात याकडे कॉंग्रेससह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. कृषी राज्यमंत्री डॉ. विश्‍वजित कदम यांनीही जयश्री पाटील यांचे मन वळवण्याचा प्रयत्न चालवला आहे. गेल्या चार वर्षात डॉ. कदम यांनी जयश्री पाटील पर्यायाने मदनभाऊ गटाला बळ देण्याचे काम केले आहे. जयश्री पाटील यांच्या राष्ट्रवादीत जाण्याने कॉंग्रेस नुकसान होणार आहे. त्यामुळे डॉ. कदम यांनी कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी त्यांची बैठक घडवून आणली. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आहे. सध्याची परिस्थिती निवळली की जयश्रीताईंना राज्यस्तरीय पद देण्याची ग्वाही या नेत्यांनी दिली आहे. 

राष्ट्रवादीस जाण्यास विरोध 
दरम्यान कॉंग्रेसमधील बहुतांश नगरसेवकांचा राष्ट्रवादी जाण्यास विरोध असल्याचे समजते सांगली राज्यात यात सत्ता नसतानाही महापालिका निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीत पक्षाने चांगला परफॉर्मन्स दिला आहे. विशेष म्हणजे पतंगराव कदम आणि मदन पाटील हे दोन्ही 
कॉंग्रेसचे दिग्गज नेते काळाने हिरावून घेतल्यानंतरही विश्वजीत कदम यांनी पक्ष सावरला आहे. पालिका निवडणुकीत देखील जयश्री ताईंनी सांगितल्याप्रमाणेच कॉंग्रेसचे उमेदवार ठरवण्यात आले होते. तसेच राज्यात सत्ता नसल्याने जयश्री ताईंना कोणतेही पद देता आलेले नाही, हे वास्तव आहे. सध्या महामंडळासाठी त्या पक्षांतर करणार असतील तर कॉंग्रेस देखील त्यांना भविष्यात महामंडळावर घेऊ शकते त्यामुळे राष्ट्रवादी'त प्रवेश कशासाठी, असा सवाल कॉंग्रेस कार्यकर्त्यांना पडला आहे. जयश्री ताईंनी राष्ट्रवादी जावे यासाठी कॉंग्रेसमधील दोन-तीन नगरसेवकच फार आग्रही असल्याचे समजते. 

राष्ट्रवादीत न्याय मिळेल? 
राष्ट्रवादीमध्ये जरी जयश्री पाटील गेल्या तरी त्या पक्षांमध्ये उद्या पद द्यायचे असेल तर आमदार सुमनताई पाटील यांचा नंबर आधी लागतो. त्यामुळे राष्ट्रवादी जिल्ह्यात किती जणांना महामंडळ देणार ? कारण माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनीदेखील आधीच प्रवेश केला आहे. त्यामुळे जयश्रीताईंना कॉंग्रेसचे न्याय देऊ शकतो असे असा सूर कॉंग्रेसमध्येच उमटतो आहे. 
 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A weighty position to prevent Jayashree from leaving the Congress