मुलांचा खून करून चंद्रकांतने काय मिळविले : रासाटी ग्रामस्थ

विजय लाड
बुधवार, 9 ऑक्टोबर 2019

शिरवळनजीकच्या दोन्ही मुलांचा खून केलेल्या चंद्रकांत याचे मूळ गाव रासाटी (ता. पाटण) हे आहे.

कोयनानगर ः चंद्रकांत हा कष्टाळू आहे. परंतु, त्याने मुलांना मारले नव्हते पाहिजे. तो आजारातून बरा झाला असता. आपल्या पोटच्या पोरांना मारून त्याने चांगले केले नाही, अशा प्रतिक्रिया रासाटी (ता. पाटण) येथे व्यक्त होऊ लागल्या आहेत.

शिरवळनजीकच्या दोन्ही मुलांचा खून केलेल्या चंद्रकांत याचे मूळ गाव रासाटी (ता. पाटण) हे आहे. मुलांचा खून केल्याची बातमी गावात समजताच चंद्रकांतविषयी ग्रामस्थांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. त्याच्या घरानजीकचे लोक हळहळ व्यक्त करू लागले आहेत. 

चंद्रकांत याचे संपूर्ण नाव चंद्रकांत अशोक ठाकूर असे असून तो मोहिते हे आडनावही वापरत असे. त्याच्याकडे प्रवासी वाहतूक करणारी दोन वाहने आहेत. घाटकोपर (मुंबई) येथे तो कुटुंबासह वास्तव्य करतो. मुंबईस्थित कविता हिच्याशी 12 वर्षांपूर्वी त्याचा विवाह झाला होता. उत्तमरित्या व्यवसाय करणाऱ्या चंद्रकांतला टी. बी. या आजाराने ग्रासले होते. त्यातूनच त्याने मुलगा प्रतीक आणि मुलगी गौरवी यांचा गळा दाबून खून केल्याची प्राथमिक माहिती प्राप्त होत आहे.
 
हा प्रकार करण्यापूर्वी त्याने पत्नी आणि वडिलांशी संपर्क साधून याची कल्पना दिल्याचे सांगितले जात आहे. मंगळवारी (ता. 8) रात्री आठ वाजता वडिलांना त्याच्या दुसऱ्या मुलास याची कल्पना दिली. मुलाने कोणतीही रिस्क न घेता तातडीने पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी चंद्रकांतचे वाहन जीपीएसच्या माध्यमातून शोधले. परंतु, तोपर्यंत उशीर झाला होता.

खेड-शिवापूर टोलनाका येथे चंद्रकांतला मृत मुलांसह ताब्यात घेतले. त्याचे कुटुंबीय रासाटीतून मुंबईला रवाना झाले आहे. चंद्रकांत हा कष्टाळू आहे. परंतु, त्याने हे कृत्य केले नव्हते पाहिजे, असे मित्र आनंद नलवडे याने नमूद केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What Chandrakant achieved by murdering children says Rasati villagers