कंटेनमेंट झोन प्रकरण नेमकं म्हणजे नेमकं आहे तरी काय ?

जयसिंग कुंभार 
Tuesday, 28 July 2020

कोरोना आपत्तीमध्ये सध्या चर्चेत आहे तो कंटेनमेंट झोन म्हणजे कोविड-19 प्रतिबंधित क्षेत्र नावाचा एक प्रकार. हे प्रकरण नेमकं काय याबद्दल शहरी आणि ग्रामिण भागात मोठा संभ्रम आहे.

कोरोना आपत्तीमध्ये सध्या चर्चेत आहे तो कंटेनमेंट झोन म्हणजे कोविड-19 प्रतिबंधित क्षेत्र नावाचा एक प्रकार. हे प्रकरण नेमकं काय याबद्दल शहरी आणि ग्रामिण भागात मोठा संभ्रम आहे. त्याबद्दलच्या काही शंका प्रशासकीय अधिकाऱ्यांसमोर मांडल्या तर त्यातल्या काही प्रश्‍नांची उत्तर मिळतात. काहींबाबत त्यांच्यातच संभ्रम आहे. या पंक्तीप्रपंचातून संभ्रम दूर व्हावा. लोकांचं जगणं सुसह्य व्हावं इतकंच. 

केंद्र, राज्य आणि जिल्हा प्रशासनाकडून आजवर कंटेनमेंट झोनबाबत अनेक आदेश-सूचना आहेत. जिथं कोरोना रुग्ण सापडतो तो परिसर बंदिस्त करणं. त्याचा इतरांशी असलेला संपर्क तोडणं आणि त्या काळात तिथे किती लोकांना संसर्ग झाला आहे याचा शोध घेणं हा ढोबळमानाने या सर्व आदेश-सूचनांचा हेतू आहे. मग त्या परिसराचं क्षेत्रफळ पुर्वी किलोमीटरमध्ये असायचं. आता मात्र तिथली एकूण गरज बघून गावातील पंचांनी आणि शहरात उपायुक्त किंवा प्रभाग अधिकारी तो निर्णय करीत आहेत. अर्थात तिथं किती रुग्ण सापडले यावरही तो निर्णय ठरतो. सध्या हे क्षेत्रफळ कधी एका गल्लीचं तर कधी अनेक गल्ल्यांचं असतं. बऱ्याचदा त्या परिसरातील नगरसेवक किंवा प्रभावशाली लोक किती राहतात यावरही हे अंतर ठरतं अशी सध्याची वस्तुस्थिती आहे. याबद्दल अधिकारी भाष्य करणं टाळतात. 

कंटेनमेंट झोनमध्ये अत्यावश्‍यक सेवा सुविधा कोणी द्यायच्या या प्रश्‍नावर अधिकारी म्हणतात. कंटेनमेंट झोनमधील रहिवाशांना सर्व अत्यावश्‍यक सेवा पुरवण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या मदतीने पुरवठा व्यवस्था उभी केली आहे. या सेवा नागरिकांनी स्वखर्चातून घ्यायच्या आहेत. त्यांनी झोनच्या बाहेर येऊ नये यासाठी त्या व्यवस्था पोहच द्यायची ही व्यवस्था आहे. अगदी दुध-भाजीपाला अशा साऱ्या व्यवस्था तिथं पोहचवण्याची जबाबदारी या स्वयंसेवकांवर आहे. आता यातली वस्तुस्थिती अशी की कंटेनमेंट झोनमधील अनेक लोक केवळ अत्यावश्‍यक सेवांसाठीच नव्हे तर रोज नित्य कामांसाठी बाहेर जातात. कंटनेमेंट झोनच्या प्रवेश जागेजवळ नियुक्त फक्त पोलिसच असतो. 

कोविड प्रतिबंधित क्षेत्रात पुढील 28 दिवसांसाठी आरोग्य यंत्रणेकडून सध्या रॅपिड ऍन्टीजेन चाचण्या सुरु केल्या आहेत. इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्च संस्थेने या चाचण्या कंटेनमेंट झोनमध्ये घेताना तीन अटी नमूद केल्या आहेत. कोरोनाची लक्षणे दिसणारी, 65 वर्षावरील व्यक्ती किंवा विविध आजारांनी आधीच व्याधीग्रस्त असलेल्यांच्या चाचण्या कराव्यात. जे रुग्णांच्या थेट संपर्कात आले आहेत त्यांना सध्या घरातच विलगीकरण कक्षात ठेवावे. त्यांना निरिक्षणाखाली ठेवावे असे प्रशासकीय आदेश आहेत.

आता यातील वस्तुस्थिती अशी की प्रादुर्भावाचा अंदाज येण्यासाठी म्हणून या चाचण्या आहेत. त्या शंभर टक्के विश्‍वासार्ह नाहीत तथापि सध्या या पॉझिटीव्ह आलेल्यांना थेट कोरोना बाधीत म्हणून जाहीर केले जात आहे. त्यामुळे परिसरात भितीचे वातावरण तयार होत आहे. आरटी पीसीआर ही चाचणी घेतल्यानंतरच रुग्ण म्हणून जाहीर करावे. या चाचण्या केल्या तरी प्रादुर्भावाचा अंदाज यावा यासाठी आहेत याचे भान प्रशासनाने ठेवले पाहिजे असे खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक डॉक्‍टरांचे मत आहे. 

पत्रे ठोकण्याचे कर्मकांड... 
कंटेनमेंट झोनबाबत अनेक नियम बदलले तरी पत्रे ठोकून परिसर बंदिस्त करणे यात कोणताही बदल गेल्या चार महिन्यात झालेला नाही. खरे तर त्या भागात रुग्ण सापडला आहे हे एखादा फलक लावूनही सर्वाना समजू शकते. मात्र पत्रे ठोकणे हे एखाद्या कर्मकांडाप्रमाणेच आजही सुरु आहे. ते आणखी किती दिवस चालणार आणि त्याचा नेमका काय उपयोग काय होतो याचा अभ्यास वरीष्ठ प्रशासकीय अधिकारी लवकरच करतील अशी आशा बाळगुया. 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What exactly is a containment zone case?