आटपाडी तालुक्‍यात विहीरी गाळाने बुजल्या

नागेश गायकवाड 
Monday, 14 December 2020

आटपाडी तालुक्‍यात यावर्षी अतिवृष्टीने शेतीसह घरांची पडझड झाली. विहीरी गाळाने बुजल्या. महाराष्ट्र रोजगार हमी योजनेतून बुजलेल्या विहिरीतील गाळ काढण्याची विशेष मोहीम यंदा पंचायत समितीने राबवावी, अशी मागणी होत आहे. 

आटपाडी : आटपाडी तालुक्‍यात यावर्षी अतिवृष्टीने शेतीसह घरांची पडझड झाली. विहीरी गाळाने बुजल्या. महाराष्ट्र रोजगार हमी योजनेतून बुजलेल्या विहिरीतील गाळ काढण्याची विशेष मोहीम यंदा पंचायत समितीने राबवावी, अशी मागणी होत आहे. 

रोजगार हमी योजनेतून नविन विहिर खुदाई, विविध फळबाग लागवड, रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड, शेततळे खुदाई, तलाव आणि विहिरीतील गाळ काढणे आदी कामे केली जातात. आटपाडी तालुक्‍यात बहुतांश योजना प्रभावीपणे राबवल्या आहेत. मात्र, सहा वर्षे रोजगार हमी योजनेतून विहिरीतील गाळ काढण्याची कामे बंद आहेत. 

यावर्षी तालुक्‍यात अतिवृष्टी झाली. विक्रमी एक हजार मिलिमीटर पाऊस झाला. अनेक पूल पाण्याखाली गेले. गावांचा संपर्क तुटला. पूल वाहून गेले. ओढ्या पात्राबाहेर पाणी गेले. अतिपावसामुळे शेतात पाणी न मावल्यामुळे कडे नसलेल्या विहिरीत पाणी शिरले. पाण्यासोबत गाळही विहिरीत गेला. ओढ्याच्या कडेच्या बहुतांश विहिरी गाळाने भरल्या. मिटकी साठवण तलाव फुटला. तलावाखालील विहिरी गाळाने भरल्या. 

शेतकऱ्यांचे नुकसान झाले. पंचनामे किंवा मोजदाद झालीच नाही. भरपाईही मिळाली नाही. अशा बुजलेल्या विहिरीतील रोजगार हमी योजनेतून गाळ काढून शेतकऱ्यांना दिलासा देता येऊ शकतो. विहिरीतील गाळ निघून पाणीसाठा वाढेल. परिणामी शेती पिकांना चांगला उपयोग होईल. 
यंदा उन्हाळ्यात गाळाने बुजलेल्या विहिरीतील गाळ रोजगार हमी योजनेतून काढावा. विहिरीतून गाळ काढण्याची कामे पुन्हा सुरू करावीत, अशी मागणी होत आहे. 

गाळाने भरलेल्या विहिरीची पाहणी करावी. रोजगार हमी योजनेतून गाळ काढण्याची विशेष मोहीम प्रशासनाने हाती घ्यावी, अशी मागणी आहे. 
- डॉ. उमेश देशमुख, जिल्हा अध्यक्ष, बळीराजा संघटना

 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wells in Atpadi taluka were flooded